BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ डिसें, २०२१

जिवंत व्यक्तींनाच सरकारी यादीत दाखवले कोरोना बळी !




बीड : जिवंत व्यक्तींनाच सरकारी यादीत कोरोना बळी दाखविल्याने अनेकांना धक्का बसला असून केवळ पन्नास हजाराच्या सानुग्रह अनुदानासाठी हा सर्व प्रकार केला जात असावा अशी शंका आता बळावली आहे. 

कुठलीही सरकारी मदत मिळणार असली की अनेक खोटे आणि गैरप्रकार होताना पहायला मिळतात पण बीड येथील धक्कादायक प्रकाराने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कोरोनाने गेल्या दोन वर्षांपासून माणसाचं जगणं कठीण करून ठेवले आहे. धडधाकट आणि घरातील कर्ती मंडळी या कोरोनाने हिरावून नेली आहेत आणि अनेक कुटुंबं पोरकी झाली आहेत. कित्येक बालकांच्या डोक्यावरील मात्यापित्यांचं छत्र कोरोनाने हिसकावून नेलं आहे. घराघरातील आधार नष्ट झाले आहेत त्यामुळे त्यांना कुणीतरी आधार देण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्याच्या डोक्यावरचम आभाळच हरवून गेलं आहे अशांसाठी राज्य सरकार माणुसकी जपत पुढे आले आहे पण येथेही माणसातील गिधाडे टोच्या मारू लागले असल्याचे समोर आले आहे. 

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांसाठी शासनाने पन्नास हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आणि प्रशासनाच्या कोरोना बळींच्या यादीत चक्क जिवंत व्यक्तींचा समावेश करण्यात आल्याचे धक्कादायक प्रकरण उजेडात आले आहे. बीड जिल्ह्यातील २ हजार ८३८ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे पण यातील १ हजार ८०० व्यक्तींनीच हे अनुदान मिळण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज केलेले आहेत. कोरोना बळींच्या नातेवाईकांना तातडीने हे सानुग्रह अनुदान देण्याच्या सूचना असून तालुका, जिल्हा स्तरावर कोरोना बळींची यादी तयार केली जात आहे. नगरपालिका, गट विकास अधिकारी, आरोग्य विभाग आणि तहसीलदार यांच्या समितीकडून ही यादी तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.  

तयार करण्यात आलेल्या या यादीत चक्क जिवंत असणाऱ्या व्यक्तींचा समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर आली आणि एकच खळबळ उडाली आहे. सदर यादीतील व्यक्तींच्या नावाची खातरजमा करून घेण्यासाठी संपर्क साधला असता मृत व्यक्तींच्या यादीतील अनेकजण जिवंत असल्याचे दिसून आले आहे. अंबाजोगाई येथील दोन जिवंत व्यक्तींचा समावेश मृतांच्या यादीत आढळून आला. ही बाब नजरचुकीने म्हणण्याचे धाडसही कुणाला करता येत नव्हते कारण अंबाजोगाई पाठोपाठ पाटोदा तालुक्यातील दोन व्यक्तींचाही या मृतांच्या यादीत समावेश करण्यात आल्याची बाब समोर आली. हे कमी होते म्हणून की काय, लातूर जिल्हयातील आणखी दोन जिवंत व्यक्तींचा समावेश या यादीत दिसून आला आहे. या सर्व प्रकाराने प्रशासनात आणि नागरिकताही खळबळ उडवून दिली आहे. 

राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या पन्नास हजार रुपयांच्या अनुदानामुळेच हे प्रकार घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिवंत व्यक्तीला मृत दाखवून हे अनुदान लाटण्यासाठीच हा सगळा खटाटोप करण्यात आला असून अनुदान लाटण्याचा प्रयत्न करणारे हे एक रॅकेट असावे अशी शंकाही आता बळावू लागली आहे.  आणखी अशी किती खोटी नावे या यादीत समाविष्ठ झाली आहेत हे पूर्ण पडताळणी झाल्यावरच लक्षात येईल पण या टोळीत कुणाकुणाचा सहभाग आहे हे समोर येणे देखींल आता महत्वाचे बनले आहे. कुठल्याही आपत्तीवेळी शासन अशी मदत देते पण त्यावेळी असे प्रकार घडत असल्याचे दिसून येत असते. पूरग्रस्त, भूकंपग्रस्त अशा आपत्तीवेळीही पंचनामे करताना असाच सवाल गोंधळ होत असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळत असतातच पण आता तर थेट जिवंत व्यक्तींना मृत दाखवून हा सगळा प्रकार होत असल्याची बाब पुढे आली आहे. हा प्रकार उघडकीस येताच प्रशासन अलर्ट झाले आहे पण हे होण्यामागे कोण आहे याचा छडा लागणे गरजेचे असल्याचे नागरीकातून बोलले जाऊ लागले आहे. या प्रकारची मात्र जनतेतून तीव्र शब्दात निंदा होऊ लागली आहे.    

हे वाचा :>>   पंढरपूर तालुक्यातील सरपंचाला ऑनलाईन गंडा !



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !