शोध न्यूज : खोट्या गुन्ह्यामुळेच पंढरपूर तालुक्यातील आरोपीचा कोठडीत मृत्यू झाल्याचा आरोप मयत महादेव वाघमारे यांच्या कुटुंबियांनी केला असून,वाघमारे यांचा मृतदेह त्यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात आणला आणि आपला संताप व्यक्त केला.
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील महादेव दादा वाघमारे हे न्यायलयीन कोठडीत असताना, त्यांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात आणि पोलीस प्रशासनात देखील खळबळ उडाली आहे. कोठडीत असताना तो आजारी पडला आणि त्याला उपचारासाठी सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु तेथे त्याचा मृत्यू झाला. तथापि केवळ खोटा गुन्हा दाखल झाल्याच्या धक्क्यामुळे महादेव वाघमारे यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाइकनि केला आहे. महादेव वाघमारे यांच्यावर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे तथापि या गुन्ह्यात त्याचा कसलाही संबंध नव्हता. तरीही त्याच्यावर हा गुन्हा दाखल झाल्याने मानसिक आणि शारीरिक धक्का बसून त्यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईक करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
महादेव वाघमारे यांचा कोठडीत मृत्यू झाला असल्याने आणि त्याच्या मृत्यूला पोलीस तसेच अन्य व्यक्ती कारणीभूत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करीत नातेवाईकानी महादेव वाघमारे यांचा मृतदेह थेट पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात आणला. आपली मागणी करीत त्यांनी तेथे आंदोलनही केले. नातेवाईकांनी याबाबत एक निवेदन देखील दिले असून, पोलिसांवर देखील आरोप करण्यात आले आहेत. कुत्रे भूंकल्याच्या कारणावरून शीतल जाधव यांनी हातात दगड घेऊन विष्णू वाघमारे यांच्या घरात प्रवेश केला, अश्लील शिवीगाळ करीत त्याने घरातील वस्तूंची तोफाफोड केली. या घटनेची तक्रार घेवून विष्णू वाघमारे आणि रंजना वाघमारे हे पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गेले पण संबंधितावर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली होती. राजकीय दबावामुळे हा गुन्हा दाखल करून घेतला नाही, उलट विष्णू वाघमारे आणि अन्य पाच लोकांवर गंभीर स्वरूपाचा, भारतीय दंड विधान ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला अशी तक्रार त्यांनी केली आहे.
ही घटना घडली तेंव्हा प्रत्यक्षात मयत महादेव वाघमारे हे घटनास्थळी उपस्थित नव्हते त्यामुळे या घटनेशी त्यांचा काहीही संबंध नव्हता, तरी देखील त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आणि या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली. याचा धक्का महादेव यांना बसला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.(Accused dies in custody due to fake crime ) महादेव वाघमारे यांच्यावर खोटी तक्रार देणारे आणि पोलीस हेच त्याच्या मृत्यूला जबाबदार आहेत, त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या नातेवाईकानी केली आहे. याच मागणीसाठी नातेवाईकानी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना देखील घेराव घातला आहे. सदर प्रकरणी न्यायाधीशांची एक समिती नियुक्त करण्यात येईल आणि या समितीद्वारे चौकशी केली जाईल असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !