BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ डिसें, २०२३

ऊसाच्या बेपर्वा वाहतुकीने घेतला आणखी एक बळी !

 



शोध न्यूज : ऊसाच्या बेपर्वा वाहतुकीने घेतला आणखी एक बळी घेतला असून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे तर दुसरा तरुण गंभीर स्वरूपाचा जखमी झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात अपघाताची ही आणखी एक घटना घडली आहे.


साखर कारखाना हंगाम सुरु झाला की, ऊसाची वाहूतक करणारी वाहने अत्यंत बेदरकारपणे वाहने हाकत असतात आणि रस्त्यावरील निष्पाप लोकांचे जीव घेत धावत असतात. याचा अनुभव सगळीकडे आणि दरवर्षी येत असतो. वाहतुकीच्या नियमनाचे उल्लंघन करण्याचा जणू यांनी परवानाच घेतलेला आहे अशा पद्धतीने ऊस वाहतूक करणारी वाहने धावत असतात. कर्णकर्कश आवाजातील गाणी लावून आपल्याच मस्तीत हे चालक निघालेले असतात, एक तर क्षमतेपेक्षा, म्हणजेच नियमापेक्षा अधिक ऊस भरलेला असतो, अवघा रस्ता व्यापून ही वाहने धावत असतात. विशेषतः ट्रॅक्टर  आणि ट्रॉली यामुळे हे अपघात होत असतात. रस्त्यावर ऊस सांडत जातात आणि मागून येणारी वाहने त्यावरून घसरून पडतात. रात्रीच्या वेळी हे ट्रॅक्टर तर यमदूत ठरत असतात. मागच्या बाजूला रिफ्लेक्टर लावलेले नसते आणि ऊसाने भरलेल्या ट्रॉली कुठेही उभ्या करून हे चालक गायब झालेले असतात. पाठीमागून वेगाने येणारी दुचाकी थेट या ट्रॉलीवर धडकते आणि अपघात होतो. या अपघातातून वाचणे सहजशक्य नसते. दरवर्षी असा तमाशा सुरूच असतो पण, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अथवा पोलीस याना याचे गांभीर्य नसल्याचे दिसते. चौकाचौकात वाहने अडवून, दंड वसूल करणारे पोलीस, रस्त्यावरून खुले आम कायद्याची वरात काढत, निघालेले यमदूत पाहण्यासाठी त्यांना वेळ नसतो. 


यावर्षी ऊसाची वाहतूक सुरु झाल्यापासून निष्पाप लोकांचे बळी जात असताना, हे चक्र सुरूच राहिले आहे. यातूनच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे आणखी एका तरुणाचा बळी गेला असून, एक तरुण गम्भीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. बार्शी येथील अमीर मुबारक सय्यद ( वय २८) आणि सोहेल शकील खान (वय २०) हे दोघे दुचाकीवरून निघालेले असताना, तांदुळवाडी येथे उसाच्या  ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकले. ट्रॉली दिसली नसल्याने वेगवान दुचाकी ट्रॉलीवर जाऊन आदळली. रस्त्याच्या मध्यभागी ऊसाने भरलेल्या दोन ट्रॉल्या आणि ट्रक्टर थांबले होते. ट्रॉलीच्या पाठीमागील बाजूस कोणतेही दिवे किंवा लाल चिन्ह लावलेले नव्हते. त्यामुळे दुचाकीची जोराची धडक ट्रॉलीला बसली.  हे दोन्ही तरुण धाराशिवकडून बार्शीच्या दिशेने येत होते. या अपघातात अमीर मुबारक सय्यद हा २८ वर्षाचा तरुण जागीच ठार झाला तर त्याचा २० वर्षे वयाचा  मित्र सोहेल खान हा गंभीर जखमी झाला आहे. 


वेगातील दुचाकी ट्रॉलीला धडकताच दुचाकीवरून दोघेही खाली पडले. त्यानंतर त्यांना पांगरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु अमीर याचा मृत्यू झालेला होता. सोहेल याच्यावर उपचार सुरु आहेत आणि त्याची प्रकृती स्थिर आहे, ट्रॅक्टर चालकांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (A victim of reckless transportation of sugarcane) अपघात घडल्यानंतर पुढचे सोपस्कार होतच असतात पण असे अपघात होऊ नयेत यासाठी प्रशासकीय पातळीवरून कठोर उपाय योजले जावेत अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे. अर्थात ती नेहमीच होत असते पण प्रशासन गंभीरपणे पहात नाही आणि सामान्य निष्पाप जीव मात्र जात आहेत. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !