BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२८ जाने, २०२४

वाळू काढायला गेला आणि वाळूखालीच दबून झाला मृत्यू !

 


शोध न्यूज : वाळू चोरीचे प्रकार खुलेआम सुरु असतानाच पंढरपूर तालुक्यात एक दुर्घटना घडली असून, वाळू काढण्यासाठी खड्ड्यात उतरलेल्या तरुणाच्या अंगावर वाळू पडून, त्याच वाळूखाली दबून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची एक वाईट घटना समोर आली आहे.


वाळूचोरी काही नवी नाही आणि तिच्यावर कुणी नियंत्रण आणतानाही दिसत नाही. जुजबी कारवाया होतात पण  वाळूची चोरी मात्र काही केल्या थांबत नाही. नदीच्या पात्रात चोरट्या वाळूच्या प्रकारामुळे जागोजागी खड्डे पडलेले असतात आणि पाण्याखाली गेलेल्या या खड्ड्यांचा अंदाज येत नाही त्यामुळे आजवर कित्येकजण बुडून मृत्युमुखी पडलेले आहेत. आता आणखी एका तरुणाचा वाळूच्या खड्ड्यातच मृत्यू झाला  असून ही घटना मात्र वेगळी आहे. वाळू काढण्यासाठी वाळूच्या खड्ड्यात एक तरुण उतरला आणि तो खड्ड्यात काम करीत असताना बाजूची वाळू त्यांच्याच अंगावर पडली त्यामुळे त्याच वाळूखाली गुदमरून त्याचा मृत्यू झाला. त्याचे काही साथीदार पळून गेले तर काही तेथेच थांबले. त्यांच्या डोल्यादेखत या तरुणाचा जीव गेला आहे. समोर घटना घडत असतानाही ते काही करू शकले नाहीत. 


पंढरपूर तालुक्यातील चिंचोली भोसे येथे ही घटना घडली आहे.  रामा अनिल धोत्रे (वय १९, रा. अनिलनगर, पंढरपूर), विकी मारुती जाधव (वय २०, रा. अनिलनगर, पंढरपूर), राज विलास मोहिते (वय १९, रा. अनिलनगर, पंढरपूर), आकाश ऊर्फ चम्या शिंदे (रा. कैकाडी मठामागे, पंढरपूर) हे शनिवारी पहाटे शहरातील नदीपात्राच्या बाजूने दोन होड्या घेऊन चिंचोली भोसे  येथील नदीपात्राच्या बाजूची वाळू होडीमध्ये भरून आणण्यासाठी गेलेले असताना ही घटना घडली. चिंचोली भोसे येथे नदीच्या पात्राच्या बाजूची वाळू पोखारण्यात आली होती, ही वाळू  काढण्यासाठी राम अनिल धोत्रे हा तरुण, हातात खोरे आणि पाटी घेवून आत गेला. दरम्यान, वाळूचा वरचा भाग थेट त्याच्या अंगावर कोसळला आणि या वाळूखाली तो दबला गेला. या घटनेने सगळेच घाबरून गेले आणि यातील आकाश उर्फ चिम्या शिंदे हा तेथून पळाला तर अन्य दोघे तेथेच  थांबले. त्यांच्या डोल्यादेखत राम वाळूत गुदमरत होता पण हे दोघे काहीच करू शकत नव्हते. त्याला वाचविण्यासाठी त्यांच्याजवळ काहीच साहित्य नव्हते.


अखेर वरून पडलेल्या वाळूखाली राम धोत्रे या तरुणाचा गुदमरून मृत्यू झाला. राम याचे लग्न अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच झाले होते. या घटनेने अनिल नगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (The death of a young man buried under the sand) पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात या  घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !