BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ जाने, २०२४

विठ्ठल साखर कारखाना चेअरमन अभिजित पाटील यांच्यासह संचालाकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल ! अंतरिम जामीन मंजूर !



शोध न्यूज : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील आणि संचालक मंडळमोठ्या अडचणीत आले  असून शिखर बँकेने केलेल्या तक्रारीवरून पाटील यांच्यासह सर्व संचालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन अभिजित पाटील तसेच अन्य सर्व संचालक यांच्या विरोधात फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करावा असे पत्र राज्य सहकारी अर्थात शिखर बँकेने पोलिसांना दिले होते. यावरून पंढरपूर तालुका आणि सोलापूर जिल्ह्यात बरीच चर्चा  झाली  होती. चेअरमन अभिजित पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून या प्रकरणी हात झटकण्याचे अयशस्वी प्रयत्न देखील केले होते. मागच्या संचालक मंडळाकडे बोट दाखवून नामानिराळे राहण्याचा त्यांचा प्रयत्न होता. कारखान्याने केलेल्या कोणत्याही कराराशी विद्यमान संचालक मंडळ जबाबदार असते ही बाब स्पष्ट असतानाही अभिजित पाटील हे भालके यांच्याकडे अंगुली निर्देश करीत होते. परंतु त्याचा कुठल्याच अर्थाने काहीही उपयोग झाला नसून, अखेर पोलिसांनी अभिजित पाटील आणि विद्यमान संचालक यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम ४२० नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे तालुक्यात आणि कारखाना सभासद वर्गात मोठी खळबळ  उडाली आहे. 


पंढपूर तालुक्यातील गुरसाळे येथील  विठ्ठल साखर कारखान्याने वेळोवेळी मागणी केल्याप्रमाणे कारखान्यास ऊस गाळप हंगामासाठी वीज निर्मिती आणि इतर जोड निर्मितीसाठी कर्ज मर्यादा मंजूर करून उचल देण्यात आली आहे.  कारखान्याने मंजूर कर्जाच्या परतफेडीसाठी कारखान्याच्या मालकीची आणि वहिवाटीची मालमत्ता गहाणखताद्वारे बँकेस लिहून दिलेली आहे. त्यावर बँकेचा प्रथम बोजा आहे. त्याचप्रमाणे या कारखान्याने त्यांच्या जंगम मालमत्ता देखील हायपोथीकेशन करारानुसार गहाणात आहेत. (Shikhar Bank cheated by Vitthal Sugar Factory) विठ्ठल  कारखान्याने वेळोवेळी कर्ज रकमांची परतफेड केली नाही,  पूर्ण कर्ज आणि व्याज भरण्याकरिता २३ सप्टेंबर २०२१ रोजी बँकेने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला नोटीस दिलेली होती. 


अंतरिम जामीन मंजूर !

विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील यांना न्यायालयाने अंतरिम जामीन दिला आहे. शिखर बँकेच्या तक्रारीनंतर पाटील यांनी न्यायालयात धाव घेतली होती, त्यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. 


कारखाना संचालक मंडळास शिखर बँकेशी करण्यात आलेल्या कराराची माहिती तर आहेच पण कारखाना म्हणून जे निर्णय घेतले जातात त्याची सर्व जबाबदारी ही संचालक मंडळाची असते, व्यक्तिगत आणि सामुहिकरित्या देखील संचालक मंडळ जबाबदार असते. राज्य सहकारी बँकेचे कर्ज असताना आणि कारखाना उत्पादनावर बँकेचा प्रथम बोजा असतानाही कर्ज आणि व्याजाचे हप्ते कारखान्याने भरले नाहीत. कारखान्याने साखरेचे उत्पादन केले, उप पदार्धाचेहे उत्पादन केले तसेच वीज निर्मिती केली. शिखर बँकेचा बोजा असतानाही परस्पर विक्री देखील केली त्यामुळे कारखान्याकडून बँकेची फसवणूक झाली असल्याचे बँकेने म्हटले आहे.  कारखान्याने उत्पादित केलेली साखर विक्री करण्याआधी, बँकेच्या कर्ज खात्यात भरणा करणे बंधनकारक होते परंतु तसे करण्यात आले नाही.  साखरेसह इथेनॉल आणी वीज यांची देखील परस्पर विक्री करण्यात आली परंतु बँकेत भरणा केला नाही, यामुळे बँकेची फसवणूक  करण्यात आली असून याला विद्यमान संचालक मंडळ जबाबदार आहे असे बँकेचे म्हणणे आहे. त्यानुसार बँकेने पोलिसांना गुन्हा दाखल  करण्याबाबत पत्र दिले होते. अखेर या प्रकरणी पोलिसांनी चेअरमन अभिजित पाटील आणि अन्य सर्व संचालक यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल  केला आहे. यामुळे विठ्ठल कारखाना आणि संचालक मंडळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.


विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडून ३१ डिसेंबर २०२३ अखेर २५२.४९ कोटी आणि व्याज १७७.६८ कोटी एवढी रक्कम बँकेला येणे आहे  त्यामुळे कारखान्याने निर्मिती केलेल्या साखरेवर प्लेज करारानुसार शिखर बँकेचा पहिला हक्क आहे. तरीही बँकेची कसलीही परवानगी न घेता साखर, इथेनॉल आणि विजेची विक्री केली  पण बँकेचे कर्ज अथवा व्याज दिले नाही त्यामुळे हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले.  सर्व संचालकांनी केलेली बँकेची फसवणूक आणि कृत्ये ही अत्यंत अप्रामाणिकतेची असल्याचेही बँकेने म्हटले आहे. कारखान्याने बँकेचा विश्वासघात आणि फसवणूक केली आहे म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


अभिजित पाटील आणि विद्यमान संचालकांच्या ताब्यात हा कारखाना येण्यापूर्वी हे कर्ज घेण्यात आले आहे तथापि त्यास विद्यमान संचालक  मंडळ जबाबदार असते. त्यामुळे विद्यमान संचालकांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्ज कुणाच्या काळात घेतले याला काहीच महत्व नसून, त्यास व्यक्ती नवे तर संचालक मंडळ जबाबदार असते. अर्थात अशी कारवाई राजकीय हेतूने झाली असे म्हणणे समर्थनिय होत नसते. शिखर बँकेने पोलिसांना पत्र दिल्यानंतर ही कारवाई होणे अपेक्षित होतेच त्याप्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, यामुळे काखाना सभासद आणि राजकीय वर्तुळात देखील मोठी खळबळ उडाली आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !