शोध न्यूज : माढा तालुक्यातील संशयित आरोपी भीमा काळे याच्या कोठडीत झालेल्या मृत्युप्रकरणी सात पोलिसांना मोठा दिलासा मिळाला असून, उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
माढा तालुक्यातील कुर्डूवाडी येथील पारधी वस्तीवर राहणारा भीमा काळे याचा पोलिसांच्या कोठडीत मृत्यू झाला होता. एका गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती आणि तो सोलापूर येथील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या कोठडीत होता. कोठडीत त्याचा मृत्यू झाल्यानंतर, पोलिसांनी त्याला मारहाण केली म्हणून त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ३ ऑक्टोबर २०२१ रोजी विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या कोठडीत संशयित भीमा राजा काळे (वय ४१) याचा मृत्यू झाल्यानंतर बराच गदारोळ उठला होता आणि या घटनेला पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना जबाबदार धरून, आरोप केले जात होते. पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील, सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ, पोलिस हवालदार श्रीरंग खांडेकर, पोलिस नाईक शिवानंद पिंपळे, पोलिस नाईक लक्ष्मण राठोड, पोलिस नाईक अंबादास गड्डम, पोलिस शिपाई आतिश पाटील यांची नावे या प्रकरणात समोर आली होती.
संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने, अटक टाळण्यासाठी या पोलिसांनी प्रयत्न सुरु ठेवले होते, अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात, फौजदारी प्रक्रिया संहिता १७६ नुसार या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी भीमा काळे या संशयित आरोपीस कसलीही मारहाण केलेली नाही, भीमा काळे याचा मृत्यू हा नैसर्गिक झाला आहे हे न्यायालयाच्या समोर आले. या प्रकरणी पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील, सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ, पोलिस हवालदार श्रीरंग खांडेकर, पोलिस नाईक शिवानंद पिंपळे, पोलिस नाईक लक्ष्मण राठोड, पोलिस नाईक अंबादास गड्डम, पोलिस शिपाई आतिश पाटील यांना ५० हजारांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला.
अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम (ॲट्रॉसिटी) लागू होत नसल्याचे तसेच हा गुन्हा भारतीय दंड संहिता कलम ३०४ नुसार गुन्हा होत नसल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवलेले आहे. (Anticipatory Bail to the police in the death of the accused bail ) या सात अधिकारी कर्मचारी यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याने त्यांच्यासाठी हा फार मोठा दिलासा लाभला आहे. या घटनेची सोलापूर जिल्ह्यात आणि महाराष्ट्र पोलीस दलात मोठी चर्चा झाली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !