BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ जाने, २०२४

राष्ट्रवादीच्या नेत्याचा शिक्षिकेवर बलात्कार, पोलिसांचा मात्र निर्दोष ठरवणारा अहवाल !


शोध न्यूज : शिक्षिकेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल असलेले सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आता आणखी अडचणीत आले असून, ते निर्दोष असल्याचा पोलिसांनी सादर केलेला अहवाल न्यायालयाने फेटाळून लावला आहे. 


सोलापूर येथील राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर बलात्काराचा एक गुन्हा दाखल आहे.  एका शिक्षिकेने, आपल्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप करीत पोलिसात धाव घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मनोहर सपाटे हे सोलापूर जिल्ह्यातील मोठे नाव असल्यामुळे या तक्रारीची चर्चा राज्यभर झाली होती. त्यांच्या विरोधात शाळेतील शिक्षिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी 'ब' समरी अहवाल दाखल केला होता. सपाटे हे निर्दोष असल्याचा पोलिसांचा हा अहवाल होता पण न्यायालयाने तो फेटाळून लावला आहे.त्याबरोबरच या गुन्ह्यातील पुढील तपास करण्याचे आदेश फौजदार चावडी पोलिसांना देण्यात आले आहेत, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. के.जंगम यांच्यासमोर ही सुनावणी झाली आहे. यामुळे आता सपाटे यांच्या समोरील अडचणीत मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे.


या प्रकरणातील पिडीत शिक्षिका सोलापूर येथील  एका शाळेत नोकरीस असताना बलात्कार झाल्याचे म्हटले आहे. १९९३ साली याच शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष असलेले मनोहर सपाटे हे झेंडा वंदन करण्यासाठी शाळेत आले होते त्यावेळी त्यांनी सदर शिक्षिकेला, कार्यालयात बोलावून आपल्याशी शरीर संबध ठेवण्याबाबत सांगितले. लग्नाचे आमिष देखील त्यांनी दाखवले पण नकार दिल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देखील दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर सपाटे यांनी नोकरीवरून काढून टाकण्याची आणि जीवे ठार मारण्याची  धमकी देत अनेकवेळा शिक्षिकेवर अत्याचार केले. त्यानंतर सदर शिक्षिकेला खाजगी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत नोकरीचा राजीनामा देखील लिहून घेतला निवृत्तीच्या पैशाची मागणी केली असता सपाटे याने पीडितेकडेच दहा लाखाची मागणी केली. त्यावेळी पीडितेने घाबरून पैसे दिले. त्यानंतर सपाटे याने पुन्हा बंदुकीचा धाक दाखवून पीडितेव अत्याचार केला, अशी फिर्याद पीडित शिक्षिकेने दिली आहे.


या गुन्ह्याबाबत पोलिसांनी तपास करून, दहा साक्षीदारांचे जबाब घेत, सदर शिक्षिकेने दाखल केलेला हा गुन्हा खोटा आहे असा निष्कर्ष काढला आणि सपाटे यांच्या विरुद्ध कसलाही पुरावा मिळत नाही म्हणून ते निर्दोष असल्याचा 'ब' समरी अहवाल न्यायालयात दाखल केला. (NCP leader's problem with court orders) यावर सुनावणी होऊन त्यानंतर न्यायालयाने हा अहवाल फेटाळला आहे. तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने सपाटे यांच्या दबावाखाली आणि त्यांच्याच संस्थेत असलेल्या व्यक्तींचे जबाब घेतले आहेत. 


आरोपीला फायदा होईल असा पुरावा पोलिसांनी तयार केला असल्याचे एड. संतोष न्हावकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.फिर्यादीची हकीकत खरी आहे, असे सांगणाऱ्या साक्षीदारांनी पोलीस स्टेशनला अनेक हेलपाटे मारूनही त्यांचा पुरावा नोंदविणे व जवाब नोंदविण्याचे टाळले आहे. शिवाय सपाटे हेच साक्षीदारांना घेवून वारंवार पोलीस ठाण्यात आले होते, याबाबत शाबित करण्यासाठी पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी करण्यात आली  होती पण ते दिले गेले नाही. पोलिसांनी हा पुरावा नष्ट केला आहे असे देखील त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले  त्यांचा हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने पुढील आदेश दिले. यामुळे फौजदार चावडी पोलिसांवर मोठ्या नामुष्कीची वेळ आली तर सपाटे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !