शोध न्यूज : शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने पिकवलेले साडे तीन हजार किलो टोमॅटो अक्षरश: रस्त्यावर फेकल्याची एक दुर्दैवी आणि अंतर्मुख करणारी घटना सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात घडली आहे.
जगाचा पोशिंदा आणि सर्वांचा अन्नदाता म्हणून ज्याची ओळख आहे तो बळीराजा सतत मोठ्या अडचणीत सापडत आहे. कर्ज काढून आणि घाम गाळून तो शेती पिकवतो. शेतीतून उत्पादन निघाले की, कर्ज फेडून उरलेल्या रकमेवर संसाराचे काही नियोजन करीत असतो, प्रत्यक्षात मात्र निसर्गाच्या लहरींमुळे हे उत्पादन त्याच्या हाती कितपत लागेल याची त्यालाही शाश्वती नसते. निसर्गाच्या तडाख्यातून वाचले तरी बाजारात गेल्यावर त्याच्या घामाला कवडीची किंमत नसते असा अनुभव सातत्याने येत असतो. शेतीमालाला बाजारात कवडीची किंमत मिळते. त्याच्या कष्टाचा मोबदला मिळणे तर दूरच पण, उत्पादन घेण्यासाठी त्याने केलेला खर्च देखील त्याच्या पदरात पडत नाही. अशा दुष्टचक्रात सापडलेला शेतकरी अखेर निराश होऊन टोकाचे पाऊल उचलतो. शेतकऱ्याच्या बलिदानाची केवळ चर्चा होते पण तो खंबीर उभा राहावा यासाठी कुठल्याच पातळीवर काही होताना दिसत नाही.
शेतीचा माल बाजार समितीत घेऊन गेल्यानंतर त्याच्या पदरात काही पडण्याऐवजी तिथला खर्च देऊन त्याला रिकाम्या हाती परतावे लागत असल्याच्या अनेक घटना घडताना दिसतात. शेतीचे उत्पन्न तर नाहीच पण खिशातील काही रक्कम बाजार समितीत देऊन त्याला घरी परतावे लागते, अशावेळी याची मनस्थिती काय असू शकते याचा कुणालाही अंदाज येऊ शकतो. अशाच एका निराश झालेल्या शेतकऱ्याने, थोडाथोडकी नव्हे तर तब्बल साडे तीन हजार किलो टोमॅटो रस्त्यावर फेकून दिला आहे. (The farmer threw tomatoes on the road) रस्त्यावर फेकेलेले हे टोमॅटो पिकविण्यासाठी, आणि ते जपण्यासाठी त्याने किती कष्ट आणि पैसाही खर्च केला असेल ! मंगळवेढा - सोलापूर रस्त्यावर इचगाव येथे या शेतकऱ्याने हे टोमॅटो अक्षरशः फेकून दिले आहेत.
मंगळवेढा तालुक्यातील इचगाव येथील शेतकरी संदीप पाटील यांनी आपल्या शेतात टोमॅटोचे पीक घेतले. अलीकडे टोमॅटोचा भाव भलताच वधारला होता. दोनशे रुपये किलोचा भाव टोमॅटोला मिळत होता. आपल्या टोमॅटोला देखील असाच भाव मिळेल या आहेत पाटील होते पण ऑगस्ट महिन्यातील दर सप्टेंबर महिन्यात राहिले नाहीत. मोठा दर मिळत असलेला टोमॅटो अचानक खाली आला आणि अनेक उत्पादक शेतकऱ्यांची स्वप्ने भंगली. शेतकरी संदीप पाटील यांनी आपल्या शेतात टोमॅटो लावल्यानंतर मोठ्या कष्टाने जोपासले होते. त्यासाठी महिला शेतमजुराचा तीनशे तर पुरुष मजुराला ४०० रुपये मजुरी देत त्यांनी टोमॅटोची जोपासना केली होती. बाजारात टोमॅटो भाव खाऊ लागल्यामुळे आपल्याही कष्टाचे चीज होईल अशी अपेक्षा त्यांना होती परंतु बाजरात गेल्यावर त्यांना वेगळाच अनुभव आला.
आपल्या दीड एकर क्षेत्रात त्यांनी टोमॅटोची लागवड केली होती, ही लागवड आणि जोपासना करण्यासाठी त्यांना अडीच लाखांचा खर्च आला होता. टोमॅटो लालबुंद झाल्यानंतर त्यांनी मोठ्या अपेक्षेने मोडनिंब बाजारात टोमॅटो नेला पण तेथे त्यांचा अपेक्षाभंग झाला. टोमॅटोचा आकार लहान असल्याचे सांगून तेथे त्यांचा टोमॅटो घेतला गेला नाही, नंतर त्यांनी तोच टोमॅटो सोलापूर येथे नेला पण तेथेही तसाच अनुभव आला. शेतकऱ्याच्या मालाला तर नाहीच पण त्याच्या कष्टाला देखील किंमत नाही याचा अनुभव घेत ते निराश होऊन माघारी फिरले. त्यांच्या पदरात दमडी पडली नाही उलट पन्नास हजार रुपयांचे नुकसानच झाले. सोलापूरहून परत इचगावला जात असताना त्यांनी साडे तीन हजार किलो टोमॅटो रस्त्यावर फेकले आणि घर गाठले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !