BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२१ डिसें, २०२१

पंढरीत भाविकाची लाखोंची चोरी, चोर सुटले मोकाट !



पंढरपूर : अलीकडे पंढरीत चोर मोकाट सुटले असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या चोऱ्या वाढल्या असतानाच आता धर्मशाळेत घुसून भाविकांच्या लाखो रुपयांच्या ऐवजाची चोरी केल्याचे समोर आले आहे. 

पंढरपूर शहर आणि उपनगरात गेल्या काही महिन्यात चोऱ्या वाढलेल्या आहेत. नागरिकांच्या घराला कुलूप दिसले की रात्री त्या घरात चोरी होत आहे. पोलिसांनी यातील काही चोऱ्यांचा यशस्वी तपास लावला आणि चोरांना गजाआड देखील केले आहे पण चोरट्यांची दहशत काही केल्या कमी होत नाही. उपनगरी भागात तर नागरिकांच्या मनावर चोरट्यांची दहशत कायम असून परगावी जाण्याचे धाडस केले जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे पण आता पंढरीला येणारे भाविकही सुरक्षित नसल्याचे काही घटनावरून दिसून येऊ लागले आहे.  चंद्रभागेच्या पात्रात भाविक स्नासासाठी गेले असता त्यांच्या चोऱ्या होण्याचे प्रकार तसे जुनेच आहेत पण आता भाविकांच्या निवासाच्या ठिकाणीही चोरटे डल्ला मारू लागले आहेत. अशा घटनामुळे पंढरीला येणाऱ्या भाविकांची मालमत्ता सुरक्षित राहिलेली नाही याची जाणीव होऊ लागली आहे. 


वसई तालुक्यातील जांभूळपाडा येथील भाविकांची धर्मशाळेतून चोरी होण्याची धक्कादायक घटना काल घडल्याचे समोर आले आहे. आगरी धर्मशाळेत निवासाला थांबलेल्या भाविकांची ४ लाख ३६ हजार रुपयांची चोरी करून अज्ञात चोर पसार झाले आहेत. व्यवसायाने मजूर ठेकेदार असलेले सचिन चिंतामणी माळवी हे आपल्या कुटुंबासह दर्शनासाठी पंढरीत आले होते. नेहमी सुरक्षित असलेल्या आगरी धर्मशाळेत ते मुक्कामाला थांबले होते. पहाटेच्या वेळी सचिन माळवी यांच्या पत्नी सुनिता या चंद्रभागा स्नानासाठी गेल्या. जाताना त्यांनी दरवाजा अर्धवट उघडा ठेवला होता. त्या स्नान करून परत आल्या असता खुंटीला अडकवलेली बॅग जागेवर नसल्याचे दिसून आले. त्यांनी आपल्या पाटील उठवत बॅग नसल्याचे निदर्शनास आणून दिले. 

सदर बॅगेत रोख रक्कम आणि दागिने होते परंतु ही बॅग काही वेळेत चोरटयांनी लंपास केली होती. या बागेत रोख ६० हजार रुपये, २ लाख ४० हजार रुपये किमतीची ५ तोळे सोन्याची साखळी, ९६ हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, २५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल, १५ हजार रुपये किमतीचे घड्याळ असा ४ लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज चोरटयांनी काही वेळेत लंपास केला आहे. या घटनेची फिर्याद पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. 

पंढरीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकंना चोरांनी आता टार्गेट करायला सुरुवात केल्याचे काही घटनांतून दिसू लागले आहे. मंदिर परिसरात महिला भाविकांच्या गळ्यातील दागिनेही असुरक्षित झाले आहेत. मार्गशीर्ष महिना असल्याने विष्णुपद येथे भाविकांची गर्दी होते पण याचाही गैरफायदा चोरटे उठवत आहेत. महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेले जात आहेत. नुकतेच पंढरपूर येथील संपदा सुधीर पिटके यांच्या गळ्यातील २५ हजार रुपयांचे दागिने चोरटयांनी लांबवले तर सांगोला येथील मंदाबाई बबन भगत यांच्या गळ्यातील ३२ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने चोरण्यात आले. पंढरपूर तालुक्यातील अनवली येथील लीलावती ज्ञानेश्वर शिंदे, परभणी जिल्ह्यातील नागेंद्र अनंतवार, इस्लामपूर येथील अरुण गुरव यांचेही लाखो रुपयांचे दागिने चोरटयांनी लंपास केल्याच्या घटना ताज्या आहेत. 

सातत्याने घडणाऱ्या चोऱ्यांच्या या घटनांमुळे चोरट्यांचे मनोधैर्य चांगलेच वाढले असल्याचे दिसत आहेत. घरफोड्यांच्या घटना एकापाठोपाठ एक घडत होत्या आणि आता भाविकांच्या चोऱ्या सतत होताना दिसत आहेत. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मालमत्ता सुरक्षित नसल्याचे यामुळे समोर आले असून अशा घटना जर वाढतच राहिल्या तर भाविकांना पंढरीला येण्याची देखील भीती वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्रासह देशभरातून भाविक नियमितपणे पंढरीत येत असतात आणि येथे घडलेल्या चोऱ्यांची चर्चा राज्यभर पसरत असते. त्यामुळे पंढरी आणि पंढरीतील पोलीस यंत्रणा बदनाम होण्याचाही मोठा धोका आहे. भाविकांची मालमत्ता सुरक्षित राहावी यासाठी पोलिसांनी आता विशेष मोहीम राबविण्याची, आणि भाविकांच्या सोन्यानाण्यावर डल्ला मारणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे.  अन्यथा पंढरीला येण्यापूर्वी भाविक पुन्हा पुन्हा विचार करतील ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !