BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३० जाने, २०२४

धडकली दुचाकी आणि हवेत उडाले तीन मित्र ...तिघांचाही गेला जीव !

 


शोध न्यूज :अत्यंत थरारक अपघात होऊन सोलापूरच्या तीन तरुण मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची  घटना घडली असून मध्यरात्री झालेल्या या अपघाताने मोठी हळहळ व्यक्त होत आहे. अपघातस्थळी अक्षरश: रक्ताचा सडा पडल्याचे दिसत होते .


सगळीकडे अपघाताचे प्रमाण वाढत असताना वेग देखील अमर्याद होत आहे. तरुणाच्या हाती वाहन आले की वेगाच्या आणि सुरक्षेच्या सगळ्या मर्यादा पार होताना दिसतात आणि जीवन सुरु होण्याआधीच तरुणाचा शेवट होत असल्याचे विदारक चित्र समोर येत असते.  अशाच  प्रकारे सुसाट वेगात धावत असलेल्या दुचाकीचा अपघात होऊन सोलापुरातील तीन तरुण मित्रांचा दुर्दैवी अंत झाला आहे . इरण्णा बसलिंगप्पा मठपती (वय २३, रा. गुरुदेव दत्तनगर, नवदुर्गा मंदिराजवळ, सोलापूर), दिग्विजय श्रीधर सोमवंशी (वय २१, रा. जुळे सोलापूर, सोलापूर), निखिल मारुती कोळी (वय २३, रा. अक्षय सोसायटी, १६१, जुळे सोलापूर) हे तीन तरुण या अपघातात मृत्युमुखी पडले आहेत. या प्रकरणी पोलीस प्रवीण प्रभाकर कांबळे यांनी बाईक चालविणाऱ्या ईरण्णा मठपती याच्याविरुद्ध स्वतःसह इतरांच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याची फिर्याद दिल्याने गुन्हा नोंदला आहे.


या अपघतात मयत झालेले तिघे मित्र इरण्णा मठपती याच्या दुचाकीवरून निघाले होते.  मध्यरात्री दीडच्या सुमारास बाइक वेगात असल्याने अचानक बाइकचालकाचा ताबा सुटला. यावेळी ही दुचाकी महावीर चौकातील फुटपाथच्या  डिव्हायडरला वेगाने धडकली आणि जवळ असलेल्या  झाडावर जाऊन आदळली.  तिघेही मित्र हवेत  उडून पडले आणि जोराचा मार लागल्याने ते बेशुद्ध झाले. (Three killed in two-wheeler accident)  या दुर्घटनेची माहिती  मिळताच सोलापूर येथील  सदर बझार पोलिस ठाण्याचे हवालदार ए.पी. कंचे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील  तिघांनाही येथील शासकीय रुग्णालयात बेशुद्धावस्थेत दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासणी केली असता उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. अपघातस्थळी अत्यंत भयावह चित्र दिसत होते. फुटपाथच्या कडेला पडलेला रक्ताचा सडा आणि अस्ताव्यस्त पडलेल्या चपला हे दृश्य देखील  न पहावणारे होते. अंगावर काटा आणणारे हे दृश्य अनेकांना पहावत देखील  नव्हते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !