शोध न्यूज : मराठा योद्धा मनोज जरांगे आंदोलनाचे वादळ घेवून मुंबईच्या वेशीवर धडकले असतानाच, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळली असल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे त्यांची सभा देखील रद्द करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणाची मागणी घेवून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील मराठ्यांचे वादळ पायी चालत मुंबईकडे कूच करीत आहे. मुंबईपर्यंत पोहोचत असताना त्यांना प्रत्येक गावात प्रचंड प्रतिसाद लाभला आहे आणि मराठा बांधवांनी विक्रमी गर्दी देखील केली आहे. आज २६ जानेवारीच्या दिवशी मराठ्यांचे हे वादळ वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये पहाटेच्या वेळेस जाऊन धडकले आणि आणि तेथून ते आझाद मैदानाच्या दिशने वाटचाल करीत आहे. दरम्यान, मराठ्यांचा हा सागर नवी मुंबई येथे पोहोचताच मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली असल्याचे समोर आले आहे. गेले काही दिवस ते चालत आहेत आणि त्यांना पुरेशी विश्रांतीही मिळालेली नाही, त्यामुळे त्यांची प्रकृती उपोषणाच्या आधीच बिघडली आहे. त्यांच्या पायाला सूज आलेली असून आज सकाळपासून त्यांना ताप आलेला आहे. यामुळे मराठा बांधव देखील चिंतेत आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या पायाला सूज आलेली असून, अंगात ताप आहे त्यामुळे आज माथाडी भवन येथे होणारी त्यांची सभा रद्द करण्यात आली आहे. आज सकाळी ९ वाजल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे वाशी येथील चौकात पोहोचत असून तेथे ते सभा घेणार आहेत तर तेथून ते आझाद मैदानाच्या दिशेने निघणार आहेत. कालपासून सरकारचे शिष्टमंडळ पुन्हा पुन्हा जरांगे यांना भेटत आहे आणि चर्चा करीत आहे तथापि, ही बोलणी फिसकटली जात आहेत. जरांगे पाटील आझाद मैदानावर पोहोचण्यापूर्वी आणखी एकदा सरकारी शिष्टमंडळ त्यांना भेटणार आहे. काल देखील लोणावळा येथे या शिष्टमंडळाने चर्चा केली पण ती निष्फळ ठरली. चर्चा सातत्याने होत आहे परंतु जरांगे यांच्या मागणीप्रमाणे होत नसल्याने चर्चेची केवळ औपचारिकताच ठरत आहे. त्यामुळे जरांगे पाटील करीत असलेल्या मागण्या अजून मान्य झाल्या नाहीत. मराठ्यांना मुंबईत येण्याची गरज पडणार नाही, त्या आधीच मागण्या मान्य होतील असे, सरकारमधील काही मंत्री सांगत होते परंतु तसे काही घडले नाही आणि मराठ्याचे वादळ अखेर मुंबत धडकले आहे. तोडगा मात्र काहीच निघाला नाही.
राज्यभरातून मराठा बांधव या वादळात सहभागी झाले आहेत त्यामुळे रस्त्यावर केवळ मराठा आणि मराठाच दिसत आहे. रस्त्यावर देखील वाहनांची कोंडी होताना दिसत आहे. रस्ते जाम झाले असून सरकारसाठी ही मोठी डोकेदुखी झाली आहे. (Manoj Jarange Patil's condition worsened) मुंबईत पोहोचल्यावर तर परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. आझाद मैदानाची क्षमता कमी असल्यामुळे आंदोलकांनी खारघर येथे थांबावे अशी विनंती पोलीस करीत आहेत. आजवर आझाद मैदान येथे अगणित आंदोलने झाली आहेत पण हे मैदान कमी पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. एवढ्या मोठ्या संख्येने मराठा वादळ मुंबईत धडकत आहे. मुंबईकर देखील मराठा बांधवांच्या सेवेसाठी पुढे सरसावले आहेत. अनेकांना मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची मात्र चिंता वाटू लागली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !