BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ नोव्हें, २०२३

रुग्णालयात तरुण रुग्णाचे डुकरानी तोडले लचके !




शोध न्यूज : सरकारी रुग्णालयातील अवस्था नेहमीच विदारक असते पण आता एक मोठी आणि  धक्कादायक घटना समोर आली आहे. एका रुग्णाचे लचके तोडून तोडून डुकरानी त्याचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.  


शासकीय रुग्णालये ही केवळ नावाची उरली  असल्याची चर्चा नेहमीच  होते, त्यात तानाजी सावंत आरोग्यमंत्री झाल्यापासून या रुग्णालयांची दशा अगदीच वाईट झाली  आहे.  काही दिवसांपूर्वी शहरातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय आणि रुग्णालयातील मृत्यू प्रकरण देशभर गाजलं होतं. २४ तासात २४ मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. राज्यभर या घटनेचा संताप व्यक्त होत राहिला आणि एवढी मोठी घटना विस्मरणात देखील गेली . या घटनेनंतर आता पुन्हा त्याच रुग्णालयाच्या परिसरात ही मोठी आणि  धक्कादायक घटना घडल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे  शासकीय रुग्णालयांचा बुरखा पुन्हा एकदा फाटला आहे. सरकारी रुग्णालये ही जीवन देण्यासाठी आहेत की मृत्यू देण्यासाठी निर्माण केली आहेत असा प्रश्न पडावा एवढी गंभीर अवस्था  झाली आहे. आरोग्यमंत्री मात्र पोलिसांच्या बदल्या करण्यासाठी, पोलीस अधिकारी यांच्यावर दबाव आणण्यात आणि 'आपण मुख्यमंत्र्यांचेही ऐकत नाही' असे मर्दुमकी गाजविण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे. 

चोवीस तासात चोवीस रुग्णाचे बळी घेणाऱ्या रुग्णालयाच्या परिसरातील घटनेने नागरिक हादरून गेले आहेत.    नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय परिसरात एका तरुणाचा डूकराच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. धनगर वाडी येथील तुकाराम नागोराव कसवे हा पस्तीस वर्षाचा तरुण, रुग्णालयाच्या बेपर्वाईचा बळी ठरला आहे.क्षयरोगाने आजारी असलेला हा तरुण या रुग्णालयात मागीस अकरा दिवसांपासून उपचार घेत होता. त्यानंतर त्याला रुग्णालयाने डिस्चार्ज दिला आणि तो घरी गेला . परंतु त्याला पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने तो रुग्णालयात आला. रुग्णालयात गर्दी असल्याने, रात्रीचे जेवण करून तो, रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या एका झाडाखाली झोपला. चिंचेच्या झाडाखाली तो झोपलेला असतानाच, तेथील डुकरांच्या एका कळपाने त्याच्यावर हल्ला केला. या रुग्णाचे लचके ही डुकरे तोडू लागली.


उपचार घेण्यासाठी आलेल्या या तरुणाच्या कमरेखालचा भाग, नाक आणि गालाचे अक्षरश: डुकरांनी लचके तोडले आणि डुकरांच्या या हल्ल्यात तरुण मृत्युमुखी पडला. रात्री घडलेली ही घटना सकाळी उघडकीस आली. सकाळी त्याचा मृतदेह पाहून रूग्णालय प्रशासनाची तारांबळ उडाली. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला पण रुग्णालयाची विदारक परिस्थिती या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिली. ( A patient died after being attacked by a pig) रुग्णालयाकडून या घटनेबाबत लगेच प्रतिक्रिया आली  नाही पण रुग्णातून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. नागरिक देखील या घटनेने अस्वस्थ झाले असून, सरकारी रुग्णालयाची दशा आणि दिशा मात्र या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !