शोध न्यूज : जलसंपदा विभागाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला असून, कालवा ओव्हर फ्लो झाल्यामुळे पाणी घुसून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तर रस्त्यावर देखील हा पूर आला आहे.
कालव्यातून सोडलेल्या पाण्याचे नियोजन व्यवस्थित झाले नाही तर अनेकदा कालवा फुटून बळीराजाच्या पिकात पाणी घुसते आणि कष्टाने जोपासलेले पिक नष्ट होते, माती वाहून गेल्याने शेतीचेही मोठे नुकसान होते, कालव्यातून पाणी सोडल्यानंतर ते पाणी योग्य दाबाने प्रवाहित राहील याची काळजी घेणे जलसंपदा विभागाची मोठी जबाबदारी असते. अधिकारी अथवा कर्मचारी यांनी थोडीशी बेफिकिरी केली तरी कालवा फुटण्याची भीती असते. सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ कालवा मात्र फुटला नाही तरी देखील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हैसाळ कालवा ओव्हर फ्लो झाल्यामुळे कालव्यातील पाणी वाट मिळेल तिकडे धावत सुटले आणि बळीराजाला नुकसानीचा सामना करावा लागला आहे. जलसंपदा विभागाच्या बेपर्वाईचे नमुने नेहमीच समोर येत असतात आणि आता पुन्हा या कालव्याबाबत तसेच घडले आहे. पाणी मोकाट वाहू लागल्यानंतर अधिकारी आणि कर्मचारी यांना जाग आली असल्याचे दिसत आहे.
कालवा ओव्हर फ्लो झाल्याने शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान तर झालेच आहे पण रस्त्यावर देखील हे पाणी आले आहे. कालव्याच्या जवळ असलेल्या शेतात पाणीच पाणी झाले आहे. बेडग रस्त्यावरील वाहतूक देखील या पाण्यामुळे बंद पडली असून पिकांचे देखील मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे. मिरज तालुक्यातील बेडग येथील म्हैसाळ योजनेच्या मुख्य कालवा पंप हाऊस टप्पा क्र. तीन मधील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने कालवा ओव्हरफ्लो झाला. वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे शेत जमिनीमधील माती खरडून गेली आहे. (Canal overflow, loss to farmers) मिरज पूर्व भागात शेतकऱ्यांना २४ तासाला २५ हजार रुपये भरून कालव्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. पैसे भरूनही समाधानकारक पाणी मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांची आहे. एवढे पैसे मोजून देखील पुरेसे पाणी मिळत नाही अशी तक्रार शेतकरी करीत आहेत.
मागील वर्षी पाऊस कमी झाला आहे त्यामुळे आधीच शेतकरी चिंतेत आहे, दुष्काळाची मोठी भीती यावर्षी असून, पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. अजून उन्हाळा सुरु झाला नाही तरी अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवू लागली आहे त्यामुळे पुढील चार पाच महिने हे मोठ्या टंचाईचे जाणार आहेत. अशा परिस्थितीत पाण्याची झालेली ही नासाडी पाहून संताप व्यक्त होत आहे. या नासाडीला संबधित अधिकारी हेच जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी करू लागले आहेत. अशा घटना घडल्या की अधिकारी, कर्मचारी यांच्यावर जुजबी कारवाई होते परंतु बळीराजाचे मात्र मोठे नुकसान होत असते.
अशा घटनांना दुसरीही एक बाजू आहे पण त्याकडे कुणी पहात नाही, जलसंपदा विभागात कर्मचारी अत्यंत अपुरे आहेत, गेल्या पाच सहा वर्षांपासून शाखा कार्यालये ओस पडू लागली आहेत. पाण्याचे नियोजन करण्यासाठी पुरेसे कर्मचारी लागतात तर नियंत्रण ठेवण्यासाठी शाखाधिकारी आवश्यक असतात. गेल्या काही काळापासून अनेक शाखांना अधिकारीच मिळत नसून, एकाकडे अनेक शाखांचा कारभार दिलेला असतो, त्यामुळे एकट्याला हे सांभाळणे कठीण जाते, शिवाय साईटवर काम करणारे कर्मचारी तर अत्यंत अपुरे आहेत. राज्य शासन नव्या नियुक्त्या करीत नाही परंतु त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे दिसत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !