शोध न्यूज : राज्याचे उप मुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार हे थेट कुख्यात असलेल्या गुंडाच्या घरी गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, अनेकांनी टीका देखील केली आहे. गुंडाच्या घरी गेल्याने पार्थ पवार यांच्याबाबत मोठी चर्चा देखील सुरु झाली आहे.
काही राजकीय व्यक्ती या गुंडाशी संबंध ठेवत असल्याचे आरोप नेहमी ऐकायला मिळत असतात तर निवडणुकीत याचे चित्र प्रत्यक्षात पाहायला देखील मिळत असते. कायदा सुव्यवस्थेच्या गप्पा मारणारे अनेक नेते गुंडांची मदत घेत असतात ही मोठी विसंगती राजकारणात पहायला आणि अनुभवायलाही मिळत असते. अनेक वरिष्ठ नेत्यांचे दाउद इब्राहीम याच्याशी कसे संबंध आहेत याबाबत देखील अधूनमधून चर्चा होत असते. आता तर लोकसभा निवडणूक जवळ आली आहे आणि अशा परिस्थितीत राज्याचे उप मुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांचे चिरंजीव थेट गुंडाच्या घरी गेले आहेत. हा गुंड कुणी सामान्य नाही तर कुख्यात गुंड म्हणून त्याचा परिचय आहे. या भेटीचे फोटो देखील बाहेर आले आहेत. त्यामुळे खळबळ आणि चर्चा एकाचवेळी सुरु झाली आहे. साहजिकच राजकीय टीका देखील होऊ लागली आहे. या भेटीचे काहीही समर्थन केले तरी सामान्य जनतेला हे न पटणारे असून राजकारणाचा खरा चेहरा दाखविणारी ही घटना मानली जात आहे.
अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार आता या नव्या वादात सापडले आहेत. गजा मारणे नावाचा गुंड कुख्यात असून मोक्का, अपहरण, खंडणी अशा अनेक गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील तो आरोपी आहे. एवढेच नव्हे तर मारणे टोळीचा तो प्रमुख देखील आहे आणि त्यच्या घरी पार्थ पवार गेले आहेत याचा अनेकांना धक्का बसला आहे. गुंड नेत्यांचे उंबरे झिजवतात पण इथे पार्थ पवार हेच कुख्यात गुंडाच्या घरी गेले आहेत. पवार यांच्यावर अशी वेळ कशासाठी आली ? असा सवाल देखील आता विचारला जात आहे. अजित पवार हे तर कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जातात, कार्यकर्त्यांना मोठे मोठे उपदेश ते देत असतात आणि इकडे मात्र त्यांचेच चिरंजीव कुख्यात गुंडाच्या घरी जाऊन त्याची भेट घेतात याचे अनेकांना कोडे पडले आहे तर अनेक जणांनी यावर अत्यंत सडकून टीका देखील केली आहे. विशेष म्हणजे पार्थ पवार यांच्यासोबत शहराध्यक्ष दिपक मानकर, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे आणि माजी नगरसेवक बंडू केमसे हे देखील मारणे याच्या घरी गेले होते.
गजा मारणे याच्यावर अनेक गंभीर गुन्हे असून यातील सहापेक्षा अधिक गुन्हे हे खून केल्याचे आहेत. याच मारणे याच्यावर दोन वेळा मोक्का कायद्यांतर्गत कारवाई देखील करण्यात आलेली आहे. गजा मारणे याला मोक्कातून बाहेर काढावे म्हणून एका माजी खासदाराच्या माध्यमातून, अगदी मंत्रालयातून पुणे पोलिसांवर दबाव आणण्यात आला होता असे देखील सांगितले जाते. याच गजा मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका झाली होती तेंव्हा त्याने शेकडो गाड्या घेऊन, एक्स्प्रेस वे वरून शक्तीप्रदर्शन करीत पुण्यात तो दाखल झाला होता. यावेळी पुणे पोलिसांनी कडक भूमिका घेतली होती. पुण्यात या टोळीची मोठी दहशत असून गेल्या वीस वर्षांपासून गुन्हेगारीत आघाडीवर या गजा मारणे याचा समावेश आहे. (Ajit Pawar's son at the home of a notorious gangster) असे असतानाही, गजा मारणे याची पत्नी राजकीय कार्यकर्ती असल्यामुळे ते त्याच्या घरी गेले होते असे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सांगण्यात येत आहे. यावर शरद पवार गटाचे प्रवक्ते यांनी ट्वीट केले असून "सत्तेसाठी काहीही" असे म्हटले आहे.
शरद पवार गटाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी देखील यावर टीका केली असून, उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांनी कायदा सुव्यवस्था यावर काही भाष्य करणे हा एक मोठा विनोद आहे. राज्यात कायदा, सुव्यवस्था अबाधित असेल तर त्यांचे चिरंजीव गजा मारणे याची भेट कशासाठी घेतात ? अशा कुख्यात गुंडांना भेटणे हे ठीक नाही त्यामुळे निदान अजित पवार यांनी तरी आपल्या मुलाला समजवावे असे खडसे म्हणाले आहेत तर रुपाली पाटील यांनी या भेटीचे चक्क समर्थन केले आहे. अजितदादा हे कायदा सुव्यवस्था काटेकोर राबविण्यासाठी काम करतात, गजा मारणे यांच्या पत्नीने राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे आणि त्या स्थानिक लोक प्रतिनिधी आहेत. त्यामुळे पार्थ पवार गुंडाला भेटले असे म्हणणे चुकीचे असून, विरोधक जाणीवपूर्वक अशा बातम्या पसरवत आहेत असे समर्थन अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !