BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ डिसें, २०२१

पंढरपूरच्या सरपंचाला ऑनलाईन गंडा !

 


पंढरपूर : जाहिरात पाहून गाडी खरेदी करण्याच्या प्रयत्न उंबरगाव येथील माजी सरपंचाच्या चांगलाच अंगलट आला असून तब्बल ७५ हजाराचा ऑनलाईन गंडा घालून घ्यावा लागला आहे. 


इंटरनेटमुळे जगाचा वेग वाढला असून अनेक सुविधा यामुळे प्राप्त झाल्या आहेत पण या सुविधेच्या वापराप्रमाणेच फसवणुकीच्या अमर्याद घटना घडू लागल्या आहे. बँकेतील रक्कमही या फसवणुकीमुळे सुरक्षित राहिलेली नाही. गेल्या काही वर्षांपासून बहुतेक व्यवहार ऑनलाईन होतात आणि त्यात काही तक्रारीही नसतात पण ज्यांनी फसवणुकीचा धंदा मांडला आहे ते मात्र या मार्गाने हातोहात फसवत आहे. अशीच फसवणूक पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथील माजी सरपंच विजय पवार यांची  झाली असून त्यांना ७५ हजाराला फसविण्यात आल्याप्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


उंबरगाव येथील माजी सरपंच विजय पवार यांनी इंटरनेटवर एका दुचाकीची जाहिरात पाहिली आणि ही गाडी त्यांना पसंत पडली.  सदर गाडी बॅटरीवर चालणारी असून चांगले ऍव्हरेज देणारी असल्याची माहिती वाचून पवार या गाडीच्या प्रेमात पडले आणि त्यांनी जाहिरातीत दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. पवार याना एक संदेश प्राप्त झाला आणि एका मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्यास सांगितले. पवार यांनी या क्रमांकावर व्हॉटस ऍप च्या माध्यमातून आपले नाव पत्ता अशी माहिती त्यांना पाठवली. त्यानंतर त्यांना लगेच दुसऱ्या एका क्रमांकावरून फोन आला आणि ओला स्कुटरची माहिती देत १ लाख २४ हजार ९९९ रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. याचवेळी त्यांनी पवार याना पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, फोटो, बँक पासबुक आणि ई मेल अशी सगळीच माहिती पाठविण्यास सांगितले. त्यानुसार पवार यांनी ही माहिती त्यांना दिली. यानंतर पवार याना रक्कम पाठविण्यास सांगण्यात आले. 


पवार यांनी एकूण ७५ हजार रुपये त्यांना पाठवले आणि पावतीची मागणी केली. त्यांच्या मागणीनुसार ई मेल द्वारे त्यांना पावतीही प्राप्त झाली पण पावती पाहून पवार याना काहीशी शंका आली. पवार यांनी कंपनीच्या कागदपत्रांची मागणी केली, सदर कंपनीचे मुख्य व्यवस्थापक यांचा मोबाईल क्रमांक पवार यांनी मागितला पण त्यांनी दुसऱ्याचेच आधार कार्ड आणि ओळखपत्र पाठवले. सदर कागदपत्र पाहून पवार यांचा संशय अधिक गडद झाला. त्यानंतर मात्र आपली फसवणूक झाल्याचे पवार यांच्या लक्षात आले आणि मग त्यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपस सुरु करण्यात आला आहे.  

     

    आणखी बातमी :>> महाराष्ट्रात जमावबंदीचे आदेश, नवी नियमावली लागू !



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !