BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ सप्टें, २०२३

उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडणार ! ?



शोध न्यूज : पुणे परिसरातील पावसाने विश्रांती घेतली असल्याने उजनी धरणात येणारा विसर्ग थांबला असला तरी उजनी धरणातून पंढरपूर, सोलापूरसाठी उद्या १५ सप्टेंबर पासून पाणी सोडण्यात येण्याची शक्यता  आहे, त्यामुळे कोरडा पडलेला बंधारा पुन्हा भरलेला पहायला मिळणार आहे. 


यावर्षी ऐन पावसाळ्यांत उजनी धरणाच्याच घशाला कोरड पडली असून, मागील वर्षाच्या चुकीच्या नियोजनाचा हा फटका मानला जात आहे. ऐन पावसाळ्यात भीमा नदी कोरडीच असून, पंढरपूर, सांगोला, सोलापूर आदी, पिण्याच्या पाणीपुरवठा योजना कोरड्या ठणठणीत झाल्या आहेत. पावसाळ्यातच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असून अखेरचा श्वास घेत तग धरून असलेली पिकेही ओलाव्याची वाट पाहत आहेत. शेतीतील पिकांसाठी पाणी मिळणे हे सद्या तरी अशक्य बनले असून भविष्यातही मेघराजाने कृपा नाही केली तर, पिकांना पाणी  मिळणे कठीणच असल्याचे दिसत आहे. राज्यातील सर्वात मोठे धरण असे 'मोठेपण' लाभलेले उजनी धरण यावर्षी, 'नाव मोठे लक्षण खोटे' अशा अवस्थेला पोहोचले आहे.  पावसाळ्याचे अंतिम दिवस उरले असतानाही उजनी धरण केवळ २३.८१ टक्के भरले आहे. अर्धा सप्टेंबर महिना झाला तरी धरणात केवळ ७६.४१ टीएमसी एवढे पाणी आहे, त्यातील १२.७५ टीएमसी पाणीच उपयुक्त साठ्यात आहे. तरी देखील पिण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडावेच लागणार आहे. 


पंढरपूर, सोलापूरसाठी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याने, पाणी सोडण्याची मागणी सोलापूर महापालिका, पंढरपूर नगरपालिका यांनी केली आहे. पावसाचा अंदाज घेत पिण्यासाठी पाणी सोडण्याबाबतचा निर्णय नियोजन मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तशा सूचनाही धरण प्रशासनाला दिलेल्या होत्या. त्यानुसार उद्या १५ सप्टेंबरपासून धरणातून पाणी सोडले जाण्याची अपेक्षा आहे.  याबाबतचा अंतिम निर्णय झाल्यानंतर प्रथम पंढरपूरसाठी नदीपात्रातून दीड टीएमसी तर काही दिवसानंतर यालाच जोडून सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. भीमा नदीच्या पात्रातून  पिण्यासाठी सुमारे सहा टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. भीमा नदीवर असलेल्या सर्वच पाणीपुरवठा योजनांना याचा लाभ होणार आहे. उजनी धरणात येणारा विसर्ग रोडावला आहे, १ हजार ७७८ एवढाच विसर्ग दौंड येथून येत आहे, पुण्याचा पाऊस थांबल्याने सातत्याने हा विसर्ग कमी होत आहे.  


पिण्याच्या पाण्याचीच अशी अवस्था होत असल्यामुळे शेतीसाठी पाणी  मिळणे दुरापास्त होऊन बसले आहे. उजनी धरण शंभर टक्के भरण्यासाठी अजून ४१ टीएमसी पाण्याची आवश्यकता असून, पावसाचे दिवस तर अंतिम टप्प्यात आलेले आहेत. (Water will be released into Bhima river from Ujani dam)आता परतीच्या पावसाने काही साथ दिली तर आणि तरच पिके वाचणार आहेत अन्यथा भविष्यात दुष्काळाचे मोठे संकट उभे राहणार असल्याचे दिसत आहे .




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !