शोध न्यूज : लाचखोरी सगळीकडेच बोकाळली असताना मंदिर संस्थानचा लेखाधिकारी तब्बल सहा लाखांची लाच घेताना पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पवित्र मंदिराच्या वातावरणात राहूनही त्याने तब्बल दहा लाखांची लाच मागितली आणि गोत्यात आला.
फुकटच्या पैशाचा मोह वाढू लागलेला असून, मोठ्या अधिकाऱ्यापासून तळातील शिपायापर्यंत अनेकांना लाचेच्या पैशाचा मोह अधिक असल्याचे दिसत आहे. भले मोठे पगार असतानाही चिरीमिरीसाठी त्यांचा जीव गुदमरतो आणि एक दिवस तुरुंगात मात्र तुरुंगाची हवा खावी लागते. राज्यात रोज कित्येक ठिकाणी लाचखोर आढळून येतात आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकतात. फुकटचे पैसे गोत्यात आणतात हे आजूबाजूला दिसत असतानाही चटावलेले अधिकारी, कर्मचारी त्याकडे दुर्लक्ष करतात. आपण खूप हुशारीने लाच घेतो अशी त्यांची गैरसमजूत असते आणि त्यातून तो धाडस करतो पण अखेर त्याच्या अंगलट येत असते. आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या वातावरणात राहूनही एका अधिकाऱ्याला मोठ्या लाचेचा मोह झाला आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. या घटनेने तुळजापूर, धाराशिव परिसरात मोठी खळबळ तर उडालीच आहे पण या लाचखोरीची मोठी चर्चाही सुरु झाली आहे.
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा वित्त व लेखा अधिकारी सिद्धेश्वर मधुकर शिंदे याला फुकटच्या पैशाचा मोह झाला आणि त्याने तब्बल दहा लाख रुपये लाचेची मागणी केली. सहा लाखांची लाच घेताना मात्र तो लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात अडकला गेला आणि त्याला रंगेहात पकडून तुरुंगात पाठविण्यात आले आहे. तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित सैनिकी विद्यालय असून या विद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे काम काम करणा-या शासकीय ठेकेदाराकडून ६ लाख रूपयांची लाच घेताना तो रंगेहात पकडला गेला आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे तसेच प्रवेशद्वार, संरक्षक भिंतीचे ३ कोटी ८८ लाखाचे काम एका सरकारी ठेकेदारास मिळाले आहे. ही काम सुरु असून अंतिम टप्प्यात आलेले आहे. ठेकेदाराने ९० टक्के काम पूर्ण केले आहे. त्याचे दोन कोटी पेक्षा अधिकचे बिल याच लाचखोर शिंदे याने ठेकेदाराला मिळवून दिले आहे. परंतु उरलेले बिल आणि सुरक्षा रक्कम असे ३४ लाख ६० हजार ५७९ रूपये ठेकेदाराला येणे आहे. ही रक्कम परत मिळवून देण्यासाठी लाचखोर अधिकाऱ्याने सदर ठेकेदाराकडे तब्बल १० लाख रुपये लाचेची मागणी केली होती. यात तडजोड होत सहा लाखांची लाच देण्याचे निश्चित झाले होते.
एवढ्या मोठ्या रकमेची लाच शिंदे याने मागितली आणि सहा लाखांवर अंतिम सौदा झाला पण सदर ठेकेदाराला ही लाच देणे मान्य नव्हते त्यामुळे त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले आणि आपली तक्रार दिली. एसीबीने या तक्रारीची पडताळणी केली आणि लाच मागितली असल्याचे दिसून येताच त्यांनी सापळा लावला. (Temple Trust officials are red handed in accepting bribes) ठरल्याप्रमाणे ठेकेदाराने या अधिकाऱ्यास सहा लाख रुपयांची लाच दिली आणि त्याच क्षणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला, लाच घेताना रंगेहात पकडले. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर अधिकाऱ्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. या घटनेने तुळजापूर चकित झाले असून, परिसरात आणि जिल्हाभर लाचखोर अधिकाऱ्याची चर्चा सुरु झाली आहे. लाचखोरांची भूक देखील किती मोठी असते हे घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !