BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२१ सप्टें, २०२३

सोलापूर जिल्ह्यातील महा ई सेवा केंद्राचा मोठा झोल उघडकीस !

  


शोध न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील महा ई सेवा केंद्रातील मोठा झोल उघडकीस आला असून केंद्र चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


जनतेच्या सोईसाठी असलेली महा ई सेवा केंद्र सतत नागरिकांच्या चर्चेत असतात. काहीं सेवा केंद्रे तर केवळ आणि केवळ जनतेची पिळवणूक करीत असतात. अनकेदा काही महा इ सेवा केंद्र वादातही सापडली आहेत, परंतु मंगळवेढा येथील एका केंद्रातील मोठा गैरप्रकार चव्हाट्यावर आला असल्याने, किती खोटी कागदपत्रे आत्तापर्यंत सरकारी दरबारी गेली आहेत याचीही चौकशी होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पोलीस दलात भरती झालेल्या एका तरुणीला आर्थिक दुर्बल घटकाचा चक्क बनावट दाखला दिला असल्याचेच उघडकीस आले आहे. (Fake certificate from Maha E Seva Kendra) त्यामुळे नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे यांनीच पोलिसात फिर्याद दिली असून महा इ सेवा केंद्र चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण उघडकीस येताच मोठी खळबळ उडाली आहे.


मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथील तनुजा तानाजी नकाते या तरुणीची पोलीस भरतीत निवड झाली आणि त्यानंतर पोलीस आयुक्त कार्यालय मुंबई यांच्याकडून पडताळणीसाठी प्रस्ताव आला. ही पडताळणी करीत असताना, तनुजा हिला दिलेला आर्थिक दुर्बल घटकाचा दाखला खोटा असल्याचे समोर आले. बारकोडच्या माध्यमांतून तपासणी केली असता, सदर दाखला आशुतोष बाळासाहेब गणेशकर यांच्या नावाने दिलेला असल्याचे आढळून आले.  सदर महा ई सेवा केंद्राचे चालक सुहास सुर्यकांत घोडके (बोराळे) याने बारकोड क्रमांक जशाचा तसा ठेवत गणेशकर  यांच्या नावामध्ये तांत्रीक पध्दतीने  फेरबदल करून त्या नावाच्या ऐवजी  तनुजा तानाजी नकाते  हिचे नाव टाकून बनावट आर्थिक दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र दिल्याचे या पडताळणीत निष्पन्न झाले   त्यानंतर लगेच हे महा इ सेवा केंद्र सील करण्यात आले. केंद्रचालक सुहास सुर्यकांत घोडके याच्याविरुद्ध फसवणुकीच्या ४२० कलमासोबत अन्य कलामांच्या द्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने दिलेल्या या बनावट दाखल्यामुळे पोलीस भरती झालेल्या या तरुणीला नोकरीपासून वंचित राहावे लागले आहे. अलीकडेच एका महा इ सेवा केंद्रात जातीच्या दाखला देण्यात गोंधळ झाला होता. एका जातीचा दाखला  मागितला असताना दुसऱ्याच जातीचा दाखल  दिला गेला होता आणि आता हे एक मोठे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !