BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१७ सप्टें, २०२३

लग्नास नकार दिल्याने एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून !

 




शोध न्यूज : तरुणीने लग्नास नकार दिला आणि एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून करण्यात आल्याची अत्यंत धक्कादायक आणि  संतापजनक घटना सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात घडली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. 


शहरी भागत एकतर्फी प्रेमातून अनेक गंभीर घटना घडत असतात पण आता एका महाविद्यालयीन तरुणीची हत्या करण्याची घटना, सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागात देखील घडली असल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. सांगोला तालुक्यातील गौडवाडी येथील सचिन मारुती गडदे याने त्याच तालुक्यातील इराची वाडी,  कोळा येथील ऋतुजा दादासो मदने या तरुणीची हत्या केल्याची बाब समोर आली आहे. ऋतुजाच्या हातावर, डोक्यावर, गळयावर घातक शस्त्राने वार करून तिचा जीव घेतला आहे. याबाबत ऋतुजाचे मामा पांडुरंग सरगर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


सदर फिर्यादीनुसार, पांडुरंग सरगर यांची भाची असलेली, अठरा वर्षे वयाची  ऋतुजा, हिचा विवाह सांगोला तालुक्यातील कोळा येथील समाधान कोळेकर याच्याशी झाला होता. विशेष म्हणजे हा विवाह अडीच वर्षांपूर्वीच झालेला होता. या विवाहानंतर मयत ऋतुजा आणि समाधान कोळेकर यांचा रीतसर घटस्फोट झाला होता. त्यामुळे ऋतुजा ही आपल्या आईवडीलांकडे राहत होती आणि ती महाविद्यालयीन शिक्षण देखील घेत होती.  मयत ऋतुजा हिचा विवाह होण्याआधी , सांगोला तालुक्यातील गौडवाडी येथील सचिन मारुती गडदे याने, ऋतुजाचा विवाह होऊ नये यासाठी प्रयत्न केले होते. ऋतुजाने आपल्याशीच लग्न करावे असा त्याचा अट्टाहास होता. तसे त्याने बोलूनही दाखवले होते. ऋतुजाचा घटस्फोट झाल्यानंतर सचिन मदने पुन्हा तिच्या संपर्कात आला होता. दोघे परस्परांना भेटही होते परंतु तो यावेळी लग्नासाठी दबाव टाकत होता.


ऋतुजा ही सचिन मदने याचेसोबत लग्न करण्यासाठी प्रारंभी राजी झाली होती परंतु तिच्या घरच्या लोकांनी याला संमती  दिली नाही. त्यानंतर मात्र सचिन मदने याने पांडुरंग सरगर यांची भेट घेतली आणि ऋतुजा एका मुलासोबत पळून जाणार असल्याची माहिती दिली. तिचे एका तरुणाशी संबंध असून ते दोघे पळून जाणार आहेत तसेच ते दोघे लग्न देखील करणार आहेत असे तर सांगितलेच पण, त्या दोघांचे फोटो, आणि फोनवरील संभाषणाची क्लिप देखील ऐकवली होती. ऋतुजा माझी झाली नाही तर तिला कुणाचीच होऊ देणार नाही असे सचिन मदने म्हणत होता. ऋतुजा मात्र आता लग्नाला तयार नव्हती, त्यामुळे सचिन मदने हा ऋतुजावर चिडून होता. आणि त्या रागाचे पर्यवसान अखेर अत्यंत धक्कादायक घटनेत झाले.

 

काल शनिवारी संध्याकाळच्या वेळेस मयत ऋतुजाची आई सावित्रीबाई या दुध घालण्यासाठी डेअरीवर गेल्या होत्या. यावेळी ऋतुजा ही घरी एकटीच होती. ही संधी सचिन गडदे यांनी साधली आणि घरात घुसून ऋतुजावर प्राणघातक हल्ला केला. हात, डोके आणि गळयावर शस्त्राने वार करीत तिचा खून केला. अशा आशयाची फिर्याद मयत ऋतुजा हिचा  मामा पांडुरंग सरगर यांनी  पोलिसात दिली. मयत ऋतुजाचे वडील मुकबधीर आहेत तसेच ते पायाने देखील दिव्यांग आहेत. ऋतुजाची आई देखील एका पायाने अपंग आहे .  या घटनेची माहिती मिळताच सांगोला तालुक्यात मोठी खळबळ उडालेली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळास भेटी दिल्या आहेत. संशयित आरोपी सचिन मदने हा मात्र पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत असून  लवकरच त्याला अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.  


सदर घटनेचा सोलापूर जिल्ह्यातून निषेध करण्यात येत असून, अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे तर, अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. (Killing of college girl due to one sided love,) या घटनेची सांगोला तालुक्यात चर्चा असून, गावागावातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. 








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !