BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ सप्टें, २०२३

पंढरपूर तालुक्यातील व्यक्तीचा मृतदेह मोहोळ तालुक्यात !

 


शोध न्यूज : पंढरपूर तालुक्यातील एका व्यक्तीचा अत्यंत वाईट अवस्थेतील मृतदेह मोहोळ तालुक्यात आढळून आला असून या मृतदेहाची ओळख पटली आहे. या घटनेबाबत पोलीस चौकशीला लागले आहेत. 


महाराष्ट्रात ग्रामीण भागातही गुन्हेगारी वाढली असून खेडोपाडीही गुन्हेगारीचे वातावरण गेल्या काही वर्षात निर्माण होताना दिसत आहे. खून, बलात्कारासारख्या घटना ग्रामीण भागातही दिसून येत आहेत. अशातच सोलापूर जिल्ह्यातील आणखी एक घटना समोर आली आहे. पंढरपूर तालुक्यातील एका व्यक्तीचा मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत मोहोळ तालुक्यात आढळून आल्याने ऐन गणेशोत्सवात पोलिसाना हे काम लागले आहे . मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे एका शेतात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आणि परिसरात खळबळ उडाली. मृतदेहाची अत्यंत दुरवस्था होती पण, खिशात असणाऱ्या औषधाच्या गोळ्या, अंगावरील कपडे आणि चप्पल यावरून पोलिसांनी माहिती मिळवली आणि या मृतदेहाची ओळख देखील पटवली आहे. 


पोलिसांनी केलेल्या चौकशीत सदर मृतदेह हा, पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथील २८ वर्षांचा तरुण शंकर मारुती वाघमोडे यांचा असल्याचे समोर आले.  मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील मनोहर दिगंबर चव्हाण हे पिकांना पाणी देण्यासाठी शेतावर गेले होते त्यावेळी त्यांना, भटकी कुत्री काही खात असल्याचे दिसून आले. चव्हाण यांनी याचा शोध घेतला असता, शेजारी असलेल्या शेतातून त्यांना दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांनी बबन चव्हाण यांच्या शेतात जाऊन पाहिले असता त्यांना, एक मानवी मृतदेह पडलेला दिसला. या मृतदेहाचे लचके कुत्री तोडत असल्याचे अमानवी चित्र त्यांना पाहायला मिळाले.  त्यानंतर या घटनेची माहिती मोहोळ पोलिसांपर्यंत पोहोचली. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आपली पुढील कार्यवाही सुरु केली.


मृतदेहाजवळ कपडे, चप्पल त्यासोबतच मृतदेहाच्या खिशात औषधांच्या गोळ्या देखील दिसून आल्या. शिवाय मोहोळ पोलीस ठाण्यात आधीच ही व्यक्ती बेपत्ता झाल्याची नोंद झालेलीच होती, त्यामुळे पोलिसांना ओळख पटविण्यात फारसा वेळ लागला नाही. पोलिसांनी पुळूज येथील वाघमोडे कुटुंबाला याची माहिती दिली. ( A suspicious body was found in Mohol taluka) बेपत्ता असलेल्या शंकर वाघमोडे याची आई आणि पत्नी यांनी मृतदेह पहिला असता, तो शंकर याचाच असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मृतदेहाची लगेच ओळख पटू शकली. परंतु हा मृत्यू नेमका कशामुळे झाला ? आत्महत्या आहे की घातपात आहे ? अशा सर्व बाजूनी मोहोळ पोलीस आता तपास करू लागले आहेत. या घटनेने मात्र टाकळी सिकंदर आणि पुळूज परिसरात खळबळ उडाली आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !