BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ डिसें, २०२१

ओमीक्रॉन ....संचारबंदीच्या उंबरठ्यावर महाराष्ट्र आणि दिल्ली !





मुंबई : देशात ओमीक्रॉनने रुग्ण वेगाने वाढत असून हा ओमीक्रॉन जुन्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा तीन पट वेगाने पसरत असल्याने आवश्यक तेथे रात्रीचा कर्फ्यू लावण्याच्या सूचना केंद्र सरकराने राज्यांना केल्या आहेत. महाराष्ट्र आणि दिल्ली येथे या रुग्णांची वाढ सर्वाधिक आहे. 


कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची मोठी चर्चा झाली होती पण कोरोनाने परतीचा प्रवास सुरु केल्याने ही लाट आता येणार नाही असा अंदाज व्यक्त होऊ लागला होता. यातच ओमीक्रॉन व्हेरिएंटचा प्रवेश झाला आणि पुन्हा एकदा देशाची झोप उडवली आहे. ओमीक्रॉनचे रुग्ण रोजच आणि वेगाने वाढत असल्याचे चिंता व्यक्त होत असून केंद्र आणि राज्य सरकार अत्यंत सतर्क झाले आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि विशेषतः दुसऱ्या लाटेत प्रचंड नुकसान झाले आहे त्यामुळे शासन आणि प्रशासन पातळीवर अधिक सतर्कता बाळगली जात आहे. ओमीक्रॉन हा जुन्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा तिप्पट वेगाने पसरत आहे त्यामुळे त्याला अधिक गंभीरपणे घेतले जावे अशी सूचना केंद्राने राज्यांना दिली आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारांना पत्र पाठवून ओमीक्रॉन संदर्भात दक्षता घेण्याबाबत सावध केले आहे. राज्यांनी वॉर रूम सक्रिय करावी, ओमीक्रॉन आणि डेल्टा हे दोन्ही विषाणू अद्यापही तळ ठोकून आहेत त्यामुळे स्थानिक आणि जिल्हा पातळीवर तातडीने उपाययोजना केली जावी असे केंद्राने सांगितले आहे. 

देशात ओमीक्रॉनचा शिरकाव झाला असला तरी काही राज्यात अजूनही याचा प्रवेश नाही. त्यामुळे त्याचा प्रवेश रोखण्यासाठी खबरदारी घ्यावी शिवाय गरज पडल्यास रात्रीची संचारबंदी लागू करावी अशा सूचनाही केंद्राने राज्यांना दिलेल्या आहेत.  देशात ओमीक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढली असून आता ती २०२ झाली आहे. महाराष्ट्र आणि दिल्ली येथेच सर्वाधिक रुग्ण असून दोन्ही राज्यातील संख्या प्रत्येकी ५४ झाली आहे त्यामुळे या दोन राज्यात अधिक दक्षता आवश्यक आहे. शंभर टक्के लसीकरण आवश्यक असून घरोघरी जाऊन ओमीक्रॉनच्या तपासण्या करण्यात याव्यात असेही केंद्राने सुचविले आहे.  


लसीकरण आवश्यक असल्याचे शासन सांगत असताना दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने वेगळीच माहिती दिली आहे. लसीकरण झालेल्या व्यक्तीलाही ओमीक्रॉनची बाधा होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले असल्यामुळे चिंता अधिकच वाढत आहे. लसीचे दोन्ही डोस घेतलेले ८१ टक्के रुग्ण ओमीक्रॉनबाधित झाले आहेत. लस घेतलेल्यानाही ओमीक्रॉनची बाधा होत असून ज्यांना या आधी कोरोना झाला होता अशा व्यक्तीही संक्रमित होत आहेत. काही व्यक्तींनी फायझर लसीचा तिसरा बूस्टर डोस घेतलेला असूनही त्यांना ओमीक्रॉनची बाधा झाली आहे. परंतु या रुग्णात लक्षणे सौम्य असून गंभीर स्थिती निर्माण झालेली नाही. लसीकरण झालेल्या व्यक्तींना धोका कमी असतो हे देखील समोर आलेले आहे. 


हे वाचाच : >>>  चेष्टेचा विषय बनलेल्या अभिनेते गणपत पाटील यांचा आक्रोश !


महाराष्ट्रात ५४ व्यक्तींना ओमीक्रॉनचा फटका बसला असून यातील ४४ व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत तर लस न घेतलेले दहा रुग्ण आहेत. यात दोन व्यक्ती वयस्कर तर आठ व्यक्ती अल्पवयीन आहेत.  ओमीक्रॉन ट्रान्समिशनला रोखण्यात लस प्रभावी नसली तरी गंभीर आजारापासून वाचवू शकते असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे. लसीकरण आणि कोरोना प्रतिबंधाचे नियम प्रत्येकाने पाळणे आता अत्यावश्यक बनले आहे. रुग्णांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक असतानाच या संख्येत सातत्याने वाढ होत गेल्यास निर्बंध लावले जाणे स्वाभाविक ठरणार आहे.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !