BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ डिसें, २०२१

वर्तमानपत्रातील खाद्यपदार्थ जीवघेणे, प्रशासनाचा इशारा !!

 


सोलापूर : वर्तमानपत्रातील खाद्यपदार्थ हे घातक ठरत असून याबाबत आता सोलापूर अन्न व औषध प्रशासनाने कडक सूचना दिल्या आहेत. 


कोठेही गेले तरी वर्तमानपत्राच्या कागदात गरमागरम वडा अथवा भजी तसेच अन्य खाद्य पदार्थ बांधून दिले जातात. परंतु ते आरोग्यास हानिकारक आहेत. काही जणांना हे माहित असूनही त्याकडे दुर्लक्ष करतात आणि खाद्य पदार्थ व्यावसायिक आपली सोय पाहतात. यात ग्राहकाच्या आरोग्याला मोठी हानी होत असल्याचे यापूर्वीच समोर आले आहे पण अशा विक्रेत्यांवर कुणाचे नियंत्रण न राहिल्याने चौकाचौकात हीच परिस्थती दिसून येते. आता मात्र सोलापूर अन्न आणि औषध प्रशासनानेही याबाबत कडक ताकीद दिली असून अशा विक्रेत्यांवर आता कारवाईही करण्यात येणार आहे.

 

वृत्तपत्र छापण्यासाठी वापरली जाणारी शाई ही केमिकलयुक्त असते त्यामुळे हे केमिकल आरोग्यास अत्यंत नुकसानकारक असते. डायआयब्युटाइल फटालेट व डायइन आयसोब्युटाइल अशा केमिकलचा वापर या शाईत केलेला असतो. हे रसायन आरोग्याला अत्यंत घातक असते. ही शाई पोटात जाते तेंव्हा पचनक्रियेत बिघाड तर होतोच पण पोटाचे अन्य विकारही होतात. त्यामुळे आता अन्न आणि औषध प्रशासनाने नव्याने आदेश काढून वर्तमानपत्राच्या कागदात असे खाद्य पदार्थ बांधून देण्यास मनाई करण्यात आली आहे. 

  

दुकानदार आणि हॉटेल व्यावसायिक तसेच अन्य कोणत्याही व्यावसायिकास आता वर्तमानपत्राच्या कागदात खाद्य पदार्थ बांधून देता येणार नाहीत. या नियमांचे पालन न  केल्यास त्यांच्यावर मोठी कारवाईही करण्यात येणार आहे. शाईतील केमिकल आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे हे फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड ऍथॉरिटी ऑफ इंडिया यांनी आधीच सांगितलेले आहे. याबाबतच्या नियमांचे काटेकोर पालन केले जावे अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा अन्न, औषध प्रशासन सहायक आयुक्त प्रदीपकुमार राऊत यांनी दिला आहे.   

रस्त्यावरील हातगाड्यापासून हॉटेलमध्येही खाद्य पदार्थ देण्यास सर्रास वर्तमानपत्राच्या कागदांचा वापर केला जातो. गरमगरम पदार्थ दिल्यामुळे वर्तमानपत्र छापण्यासाठी वापरली गेलेली शाई अन्नपदार्थात शोषली जाते. या पदार्थातून ती शाई आणि त्यातील घातक केमिकल थेट पोटात जाते त्यामुळे हे अत्यंत धोकादायक आहे. व्यावसायिकांनी तर अशा कागदांचा वापर करूच नये पण कुणी अशा कागदात पदार्थ देत असेल तर ग्राहकाने ते घेऊ नयेत हेच फायद्याचे ठरणार आहे.

  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !