BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ फेब्रु, २०२४

आता भाजप नगरसेवकावर गोळीबार ! राज्यात नक्की चाललंय तरी काय ?

 


शोध न्यूज : भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने शिवसेनेच्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार केल्याची घटना राज्यभर नव्हे तर देशभर चर्चिली जात असतानाच आता भाजपच्या माजी नगर सेवकावर भर दिवसा गोळीबार करण्यात आल्याची आणखी एक घटना घडली आहे.


भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी, भर पोलीस ठाण्यात आणि पोलीस निरीक्षकाच्या कक्षात अंदाधुंद गोळीबार केला. समोरच्या व्यक्ती शांत बसलेल्या असताना त्यांचावर गोळ्यामागून गोळ्या झाडल्या. आपण स्वसंरक्षणासाठी गोळ्या झाडल्या असल्याचे लंगडे समर्थन या आमदाराने केले पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये सगळे समोर आले.  या घटनेने भारतीय जनता पक्षाकडे असलेल्या गृह खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अनेकांनी राजीनामा मागितला. गृह विभाग हा केवळ नावापुरता उरला असल्याची साक्ष देणाऱ्या अनेक घटना महाराष्ट्रात घडत आहेत. भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र सत्तेत आहेत पण त्यांचे आमदार आणि  कार्यकर्ते गोळ्या झाडत सुटले आहेत. महाराष्ट्रात कधी नव्हे ते चित्र आणि भयानक वास्तव पाहायला मिळू लागले आहे. त्यातच आता जळगाव येथे भर दिवसा गोळीबाराची मोठी घटना समोर आली आहे. 


चाळीसगाव येथील माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्यावर हा जीवघेणा गोळीबार झाला आहे, मोरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. भर दुपारी ही थरारक घटना घडली असून, गुन्हेगारांना आता कायद्याचे कसलेच भय उरले नाही. असेच पुन्हा पुन्हा दिसून येत आहे. बाळू मोरे यांच्यावर करण्यात आलेल्या गोळीबारामुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. देवरे हॉस्पिटलच्या समोर घडलेली ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. त्यात एका कारमधून पाच जण उतरताना दिसत आहेत. त्यांनी तोंडाला रूमाल बांधला असल्याचे दिसत आहे. एका पाठोपाठ एक असे पाच जण हातात बंदुका घेवून आले आणि त्यांनी गोळीबार केला. माजी नगरसेवक हे थोडक्यात बचावले असले तरी त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. 


ही घटना घडल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले, पोलीस देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हा गोळीबार नेमका कशामुळे झाला याची माहिती लगेच मिळाली नाही परंतु पोलिसांनी जलद गतीने याचा तपास सुरु केला आहे.  शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याच्या घटनेनंतर लगेचच ही मोठी घटना घडली  आहे. (Firing on BJP corporator) लोकसभा निवडणूक जवळ आली आहे त्यामुळे सामान्य नागरिकात देखील चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्याचे गृह खाते आणि त्या खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत तसेच भाजपाबाबत जनतेतून आधीच रोष असताना, आता अधिकची नाराजी वाढू लागली आहे. 

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !