BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ सप्टें, २०२३

मंत्री आले बैठकीला, कार्यकर्त्यांनी थेट कोंडूनच टाकले !

 



शोध न्यूज : भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री बैठकीसाठी म्हणून आले पण, भाजप कार्यकर्त्यांनीच त्यांना कोंडून ठेवल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली असून राजकीय वर्तुळात या घटनेने मोठी खळबळ उडवून दिली आहे.


कार्यकर्त्यांच्या जीवावर पक्ष आणि नेते मोठे होतात,  त्यांच्याच कष्टावर आमदार, खासदार निवडून येतात पण त्यातील अनेक नेत्यांना निवडून आल्यावर आपल्याच या कार्यकर्त्यांचा विसर देखील पडतो. कार्यकर्ते संताप व्यक्त करीत राहतात आणि हे नेते मात्र मिरवत राहतात, अर्थात पुढच्या निवडणुकीच्या वेळी हे कार्यकर्ते त्यांना त्यांची जागा दाखवतात. पण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते निवडणुकीपर्यंतही थांबले नाहीत तर त्यांनी, केंद्रीय मंत्री असलेल्या डॉ. सुभाष सरकार याना  पश्चिम बंगालच्या बांकुरा येथे पक्षाच्याच कार्यालयात कोंडून ठेवले आणि अखेर पोलिसांना धाव घेत त्यांची सुटका कारवाई लागली. आपल्याच पक्षाच्या मंत्र्याला त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी डांबले असल्यामुळे हा देशभर चर्चेचा विषय बनला आहे. 


केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ  सुभाष सरकार हे हुकुमशाही पद्धतीने जिल्हा युनिट चालवत असल्याचा भाजप कार्यकर्त्यांचा आरोप आहे आणि त्यासाठीच हे कार्यकर्ते संतापलेले आहेत.  शिक्षण राज्यमंत्री सरकार हे जिल्हा पक्ष कार्यालयात एका बैठकीसाठी आलेले होते.  ही बैठक सुरु असतानाच अनेक भाजप कार्यकर्ते या कार्यालयात घुसले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. भाजपचेच मंत्री आणि भाजपचेच कार्यकर्ते असा सरळ सामनाच सुरु झाला. बैठकीऐवजी कार्यालय घोषणांनी हादरून गेले. 'सुभाष सरकार हटाव' चा जोरदार नारा हे कार्यकर्ते देत राहिले, मंत्री सुभाष यांना आम्ही मानत नाही. यांना हटवा' अशो घोषणा दिल्या गेल्या आणि त्यानंतर तेथेच त्यांना कोंडून ठेवण्यात आले.  काही काळ ते कोंडलेल्या स्थितीत राहिल्यानंतर जेंव्हा पोलीस आले तेंव्हा पोलिसांनी त्यांची सुटका केली. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता असणारे मोहित शर्मा यांनी तर मंत्र्यांना खोलीत कोंडल्यानंतर बाहेरून कुलूप लावले होते. 


पक्षासाठी परिश्रम घेत असलेल्या कार्यकर्त्यांना हे मंत्री महत्व देत नाहीत तर त्यांनी आपल्याच बगलबच्च्यांना जिल्हा समितीत घेतले आहे असा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला. मंत्र्यांना कोंडून ठेवणाऱ्या कार्यकर्त्यावर कारवाई करण्यात येईल असे पश्चिम बंगाल भाजपचे प्रवक्ते समिक भट्टाचार्य यांनी सांगितले आहे. (Union ministers of BJP were locked up)  तृणमूल काँग्रेस पक्षाने मात्र या घटनेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पश्चिम बंगालमधील भाजपची परिस्थिती बिघडलेली आहे हेच या घटनेने दाखवून दिले असल्याचे या पक्षाकडून सांगण्यात आले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !