BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ सप्टें, २०२३

मुख्यमंत्री बोलले आणि माईकने नेमके पकडले !

 



शोध न्यूज : मराठा आरक्षण विषयाच्या पत्रकार परिषदेपूर्वी मुख्यमंत्री हळूच बोलले पण माईकने त्यांचा आवाज पकडला आणि  विरोधकांनी तो सोशल मीडियावरून व्हायरल केला, यामुळे नवा वाद निर्माण होऊ लागला आहे. 


मराठा आरक्षणाचा विषय नाजूक बनला आहे, त्यात आंदोलकांवर लाठीहल्ला झाल्याने मराठा समाज संतप्त असून यामुळे सरकार अडचणीत आले आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारला स्वारस्य नसल्याचा आरोप सातत्याने होत आहे आणि यातच भर घालणारी एक घटना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी समाजापुढे आणली आहे. (
The CM spoke and Mike caught it exactly) एकीकडे सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचे दाखवत असतानाच, सरकारची मोठी अनास्था उघड पडली असल्याचे आरोप आता होऊ लागले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एक वाक्य आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा त्याला दुजोरा या दोन घटना अत्यंत वादाच्या ठरू लागल्या आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र याला खोडसाळपणा म्हटले आहे. 


सह्याद्री अतिथी गृहावरील पत्रकार परिषदेचा एक व्हिडीओ विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दिसत असून शिंदे आणि अजित पवार यांच्यात, पत्रकार परिषदेपूर्वीच झालेला संवाद ऐकायला मिळत आहे. पत्रकार परिषदेला बसता बसता झालेला हा संवाद आहे पण नेमके याचवेळी तेथील माईक सुरु होते आणि त्यामुळे या माईकने हा संवाद टिपला आहे.  माईक सुरु असावेत असा अंदाज या तिन्ही नेत्यांना आलेला नव्हता असेच जाणवत आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे म्हणतात,  'आपल्याला काय? बोलायचं अन् निघून जायचं,  'बोलून मोकळं व्हायचं,' असं फडणवीस आणि अजित पवारांकडे पाहत म्हटलं. तेवढ्यावर हे थांबले नाही तर  अजित पवार यांनी, 'हो... यस' असा प्रतिसाद दिला. हा संवाद सुरु असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंच्या कानात, 'माईक चालू आहे' असं सांगितलं. त्यानंतर अजित पवारांनी माईकवर हाताने स्पर्श करुन, 'ऐकू येतं...' असं म्हटलं. असा हा प्रसंग आहे. 


नेमका हाच व्हिडीओ विजय वडेट्टीवार यांनी एक्स अकाऊंटवरुन (ट्वीटर अकाऊंटवरुन) पोस्ट केला आहे.  सरकारला फक्त बोलून मोकळं व्हायचं आहे. जनतेच्या प्रश्नांना- समस्यांना उत्तरे द्यायचे नाही. अडचणीच्या प्रश्नांपासून पळवाट शोधणारे 'नाकर्ते सरकार' राज्याचा कारभार हाकत आहे' असे त्यांनी या व्हिडीओ सोबत म्हटले आहे. सोशल मीडियावरून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला असून संताप देखील व्यक्त केला जात आहे. मराठा आरक्षणाबाबत शासनाची कशी अनास्था आहे हेच स्पष्ट होत असल्याच्या प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत. एकीकडे मराठा बांधव जीव देताना दिसत आहेत तर दुसरीकडे शासनकर्ते किती उदासीन आहेत असे देखील काहींनी म्हटले आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र याला खोडसाळपणा असल्याचे म्हटले आहे. मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत हे अतिशय निंदनीय आहे. आमच्या एकमेकांमधील संवादाची मोडतोड करून संपादित करून दाखवून या घटकांनी जाणीवपूर्वक निंदनीय कृत्य केले आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. पहा हा व्हिडीओ ----



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !