BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ नोव्हें, २०२३

पोलिसाने झाडली स्वत:वरच गोळी आणि केला जीवनाचा शेवट !

 


शोध न्यूज : सगळीकडे दिवाळी साजरी होत असताना, सोलापूर येथे मात्र एक धक्कादायक घटना घडली असून, एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली  आहे. या घटनेने पोलीस दलात  मोठी खळबळ उडाली आहे.


पोलिसावर कामाचा मोठा ताण असल्याने तसेच अन्य कारणांनी पोलिसांच्या अशा  आत्महत्या या आधीही झाल्या आहेत. सोलापुरात घडलेली ही घटना नेमकी कशामुळे झाली हे समोर आलेले नाही. सोलापूर शहर पोलीस दलात पोलीस शिपाई असलेल्या राहुल शिरसट या ३५ वर्षे वयाच्या पोलीस कर्मचाऱ्याने भाऊबिजेच्या दिवशीच स्वत:वर गोळी झाडली आहे. शिरसट हे पोलीस कर्मचारी पोलीस आयुक्तांच्या बंगल्यावर गार्ड म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे.  त्यांच्याकडे सरकारी एसएलआर रायफल होती. ड्युटी संपल्यानंतर ही रायफल जमा केली जाते, नियमानुसार ते रोज आपली सरकारी रायफल जमा देखील करीत होते पण, यावेळी त्यांनी तसे केले नाही. ड्युटी संपली तरी ते आपल्या ताब्यात असलेली  रायफल घरी घेवून गेले. केशवनगर पोलीस वसाहतीत ते रहात होते. घरी गेल्यावर त्यांनी आपल्या राहत्या घरी याच रायफलने गोळी झाडून घेतली.


त्यांनी गोळी झाडताच मोठा आवाज झाला आणि या आवाजामुळे अनेकांनी त्यांच्या घरी धाव घेतली. पोलीस वसाहतीत रहात असल्यामुळे आजूबाजूला पोलिसांचीच  कुटुंब आहेत. ते धावत गेले असता, शिरसट हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. या नंतर मात्र केशवनगर पोलीस वसाहतीतील वातावरण बदलून गेले. वसाहतीत दिवाळीचा सण आनंदाने साजरा होत असतानाच  ही भयानक घटना घडली. (A policeman shot himself in Solapur) त्यामुळे परिसर हादरून गेला. या घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.. शिरसट यांना रुग्णालयात देखील हलविण्यात आले पण त्याचा काही उपयोग नव्हता. 


राहुल शिरसट यांचे वडील पोलीस दलात सेवेत होते आणि त्यांचा भाऊ देखील सोलापूर शहर पोलीस दलात कार्यरत आहे . २०११ साली मुंबई पोलीस दलात दाखल झालेले राहुल शिरसट हे १०१७ मध्ये सोलापूर शहर पोलीस दलात बदलून आलेले होते. त्यानंतर सोलापूर सदर बाजार पोलीस ठाण्यात त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तेथून त्यांना मुख्यालयात पाठविण्यात आले होते. सद्या ते पोलीस आयुक्त यांच्या निवासस्थानी सुरक्षा गार्ड म्हणून काम करीत होते. राहुल शिरसट यांचे कुटुंब पोलीस दलाच्या सेवेत आहे, वडील पोलीस दलात सेवा करून सेवानिवृत्त झाले परंतु त्यांचा भाऊ तर पोलीस दलात आहेच शिवाय राहुल शिरसट यांची पत्नीही पोलीस दलात कार्यरत आहे, राहुल शिरसट यांची बहिणही पोलीस दलातच अधिकारी आहे. असे संपूर्ण कुटुंब पोलीस दलात  असलेल्या राहुल शिरसट यांनी कशासाठी आत्महत्या केली याचे कारण लगेच समोर आले  नाही. पोलिसांच्या तपासात याबाबत अधिक माहिती मिळणार आहे . या घटनेने सोलापूर पोलीस दलात हळहळ व्यक्त होऊ लागली आहे . 


दुसरी घटना

सोलापूर येथे पोलिसाच्या आत्महत्येची हे महिन्यातील दुसरी घटना आहे . सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद मळाले यांनी ७ ऑक्टोबर रोजी सोलापुरातील आपल्या घरी अशीच आत्महत्या केली होती, कुमठा येथे त्यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली होती आणि आता राहुल शिरसट यांनी देखील अशाच प्रकारे आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे . 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !