BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ जाने, २०२४

विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील आणि संचालक मोठ्या अडचणीत !

 



शोध न्यूज : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील आणि संचालक मंडळ एका मोठ्या अडचणीत येऊ लागले असून शिखर बँकेने त्यांचावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पंढरपूर तालुका ग्रामीण पोलींसांकडे केली आहे. 


राज्य बँकेचे अर्थात शिखर बँकेचे प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक व्यवस्थापक यांनी याबाबत लेखी तक्रार पोलिसांकडे केली आहे आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन अभिजित पाटील तसेच अन्य सर्व संचालक यांच्या विरोधात फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करावा असे म्हटले आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने वेळोवेळी मागणी केल्याप्रमाणे कारखान्यास ऊस गाळप हंगामासाठी वीज निर्मिती आणि इतर जोड निर्मितीसाठी कर्ज मर्यादा मंजूर करून उचल देण्यात आली आहे.  कारखान्याने मंजूर कर्जाच्या परतफेडीसाठी कारखान्याच्या मालकीची आणि वहिवाटीची मालमत्ता गहाणखताद्वारे बँकेस लिहून दिलेली आहे. त्यावर बँकेचा प्रथम बोजा आहे. त्याचप्रमाणे या कारखान्याने त्यांच्या जंगम मालमत्ता देखील हायपोथीकेशन करारानुसार गहाणात आहेत. सदर कारखान्याने वेळोवेळी कर्ज रकमांची परतफेड केली नसल्यामुळे सदर कर्ज खाते हे रिझर्व बँकेच्या निकषानुसार अनुत्पादित झालेले असून, सदर पूर्ण कर्ज आणि व्याज भरण्याकरिता २३ सप्टेंबर २०२१ रोजी बँकेने कारखान्याला नोटीस दिलेली होती.


सदर  नोटीस दिली असतानाही कारखान्याने आजपर्यंत सदर रक्कम भरलेली नाही. ३१ डिसेंबर २०२३ अखेरील २५२.४९ कोटी आणि व्याज १७७.६८ कोटी एवढी रक्कम कारखान्याकडून बँकेला येणे आहे. सदर कारखान्याने उत्पादित केलेल्या साखरेवर प्लेज करारानुसार बँकेचा प्रथम हक्क आहे. सदर साखर बाहेर विक्री करण्यापूर्वी, बँकेस प्रती क्विंटल ८०० रुपये याप्रमाणे भरणा कर्ज खात्यात करणे बंधनकारक  होते. हंगाम २०२२ -२३ या वर्षात ७.२६,१४२.१८ मे.टन उसाचे गाळप करून ६,६४,४२० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. त्यामुळे करारानुसार कारखान्याने बँकेकडे ५३.१५ कोटी रुपयांचा भरणा कर्ज खात्यात करणे बंधनकारक होते. तसेच वीज निर्मिती प्रकल्पातून वीज निर्मित करून विक्री केलेल्या रकमेतूनही रक्कम भरणे आवश्यक होते.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने २०२२-२३ या वर्षात २९६. ९९ युनिट विजेची निर्मिती केली आहे आणि बँकेच्या परवानगीशिवाय तिची विक्री केली आहे. विठ्ठल कारखान्याने ६४९०.०९ हजार लिटर इथेनॉलचे उत्पादन केले. त्याची देखील परस्पर विक्री करून बँकेच्या कर्ज खात्यात रकमेचा भरणा केला नाही.असेही या तक्रारीत म्हटले आहे.


विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाला बंकेसोबत केलेल्या करारांची माहिती आहे शिवाय कारखान्याच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सर्व निर्णयास सर्व संचालक हे वैयक्तिक आणि सामूहिकरीत्या जबाबदार ठरतात. बँकेचा प्रथम बोजा असताना देखील आणि बँकेने दिलेल्या कर्ज रकमेतून साखर, उप पदार्थाचे उत्पादन आणि वीज निर्मिती करून बँकेला नुकसान होण्याच्या दुष्ट हेतूने बँकेची कोणत्याही प्रकारे लेखी परवानगी न घेता बँकेचे आर्थिक नुकसान होण्याच्या हेतूने साखरेची, जोड उत्पादनाची आणि  विजेची विक्री केलेली आहे. (Vitthal sugar factory in trouble) यामुळे बँकेची आर्थिक फसवणूक झाली असून यामुळे बँकेचे मोठे नुकसान झालेले आहे. या गंभीर स्वरूपाच्या कृत्यास विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि संचालक जबाबदार आहेत असे देखील बँकेने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.


सर्व संचालकांनी केलेली बँकेची फसवणूक आणि कृत्ये ही अत्यंत अप्रामाणिकतेची असून त्यांचावर भारतीय दंड विधान १८६० मधील कलम ४०६, ४२०. ४२१,४२२. ४२३, ४२४ आणि कलम ३४ नुसार फौजदारी गुन्हा दाखल करावा, या संचालकांना योग्य ती शिक्षा मिळणे हे बँकेच्याच नव्हे तर सर्व बँकेचे ठेवीदार आणि सभासद यांच्याही हिताचे आहे. त्यामुळे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सर्व संचालकांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा असे पत्र, राज्य शिखर बँकेने पंढरपूर ग्रामीण पोलिसांना दिले आहे. यामुळे सभासद वर्गात खळबळ उडाली आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !