शोध न्यूज : वाळू चोरांची मस्ती आणि माज पुन्हा एकदा समोर आला असून, वाळू चोरांनी आता तर थेट उपजिल्हाधिकारी यांच्यावरच प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेने महसूल विभाग संतापला आहे.
महाराष्ट्रात वाळू चोरी ही अलीकडे आम बात बनली आहे. सगळीकडे बिनधास्तपणे वाळूची तस्करी होत आहे, प्रशासन वाळू चोरांच्या विरोधात सतत कारवाया करीत असतात पण या कारवायाबाबत जनतेच्या मनात कायम शंका असते. एकीकडे करावाई होत असते तर दुसरीकडे राजरोसपणे वाळू चोरी होत असते, या वाळूच्या चोरीत कुणाकुणाचे हात बरबटून गेलेले असतात याचीही मोठी चर्चा जनतेत सुरु असते. काही अधिकारी आणि कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात देखील अडकले आहेत. प्रशासनाने ठरवलेच तर सहज वाळू चोरीवर नियंत्रण येऊ शकते, मग ही वाळू चोरी कधीच का थांबत नाही ? याचे उत्तर मात्र कुणीच देत नाही. आजवर अनेक अधिकारी, कर्मचारी यांच्यावर वाळू चोरांनी हल्ले केले आहेत, पोलिसांच्या अंगावर वाहने घालण्यापर्यंत यांची मजल गेली आहे, तरीही प्रशासनाला राग कसा येत नाही ? हा सवाल देखील कायम अनुत्तरीत राहिला आहे. आता तर थेट उप जिल्हाधिकारी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात वाळू तस्करांचा मोठा बोलबाला आहे, शासन अथवा प्रशासन यांची कसलीच तमा न बाळगता हे वाळू चोर माजले आहेत. त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी निवासी उप जिल्हाधिकारी सोपान कासार हे नशिराबाद येथे गेले असता, त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न वाळू चोरांनी केला आहे. वाळू माफियावर धाड टाकण्यासाठी गेलेले सोपान कासार हे रक्तबंबाळ होऊन तेथून थेट रुग्णालयात गेले आहेत. दगडफेकीसह त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. वाळू चोरांनी उच्छाद मांडल्यामुळे उप जिल्हाधिकारी सोपान कासार हे आपल्या पथकासह रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास नशिराबाद येथे गेले होते. (Officer assaulted by sand thieves) अपेक्षेप्रमाणे तेथे त्यांना वाळू चोरीचा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहायला मिळाला. त्यांनी वाळू वाहतूक करणाऱ्या दोन डम्परवर कारवाई करणे सुरु केले आणि याचवेळी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. अचानक आलेल्या वाळू चोरांनी उप जिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर लोखंडी रॉड आणि काठ्यांनी हल्ला चढवला.
वाळू चोरांच्या या हल्ल्यात कासार जबर जखमी झाले तोच काहींनी त्यांच्या शासकीय वाहनावर तुफान दगडफेक सुरु केली. या दगडफेकीत वाहनाच्या काचा देखील फुटल्या. या सर्व घटनेचे चित्रीकरण त्यांच्या पथकातील एक कर्मचारी करीत होता, हे पाहून त्याचा मोबाईल देखील वाळू चोरांनी हिसकावून घेतला आणि तो फोडून टाकला. अंधारात हा सगळा राडा सुरु होता. लोखणी रॉड आणि काठ्या मारून कासार यांच्यावर हल्ला चढवल्याने ते राक्तबंबाळ झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान या घटनेने मोठी खळबळ उडवून दिली असून प्रशासन हादरून गेले आहे. या घटनेची माहिती मिळताच, जिल्हाधिकारी यांनी नाकाबंदीचे आदेश दिले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक आणि त्यांचा ताफा देखील तातडीने घटनास्थळावर दाखल झाला आहे. एवढ्या मोठ्या घटनेने प्रचंड खळबळ तर उडालीच आहे पण, आत्ता तरी प्रशासन मनापासून काम करून वाळू चोरांना वठणीवर आणणार काय ? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !