शोध न्यूज : कोरोनाने पुन्हा आपले हातपाय पसरायला वेगाने सुरुवात केली असून, सोलापूर जिल्ह्याने तर अधिक दक्ष राहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. जिल्ह्याच्या सीमेवर कोरोनाची महामारी येवून पोहोचली असून राज्यातील बाधितांची संख्या देखील वाढत निघाली आहे.
माणसांची झोप उडवून गेलेला कोरोना पुन्हा परतलेला असून अजूनही लोक याकडे गंभीरपणे पाहताना दिसत नाहीत. कोरोना बरेच काही नुकसान करून गेला आहे तसेच त्याने बरेच काही शिकवले आहे. आता पुन्हा त्याचे आक्रमण सुरु झाले असून वेळीच सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. सुरुवातीला क्वचित दिसणारी रुग्णसंख्या आता वाढीला लागली आहे. काल रविवारी महाराष्ट्रात एका दिवसात पन्नास रुग्णाची वाढ झाली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. कोरोनाची महामारी आल्यापासून म्हणजे साधारण तीन वर्षापूर्वीपासून ८१ लाख ७२ हजार १३५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. आता पुन्हा तो मुंबईपासून राज्याच्या विविध भागात पोहोचत असल्याचे दिसत आहे. मुंबई पाठोपाठ तो पुण्यात दाखल झाला. सिंधुदुर्ग येथून तो कोल्हापूर मार्गे पुढे सरकतानाही दिसून आला आहे. ताज्या प्रकरणांपैकी, नऊ रुग्णांना नवीन JN.1 व्हेरिएंटची लागण झाली. ज्यामुळे राज्यातील नवीन उप-प्रकाराशी संबंधित संसर्गाची संख्या 10 झाली आहे. JN.1 रुग्णांमध्ये ठाणे शहरातील पाच, पुणे शहरातील दोन आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रत्येकी एक, अकोला शहर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनाचा JN.1 हा एक नवा व्हेरीएंट असून याचे उप प्रकार देशात आढळत आहे परंतु लगेचच याची फारशी चिंता करण्याची गरज नाही, कारण बाधितांपैकी ९२ टक्के रुग्ण हे घरीच उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले आहे. तरीही ज्यांना सर्दी, खोकला अथवा ताप असेल अशा नागरिकांनी इतरांपासून अंतर राखावे, मास्कचा वापर करावा आणि हात सतत स्वच्छ ठेवावेत असे आवाहन करण्यात आले आहे. देशात एका दिवसाला ६५६ रुग्णांची वाढ झाली असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिल्या आहेत. देशात एका दिवसात 656 कोविड संसर्गाची वाढ झाली आहे तर सक्रिय प्रकरणे 3,742 वर पोहोचली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगावी असे आवाहन करीत देशातील आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्या आहेत. देशात प्रत्येक दिवसाला दोनशे ते अडीचशे रुग्ण नव्याने आढळून येत आहेत. सद्या साडे तीन हजार रुग्णांवर उपचार सुरु असून, सोळा रुग्णांचा मृत्यू झाला आहे महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा, केरळ राज्यात JN.1 चा प्रादुर्भाव वाढत आहे त्यामुळे या राज्यात विशेष खबरदारी घेतली जात आहे.
नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंचसूत्रीचे पालन करावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले असून, गरजेनुसार मास्कचा वापर करावा आणि सतत आपले हात साबणाने धूत राहावे, दोन व्यक्तींच्या दरम्यान सहा फुटांचे अंतर असावे. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे तसेच स्वत: अफवांवर विश्वास ठेवू नका आणि कोरोनाबाबत चुकीच्या माहितीचा प्रसार देखील करू नका असे देखील आवाहन करण्यात आले आहे. (Corona is increasing rapidly in the state) नव्या व्हेरीएंटमुळे भीतीचे वातावरण असले तरी, दक्षता घेतल्यास घाबरून जाण्याएवढी परिस्थिती नाही, असे वैद्यकीय तज्ञ सांगत आहेत. परंतु काही लक्षणे जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता, तातडीने वैद्यकीय मदत घेतली जावी असे देखील सांगण्यात आले आहे.
सोलापूरसाठी अलर्ट !
यापूर्वी सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव दिसून आला आहे. राज्याच्या विविध भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असले तरी अद्याप सोलापूर जिल्ह्यातून एकही प्रकरण समोर आलेले नाही. असे असले तरी कोरोना हा सोलापूर जिल्ह्याच्या वेशीवर आलेला आहे. सोलापूर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या पुणे जिल्ह्यात शिरकाव झालेला आहे तसेच सोलापूर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या सातारा आणि सांगली जिल्ह्यात कोरोनाची प्रकारणे आढळून आलेली आहेत. सिंधुदुर्ग येथे एक रुग्ण आढळला आणि त्यानंतर त्याचा प्रवास कोल्हापूरपर्यंत झाला. कोल्हापूर नंतर तो सांगली आणि सातारा जिल्ह्यापर्यंत दाखल झाला आहे. त्यामुळे आता सोलापुर जिल्ह्यातील नागरिकांनी वेळीच अलर्ट मोडवर राहणे अत्यावश्यक बनले आहे. घाबरून जाण्यापेक्षा वेळीच काळजी घेणे गरजेचे बनले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !