शोध न्यूज : राष्ट्रवादी पक्ष आणि निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला गेल्याने राज्यभरातून निवडणूक आयोगावर प्रचंड टीका होत असतानाच शरद पवार यांच्या पक्षाचे नवे नाव निश्चित झाले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
अपेक्षेप्रमाणेच राष्ट्रवादीच्या दोन गटातील वादाचा निवडणूक आयोगाने निकाल लावला आहे. निवडणूक आयोग आणि त्याचे निर्णय हे मागील काही काळापासून संशयाच्या भोवऱ्यात आहेत. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना, याच निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना बहाल केली. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तेंव्हा एकनाथ शिंदे यांचे वय काय असावे याचा अंदाज केला तरी पुरेसे आहे. ठाकरे यांची शिवसेना शिंदे यांना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आणि अवघा महाराष्ट्र या निर्णयावर हसला. देशात कायदा, घटना, नियम कसे वाकवले जात आहेत यावर अनेकांनी भाष्य केले. कुणाच्या तरी हातातील बाहुले बनून ते नाचवतील तसा कायदा नाचू लागला आणि अवघा देश हे पहात राहिला. शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह गेले पण याचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फायदाच झाला. ठाकरे यांना मोठी सहानुभूती मिळू लागली असून, ती वरचेवर वाढत असल्याचे सोशल मीडियावरून व्यक्त होत आहे. आता अशीच सहानुभूती शरद पवार यांच्या गटाला मिळताना दिसत आहे.
वयोवृद्ध काकांच्या पक्षावर चुलत्याने टाकलेला दरोडा, महाराष्ट्राला कधीच रुचणार नाही. निवडणूक आयोगाने अपेक्षेप्रमाणे शरद पवार यांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी पक्ष अजित पवार यांना देवून टाकला. शिवसेनेच्या निकालानंतर राष्ट्रवादीचा निकाल देखील वेगळा येणार नाही अशी अनेकांना खात्रीच होती आणि त्याप्रमाणे अखेर घडले. आता शरद पवार यांना राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह वापरता येणार नाही. त्यामुळे नवे नाव आणि चिन्ह याबाबत राष्ट्रवादीला आजच निवडणूक आयोगाला माहिती द्यावी लागणार आहे. दरम्यान हा निकाल लागल्यानंतर जयंत पाटील यांनी ट्वीट करून "आमचा पक्ष आणि चिन्ह शरद पवार " असे म्हटले आहे. त्यामुळे या विषयाची चर्चा अधिक झाली आहे. राज्यसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे पक्षाच्या नव्या नावासाठी तीन पर्याय द्यावे लागणार आहेत. तीन नावे आणि तीन चिन्हे निवडणूक आयोगाला आजच सादर करावी लागणार आहेत. आज दुपारी चार वाजेपर्यंत ही मुदत देण्यात आलेली आहे, त्यामुळे ही नावे आणि चिन्हे आजच शरद पवार गटाकडून दिली जाणार आहेत.
निवडणूक आयोगाला नावे आणि चिन्हे सादर केली नाहीत तर शरद पवार गटाला अपक्ष म्हणून मान्यता मिळेल त्यामुळे ही नावे आणि चिन्हे आजच सादर करावी लागणार आहेत. शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळालेली आहे. शरद पवार गटाने याबाबत तीन नावे निश्चित केली असल्याची माहिती पुढे आली आहे. यात "मी राष्ट्रवादी पार्टी" हे पक्षाचे नाव आणि 'उगवता सूर्य" हे निवडणूक चिन्ह मिळावे अशी मागणी शरद पवार यांच्या गटाकडून निवडणूक आयोगाकडे केली जाणार आहे अशी माहिती आहे. (The new name of Sharad Pawar's party was decided) या गटाने चार निवडणूक चिन्हे निवडली असल्याचे देखील सांगितले जात आहे. यात 'चष्मा' या चिन्हाचा देखील समावेश असल्याची माहिती आहे. दिले जाणारे नाव आणि चिन्ह हेच कायमस्वरूपी राहावे अशी पवार गटाची अपेक्षा आहे. निवडणूक आयोगाला पर्याय दिले तरी निवडणूक आयोग यावर अंतिम निर्णय घेणार आहे त्यामुळे शरद पवार गटाच्या पक्षाचे नवे नाव काय असेल आणि कोणते चिन्ह असेल याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
दरम्यान निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि निवडणूक चिन्ह अजित पवार यांना दिल्यानंतर राज्यात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. कुणी याला "अजित पवार यांनी आपल्याच घरावर घातलेला दरोडा" म्हणू लागले आहेत तर कुणी 'सत्तेसाठी केलेली गद्दारी' असे म्हणू लागले आहेत. या वयात शरद पवार यांना दिल्या जात असलेल्या यातनांबाबत देखील लोक नाराजी व्यक्त करू लागले आहेत तर दुसरीकडे, सत्तेसाठी आणि तुरुंगवारी वाचविण्यासाठी अजित पवार यांनी खेळलेला खेळ राजकीय पटलावर, त्यांच्यावरच उलटणार असल्याचे म्हटले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !