BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२६ डिसें, २०२१

पंढरपूर उपनगरात आणखी एक चोरी, नागरिक धास्तावले !

 


पंढरपूर : नागरिकांच्या मनावर चोरांचे दडपण कायम असताना पंढरीत आणखी एक चोरीची घटना घडली असून नागरिकांच्या मनातील चोरांची भीती अधिक गडद झाली आहे. 

गेल्या काही काळात पंढरपूर शहर आणि उपनगरात चोरींच्या घटनात मोठी आणि लक्षणीय वाढ झाली आहे. पंढरीला येणाऱ्या भाविकांचीही मालमत्ता सुरक्षित राहिली नाही. चोरांचे मनोधैर्य वाढले असल्याची साक्ष देणाऱ्या अनेक घटना घडत आहेत त्यामुळे पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे राहण्याची वेळ आता आली आहे. शहराचा विस्तार वाढला आणि त्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी असल्याचे मान्य केले तरी चोरीच्या वाढत्या घटना या पोलिसांकडे बोट नक्कीच दाखवू लागल्या आहेत. 

उपनगरी नागरिक सतत चोरांच्या दहशतीखाली असतात आणि घराला कुलूप लावून बाहेर जाताच त्या घरात चोरी होत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. टाकळी हद्दीतील शिवपार्वती नगर येथे देखील अशाच प्रकारे चोरी होऊन दागिने लंपास करण्यात आले आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडायचे की नाही असाच प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. शिवपार्वतीनगर येथील प्रताप बाळासाहेब शिंदे हे आपल्या कुटुंबासह बाहेरगावी गेले होते आणि हीच संधी साधत चोरट्यांनी घरात घुसून दागिने आणि रोख रकमेची चोरी केली आहे. 

प्रताप शिंदे यांच्या घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम २५ हजार असा जवळपास सव्वा दोन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. शिंदे यांच्या घरात कोणी नाही याचा फायदा उठवत चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि ही चोरी केली. चोरट्यांनी त्यांच्या घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम पळवली आहे. चोरीची ही घटना उघडकीस येताच त्या परिसरात पुन्हा घाबरत पसरली आहे. पंढरीतील विविध उपनगरी  नागरिकही पुन्हा एकदा धास्तावले आहेत. चोरीची घटना समजताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. श्वान पथक पाचारण करून पोलिसांनी तपास सुरु केला पण श्वान पथकाने काही दिशा दिली नाही.


अलीकडच्या काळात पंढरपूर आणि परिसरात सतत चोऱ्या होत असल्याने नागरिक धास्तावले आहेत. वाढत्या घटनामुळे चोरांचे धाडस वाढले असल्याचे दिसत असून आता पोलिसांनी मोहीमच हाती घेऊन चोरांवर नियंत्रण आणावे आणि नागरिकांच्या मालमत्तांचे रक्षण करावे अशी मागणी होऊ लागली आहे. नागरिकांनीही आपल्या सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक बनले असून घराला कुलूप लावून जाणे टाळण्याची गरज निर्माण झाली आहे.   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !