BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ नोव्हें, २०२३

ग्रामसेवकाचा झटका, सरपंचालाही फटका !



शोध न्यूज : ग्राम पंचायत कारभारात ग्रामसेवकाने अपहार केला म्हणून त्याला तर निलंबित करण्यात आलेच पण, सरपंचावरही कारवाई सुरु करण्यात आली आहे. सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे अखेर ही कारवाई करावी लागली आहे.

काही ग्रामपंचायतीत विविध प्रकारचा सावळा गोंधळ असतो, कुठे सरपंच ग्रामसेवकाला हातीशी धरून भानगडी करीत असतो तर कुठे ग्रामसेवक सरपंचाला हाताशी धरून आपल्या मर्जीप्रमाणे कारभार चालवत असतो. अलीकडे ग्रामसेवक आणि सरपंच देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले असल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. अनेक ठिकाणी 'तेरी भी चूप, मेरी भी चूप' असा कारभार चालत असतो. (Gram sevak suspended in embezzlement case)  सोलापूर जिल्ह्यातील बेलाटी येथील ग्रामपंचायतीत देखील असेच काहीसे होत होते पण माजी सरपंच आणि अन्य काही जण याविरोधात पुढे आले होते. तरी देखील त्यांना मोठ्या प्रमाणात झगडावे लागले तेंव्हा कुठे ही कारवाई झाली आहे.  कामे न करता आणि वस्तूंची खरेदी न करताच ८ लाख ४९ हजार रुपयांचा अपहार केल्याच्या या प्रकरणात बेलाटी येथील ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आले आहे आणि या प्रकरणात सरपंचालाही जबाबदार धरण्यात आले आहे. 


माजी सरपंच सुभद्राबाई घोडके, ग्रामपंचायत सदस्य नितीन गव्हाणे, कमल  माने, मेघा खटकाळे, रामचंद्र कोकाटे आदींनी या प्रकरणी तक्रार केली होती. गट विकास अधिकारी यांनी याची चौकशी देखील केली होती, रकमेचा अपहार झाल्याचे समोर आल्याने तब्बल पाच महिन्यांनी ग्रामसेवक नितीन चौधरी याला निलंबित करण्यात आले आहे. शिवाय सरपंच शिवनेरी धनराज पाटील यांनाही या प्रकरणी जबाबदार धरण्यात आले आहे. त्यांच्यावर देखील पदमुक्त करण्याची कारवाई सुरु करण्यात आली असून, तसा प्रस्ताव पुणे विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटीतील नागरिकांच्या रेट्यामुळे कारवाई करणे जिल्हा परिषद प्रशासनाला भाग पडले आहे. ग्रामपंचायतीतील हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यापासून याची चर्चा होत होती परंतु कारवाईचे सोपस्कार पार पडत नव्हते. अखेर ग्रामस्थांच्या रेट्याला यश आले आणि कारवाईचा बडगा उगारण्यात आला.    



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !