BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ सप्टें, २०२३

हौसेने कार खरेदी केली पण मालकासह विहिरीत गेली !

  





शोध न्यूज : मोठ्या हौसेने एका शिक्षकाने नवी कोरी कार खरेदी केले आणि पेढे वाटून आनंद साजरा करण्याआधीच ही कार मालकासह थेट विहिरीत गेली आणि तिने मालकाचाही जीव घेतल्याची अत्यंत करुण घटना सोलापूर जिल्ह्यात घडली.  


अपघात सतत होत असतात, अपघाताचे प्रकार देखील वेगवेगळे असतात पण सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील ही अपघाताची घटना मनाला चटका लावून गेली आहे. मोठ्या हौसेने पाच दिवसांपूर्वीच कार घेतली आणि याच कारने मालकाचा अत्यंत विचित्र प्रकारे जीव घेतला आहे. मुळचे मैंदर्गी येथील परंतु अक्कलकोट रोडवरील मल्लिकार्जुन नगर येथे राहणारे आणि वडगाव येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असणारे  ईरण्णा बसप्पा जुजगार (४१) यांनी अवघ्या पाचच दिवसांपूर्वी एक कार खरेदी केली होती. घरी कार आल्याने जुजगार कुटुंब आनंदित होते. रविवारी शाळेला सुट्टी असल्यामुळे  ईरण्णा बसप्पा जुजगार हे शिक्षक आपल्या कुटुंबासह डोणगाव शिवारातील भाटेवावाडी येथे गेले होते.


नवी कार घरी  आल्याचा आनंद होता आणि मित्र, नातेवाईक यांना पेढे वाटायचे होते. त्यासाठी ते भाटेवाडी येथील शेतात गेले होते, त्यांच्यासोबत पत्नी, मुलगा मुलगी हे देखील होते. शेतात पोहोचल्यावर सगळे गाडीतून खाली उतरून घरात गेले पण,  ईरण्णा बसप्पा जुजगार हे गाडीत चालकाच्या खुर्चीवर होते. झाडाखाली गाडी लावण्यासाठी म्हणून ते गाडीत बसले होते. कार झाडाखाली लावण्यासाठी स्टार्ट केली आणि नियंत्रण सुटल्याने ही कार सुसाट वेगात समोरील विहिरीमध्ये क्षणार्धात जाऊन कोसळली.  काय होतेय हे कळण्याआधीच कार थेट विहिरीत गेली  आणि मालकाला घेवून विहिरीत बुडाली. आजूबाजूला लोक असल्यामुळे या घटनेची माहिती लगेच मिळाली आणि त्याचे  नातेवाईक चंद्रशेखर आमले यांनी इतरांच्या सहकार्याने त्यांना पाण्याबाहेर काढले. जुजगार यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल देखील करण्यात आले परंतु दुर्दैवाने त्यांचा आधीच मृत्यू झाला होता. 


कार विहिरीत पडण्यापूर्वी काही क्षण त्यांचे कुटुंब गाडीतून खाली उतरले होते, त्यानंतर ही गाडी थेट विहिरीत गेली, काही क्षण आधी ही दुर्दैवी घटना घडली असती तर मोठा अनर्थ झाला असता. (Teacher dies after car falls into well) या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून शैक्षणिक वर्तुळात देखील दु:ख व्यक्त होत आहे, विचित्र अपघातात मृत्युमुखी पडलेले जुजगार हे शिक्षक दक्षिण सोलापूर तालुका संघाचे कार्याध्यक्ष देखील होते. त्यामुळे शिक्षक संघातून देखील शोक व्यक्त करण्यात येत आहे.



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !