BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ जाने, २०२२

मित्रा, परत ये गड्या !

 


मित्रा, परत ये गड्या !



माझे मित्र, नव्हे नव्हे, दोस्त ! प्रताप नलावडे, पत्रकार, उपसंपादक, आवृत्तीप्रमुख, पक्या सोलापूरकर.. वगैरे वगैरे, माझ्यासोबत पत्रकारिताच नाहीत तर सिनेतामातही काम केलंय या दोस्तानं ! आमच्या या दोस्ताचा आज वाढदिवस .. खाडकन एकदम वर्तमानातून भूतकाळात गेलो राव ! पंढरपूरच्या लोकमत कार्यालयातील तो गजबजाट .. येणाऱ्या प्रत्येकाचं आदरानं हसतमुखानं स्वागत करणारा तो निष्पाप चेहरा, मध्येच पुढील कागदावर नजर पण प्रत्येकाशी बोलतोय असा भाव !

प्रताप नालावडे यांचा चेहरा तसा निष्पाप पण तरीही गूढ ! चेहरा हा माणसांच्या अंतरगाचा आरसा असतो पण या चेहऱ्यात अंतरंग कधीच दिसले नाहीत. मनात वादळ आणि डोक्यात कितीही खळबळ असली तरीही त्यांचा चेहरा अथांग सागरासारखा शांत शांत .. खवळलेल्या सागराच्या लाटा कधी या चेहऱ्यावर दिसल्याच नाहीत !

पत्रकारितेचा सुवर्ण वैभवाचा तो काळ !बाळासाहेब बडवे, अभय जोशी, प्रताप, मी असे काही मोजकेच पत्रकार ! पण पत्रकारितेत काय दम असतो हे दाखविणारे !सहज कुणाकडे नजर टाकली तर समोरचा आपोआप खिशात हात घालून रुमाल बाहेर काढायचा ! प्रताप नलावडे यांची एन्ट्री थोडीशी उशिरा झालेली. लोकमतची छपाई सोलापुरात नुकतीच सुरु झाली आणि आम्हाला एक स्पर्धक पंढरीत आल्याची बातमी मिळाली. प्रताप नलावडे नावाचा तरुण पत्रकार पंढरीत काम करायला आलेला आहे आणि त्यांनी पत्रकारितेतील मास्टरकीची पदवी मिळवली आहे याची चर्चा गावभर झाली. त्याकाळी अशी पदवी घेऊन कुणी आलाय म्हटलं की जग जिंकून आलेला माणूस आहे असं वाटायचं !

पहली भेट झाली तेंव्हा वाटलं, साधा सुधा आणि महत्वाचं म्हणजे एवढा अबोल माणूस पंढरपूर सारख्या ठिकाणी काय पत्रकारिता करणार ? त्यांचा लाघवी स्वभाव पाहून मात्र मनाशी ठरवलं, या माणसाला साथ द्यायचीच ! आणि झाली दोस्ती! अगदी आजपर्यंत, या क्षणापर्यंत ! तसं पाहिलं तर माझ्या स्वभावाशी मॅच होणं तशी कठीण बाब, पण या पट्ठ्यानं निभावलं सारं काही ! अभय जोशी, प्रताप आणि मी .. कुठंही जा, तिघं सोबत असणार. जीवाला जीव देणारे मित्र पण तिघांत प्रचंड स्पर्धा ! तिघातला एक जण तरी रोज नवी बातमी शोधणार, मित्र असलो तरी बातमीतील स्पर्धा कायम ! तिघातील प्रत्येकजण नकळत तणावात असणार, तिघांपैकी उद्या कुणाचा मोठा बॉम्ब पडणार आहे ही काळजी असायचीच. जीवाची दोस्ती पण कुणी आज काय विशेष लिहिलंय याची माहिती कुणीच कुणाला देत नसायचं ! सकाळी एकमेकांचे पेपर पाहायचे आणि ज्याने विशेष काही बातमी केलीय त्यापेक्षा आपली बातमी उद्या सरस झाली पाहिजे अशी दिलदार स्पर्धा चालायची ! पुढे पुढे रात्रीच उद्याच्या अंकातले 'विशेष' एकमेकांना सांगायचो पण कुणीच त्या विषयाची चोरी करीत नव्हते. किती हेल्दी स्पर्धा होती या तीन मित्रात !


पत्रकारिता करणं ही त्या काळात पंढरीतील सोपी गोष्ट नव्हती, कुणीही असला तरी त्याला आमच्या कडक शब्दांची झळ लागायची. अभय जोशींचं जरा वेगळं होतं, त्यांची बेरजेची पत्रकारिता आम्हाला कधी जमली नाही. अभय ज्युनियर असूनही त्यांच्याकडून शिकावं असं खूप काही होतं. पण आम्हाला नाहीत जमलं, 'पडिले वळण' काय करणार ?  मला आणि प्रतापला कायमचं संपवून टाकण्याचा विडा देखील अनेकांनी उचललेला, बिच्चाऱ्याना नाही जमलं ! त्यांच्या या दुःखात सहभागी आहोत . त्रास खूप दिला गेला. हे सगळं आज आठवायचं कारण असं की, एके दिवशी प्रताप सकाळी सकाळीच घरी आले आणि मिठी मारून जोरजोराने रडायला लागले. म्हणाले, जातो मित्रा कायमचं बार्शीला, इथल्या लोकांचा त्रास नाही आता सहन होत.... त्यांना जवळ घेत समजावलं, धीर दिला. शब्दांचा आधार दिला आणि कायमचे बार्शीला निघालेले पाय पंढरीत थांबले. नंतर त्यांनी ते घट्ट रोवले आणि पंढरीच्या पत्रकारितेला आणखी वैभव प्राप्त झाले ! बहुतेक कुणाला माहित नाही, एके दिवशी ते अचानक गायब झाले आणि दुपारनंतर त्यांचा फोन आला. 'आता मी काही येत  नाही, मी तलाठी झालोय' ! अजबच होतं सगळं ! एम जे होऊन चांगल्या वर्तमानपत्रात उपसंपादक असलेला माणूस तलाठी ? 


दुसऱ्याच दिवशी पुन्हा प्रताप पंढरीत हजर ! बागेतलं नाजूक रोपटं उचलून जंगलात लावलं तर ते थोडंच रुजणार आहे ! रुबाबाची आणि दिमाखासह स्वाभिमानाची पत्रकारिता त्यांनी याच पंढरीत केली , पण त्यांच्या चेहऱ्यावरचा निरागस भाव कधी बदलला नाही .. अगदी आजवर ! या पत्रकारितेच्या प्रवाहात प्रताप बीडपर्यंत गेले आणि आता तेथेच रमले, अरे बाप रे ! प्रताप नलावडे यांच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा म्हणून चार ओळी लिहाव्या म्हटलं तर पुरतं चरित्रच व्हायला लागलं ! आवरतं घेतोच !


मित्रा, आज वाढदिवस, त्यानिमित्ताने शुभेच्छा ! तसं तर पहिल्या भेटीपासूनच शुभेच्छा आहेत आणि अखेरच्या श्वासापर्यंत राहतील. असाच निरागस राहा, आनंदी रहा. पण या निमित्ताने एक मागणं आहे, मित्रा, सोड आता बीड आणि ये पंढरीला. पंढरीचा म्हणूनच कायम रहा येथेच ! त्या पत्रकारितेचे दिवस आता इथेही राहिले नाहीत पण तरीही ये ! आपला वापर करून घेतलेले कुणीच 'आपले ' नसतील येथे ! पण आपण तर आहोत एकमेकांसाठी ! दोस्ता, परत ये गड्या !

                                                                     अशोक गोडगे        

1 टिप्पणी:

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !