BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ डिसें, २०२१

महाराष्ट्र झोपेत... रात्रीपासूनच राज्यात झाले नवे निर्बंध लागू !



पंढरपूर : संपूर्ण महाराष्ट्र झोपेत असताना राज्यात कोरोना प्रतिबंधाचे नवे निर्बंध लागू करण्यात आले असून रात्रीची जमावबंदी करण्यात आली आहे तसेच अन्य काही निर्बंधही राज्यभरात लागू करण्यात आले आहेत. 


कोरोनाची तिसरी लाट आता उंबरठ्यावर उभी असून नव्या ओमीक्रॉन विषाणूचे रुग्ण वाढू लागले आहेत. देशात जरी हे रुग्ण आढळून येत असले तरी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातच असल्याने राज्य शासन आणि प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यांनी तातडीने उपाय योजण्याच्या सूचना नुकत्याच केंद्र सरकारने दिल्या आहेत.  कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी सर्व ती आवश्यक खबरदारी घेण्याच्या या सूचना असून आता महाराष्ट्रात रात्री १२ वाजल्यापासूनच नवे निर्बंध लागू झाले आहेत.  


ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी या नव्या नियमांची घोषणा केली असून रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. या नव्या नियमानुसार राज्यात सर्वत्र ही जमावबंदी लागू असणार आहे. सर्व सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यावर निर्बंध असून रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत या आदेशाची अंमलबजावणी असणार आहे. विवाह सोहळ्यासाठी बंदिस्त सभागृहात एकावेळी शंभर पेक्षा अधिक व्यक्तींची उपस्थिती असणार नाही तर खुल्या जागेत ही मर्यादा २५० पेक्षा अधिक असणार नाही किंवा जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापेक्षा जे कमी असेल तेवढेच लोक उपस्थित राहू शकणार आहेत.  अन्य राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमासाठीही उपस्थितीची संख्या शंभरपेक्षा अधिक असणार नाही. विवाह सोहळ्यासाठी असलेले नियम या कार्यक्रमांनाही लागू असणार आहेत.  या शिवाय अन्य कार्यक्रमासाठी बंदिस्त जागेत ज्या ठिकाणी आसन क्षमता निश्चित आहे अशा ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक नसेल तसेच ज्या ठिकाणी आसन क्षमता निश्चित नसेल अशा ठिकाणी २५ टक्के उपस्थिती असेल. हे कार्यक्रम जर खुल्या जागे असतील तर आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा अधिक उपस्थिती असणार नाही. 


खेळांच्या संदर्भातील समारंभ तसेच क्रीडा स्पर्धा यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा अधिक उपस्थिती असणार नाही.  या सर्व प्रकारापेक्षा वेगळ्या कार्यक्रम अथवा एकत्रित येण्याच्या अन्य कार्यक्रमासाठी उपस्थितीची संख्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निश्चित करेल. यासाठी २७ नोव्हेंबर २०२१ चे आपत्ती व्यवस्थापन आदेशाचे पालन होईल हे पहिले जाणार आहे.  चित्रपटगृहे, जिम, उपहारगृहे, नाट्यगृहे अशा ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीस परवानगी असणार असून या ठिकाणांना त्यांची असणारी संपूर्ण क्षमता आणि ५० टक्के क्षमतेची संख्या घोषित करावी लागणार आहे. या शिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तेथे निर्बंध लावता येणार असून हे निबंध लागू करण्याआधी जनतेला त्याची माहिती देणे आवश्यक असणार आहे. जिल्हा प्रशासनास आवश्यक वाटेल तेथे कठोर निर्बंध लावण्याची मुभा देखील देण्यात आली आहे.    


केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने संसर्ग रोखण्यासाठी सर्व त्या उपाय योजना राबविण्यास सांगितले आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने नियमांचे पालन करणे आवश्यक असून सद्याचे निर्बंध हे प्राथमिक स्वरूपाचे आहेत. हे निर्बंध आत्ताच लावले नाहीत तर भविष्यात यापेक्षा अधिक कठोर निर्बंध लागू करण्याची वेळ येऊ शकते असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. जगातील ११० देशात ओमीक्रॉनचा  प्रसार झाला असून प्रसाराचा वेग सर्वाधिक आहे.  सद्या काही प्रमाणात निर्बंध लावावेत आणि भविष्यात याचा प्रसार पाहून निर्बंधात वाढ करण्याबाबत विचार करण्यात यावा असे मुख्यमंत्र्यांचे मत आहे. एकूण परिस्थिती पाहता नागरिकांनी अधिक दक्ष होऊन कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक बनले आहे.  


हे देखील वाचा : >>> वर्तमानपत्राचे कागद खाद्य पदार्थासाठी वापरण्यावर बंदी !



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !