BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२९ जाने, २०२४

प्रणिताताई भालके होणार पंढरपूर - मंगळवेढ्याच्या 'आमदारीण' !

 


शोध न्यूज : लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच, पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाच्या आपणच आमदारीण होणार असल्याचा दावा, भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिताताई भालके यांनी केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे.


जनसामान्यांचे नेते दिवंगत आमदार भारतनाना भालके यांचे निधन झाल्याने पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झालेली आहे. एक एक माणूस जोडत भारतनाना भालके यांनी अफाट लोकसंग्रह केला होता. त्यांच्या निधनानंतर देखील तो भालके यांच्याच कुटुंबाच्या मागे उभा होता, अर्थात आजही आहे पण त्यात काहीशी घट झाल्याचे दिसत आहे आणि याला कारण देखील भगीरथ भालके हेच ठरले आहेत. भारतनानांची ही अफाट विरासत भगीरथ भालके यांना दुर्दैवाने टिकवता आली नाही. विधानसभा पोटनिवडणुकीत डोळे झाकून भगीरथ भालके यांचा विजय होईल असे वातावरण असताना, निसटत्या मतांनी का होईना पण त्यांचा पराभव झाला आणि नानांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला. राष्ट्रवादीत असलेली अंतर्गत धुसफूस आणि भगीरथ भालके यांनी दाखविलेला फाजील आत्मविश्वास यामुळे हा पराभव झाला. या पराभवातून देखील भगीरथ भालके यांना सावरता आले असते आणि पुन्हा मजबूत प्रतिमा उभी करता आली असतो परंतु दुर्दैवाने तसे काहीच घडले नाही. याचाच फायदा घेत तालुक्यात नवे नेतृत्व उदयाला आले.


राजकारणात कुणीच कुणासाठी थांबत नसते हे गल्ली ते दिल्लीपर्यंत पाहायला मिळते. भगीरथ भालके यांना आलेली चांगली संधी त्यांनी घालवली. जनतेपासून ते खूप खूप दूर जात राहिले त्यामुळे जवळ आलेली आमदारकी देखील त्यांच्यापासून दुरावत गेली. आत्ता तर ती खूप दूर गेली असून मतदारसंघातील राजकीय गणिते आणि त्याची  समीकरणे खूप बदलली आहेत. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. भारतनानांना मानणारा मतदार एकाकी पडला आणि त्यातील काहींनी ना इलाज म्हणून दुसरी वाट देखील शोधली. जनतेतील नाराजी आणि प्रतिक्रिया कानावर येत असून देखील  भगीरथ भालके यांनी त्याची दखलही घेतली नाही आणि काही सुधारणा करण्याचा विचार देखील केला नाही. याचा मोठा परिणाम राजकारणावर आणि व्यक्तिगत भगीरथ  भालके यांच्या राजकीय भविष्यावर झालेला दिसत आहे. एकूण परिस्थिती आणि तालुक्यातील राजकीय वातावरण लक्षात घेत राष्ट्रवादीने देखील  त्यांच्यापासून अंतर राखले आणि 'बुडत्याचा पाय खोलात' अशी अवस्था समोर आली. 


भगीरथ भालके यांनी महाराष्ट्रातील राजकीय पक्षांकडे पाठ फिरवत तेलंगाणा जवळ केलं आणि त्यातही त्यांचे राजकीय नुकसानच झाले. ज्या पक्षाला स्थानिक मतदारसंघात एकही कार्यकर्ता नाही, असा पक्ष त्यांनी निवडला आणि 'बुडत्याला काडीचा आधार' मिळण्याऐवजी बुडत्याचा पाय अधिकच खोलात गेला. तालुक्यात याची प्रतिकूल चर्चा झाली आणि आता पुन्हा नव्या चर्चेला सुरुवात झालेली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर भालके यांनी अजित पवार यांच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. हिवाळी अधिवेशनात  नागपूरला जाऊन भालके यांनी मतदारसंघातील  काही समस्या अजित पवार यांच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न  केला. यामुळे आता ते अजित पवार यांच्या गटात दाखल होणार काय ? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. दरम्यान काहीसे बाजूला गेलेले   के. चंद्रशेखर राव यांनी प्रकृती ठीक झाल्यामुळे त्यांनी पुन्हा लोकसभा निवडणुकीची राजकीय गणिते जुळवण्यात सुरुवात केली  आहे. मग आता भगीरथ भालके हे  अजित पवार यांच्याकडे जाणार की पुन्हा तेलंगणाच पसंत करणार ? याचे उत्तर येत्या काही काळात मिळणार आहेच.


एकीकडे प्रशांत परिचारक विधानसभा लढविण्याच्या तयारीत असल्याचे दिसत असतानाच, दुसरीकडे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी या जागेवर पुन्हा दावा केला आहे. आपली उमेदवारी निश्चित असल्याचे ते खाजगीत सांगत देखील आहेत. दुसरीकडे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. भगीरथ भालके देखील विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे  उमेदवारांची बहुगर्दी आत्तातरी होऊ लागली  आहे. (Bhagirath Bhalke claims to be MLA)अशा परिस्थितीत वेगळा आणि धक्कादायक निकाल या मतदारसंघाला पहावा लागण्याची शक्यता आहे. मतविभागणीचा मोठा फटका प्रमुख उमेदवाराला बसण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असतानाच, भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिताताई भालके यांनी आपण 'आमदारीण' होणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे.


मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे एका पतसंस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा पुनरुच्चार केला आहे.  या कार्यक्रमात सूत्र संचालकांनी 'भावी आमदार' असा उल्लेख केल्याने, तोच धागा पकडून प्रणिताताई यांनी हे विधान केले आहे. दिवंगत आमदार भारतनाना भालके यांचे या भागात चांगले संबंध होते, त्यांना मानणारा मोठा मतदार देखील आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत भगीरथ भालके हेच आमदार होतील. शिक्षकाची पत्नी जशी मॅडम म्हणून ओळखली जाते तसेच, भगीरथ भालके यांची आपण पत्नी असल्यामुळे आपणही 'आमदारीण' होणार आहे. असा दावा प्रणिताताई भालके यांनी केला आहे. साहजिकच या विधानाची चर्चा मतदारसंघात होऊ लागली असून, जनतेतून प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत. आमदारीण होणार असे त्यांनी सांगितले पण कोणत्या पक्षाच्या होणार हे मात्र सांगितले नाही. यामुळे भगीरथ भालके हे विधानसभा निवडणूक लढविणार हे जसे निश्चित मानले जात आहे तसे अजूनतरी त्यांचा पक्ष निश्चित झाला नाही हे देखील यातून दिसून येत आहे.


   

  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !