BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ सप्टें, २०२३

'महावितरण' चा आणखी एक लाचखोर सापडला !

 


शोध न्यूज : पंढरपूर येथील महावितरण विभागातील सहाय्यक लेखापालालाच मोठा शॉक बसला असून, पाच हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे, त्यामुळे महावितरण विभागातील भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. करमाळा येथे देखील कृषी विभागातील एक जण लाचखोरीत सापडला आहे.


सोलापूर जिल्ह्यात सगळीकडे विजेची खुलेआम चोरी सुरु असते, या चोरीत महावितरणच्या काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांचा देखील समावेश असू शकतो अशी चर्चा तर नेहमीच सुरु असते. वीज चोरीमुळे प्रामाणिकपणे बिले भरणाऱ्या ग्राहकांना अकारण आर्थिक भार सोसावा लागतो. वीज चोरीच्या प्रकरणात देखील लाच कशी घेतली जाते हे दाखविणारी घटना, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चव्हाट्यावर आणली आहे. वीज चोरीच्या एका प्रकरणात झालेला दंड माफ करण्यासाठी, पंढरपूर ग्रामीण - २ विभागातील सहाय्यक लेखापाल याने लाच मागितली आणि ती घेताना तो रंगेहात पकडला देखील गेला आहे.  पुणे विभागाच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.


शेजारच्या दुकानातून वीज घेतल्यामुळे ७० हजार रूपये दंड झाल्याचे सांगत हा दंड माफ करण्यासाठी म्हणून ५ हजारांची लाच स्वीकारताना महावितरणच्या सहाय्यक लेखापालास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडून गजाआड केले. काल शुक्रवारी  सायंकाळी येथील महावितरण कार्यालयाच्या आवारातच एसीबीची कारवाई यशस्वी झाली आहे.  पंढरपूर ग्रामीण -२ कार्यालयात सहाय्यक लेखापाल असलेल्या श्रीकांत भीमराव आवाड (वय ३८, रा. जुना विडी घरकुल, सोलापूर) याला पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आणि महावितरण वर्तुळात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली. एका दुकानदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदार यांचे दुकान असून त्यांना नवीन मीटर घ्यायचा होता. तोपर्यंत त्यांनी शेजारच्या दुकानातून विजेचे कनेक्शन घेत विजेचा वापर केला होता.परंतु असा प्रकार चोरी ठरते आणि त्यामुळे लाचखोर आवाड याने, या दुकानदाराला ७० हजार रुपयांचा दंड आकाराला असल्याचे सांगितले.


सदरचा ७० हजार रुपयांचा दंड माफ करण्यासाठी या लाचखोर लेखापालाने सदर दुकानदाराकडे पंधरा हजार रुपयांची मागणी केली, या रकमेत तडजोड होऊन पाच हजार रुपयांची लाच देण्याचे ठरले. दुकानदाराने मात्र या लाच मागणी प्रकरणी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची सदर विभागाने तातडीने पडताळणी देखील केली आणि या पडताळणीत महावितरण सहाय्यक लेखापालाने लाचेची मागणी केल्याचे दिसून आले. त्यानंतर महावितरण पंढरपूर ग्रामीण - २ या कार्यालयाच्या आवारातच सापळा लावण्यात आला. ठरल्याप्रमाणे सहाय्यक लेखापाल आवाड याने सदर पाच हजार रुपयांची लाच स्वीकारली आणि लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. त्यानंतर मात्र महावितरण कार्यालयाच्या आवारात मोठी खळबळ उडाली. 


कृषी पर्यवेक्षकही जाळ्यात !

पंढरपूर येथे महावितरण कर्मचारी लाचेच्या सापळ्यात अडकला असतानाच, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे एक कृषी पर्यवेक्षक लाच प्रकरणात अडकला आहे  पॉवर टिलर पडताळणी पत्रासाठी कृषी पर्यवेक्षक भारत शेंडे यांनी दहा हजार लाचेची मागणी केल्याची तक्रार करण्यात आली होती.


शासनाच्या महाडीबीटी या पोर्टलवर अनुदानावर पॉवर टिलर मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्याबाबत तक्रारदार यांना पूर्वसंमती मिळाली. त्यानंतर त्यांनी पॉवर टिलर खरेदी करून सर्व कागदपत्रे लोड केली; परंतु पडताळणी रिपोर्ट हा कृषी पर्यवेक्षक भारत शेंडे यांनी द्यावयाचा होता. (Bribes in the Department of Mahadistribution and Agriculture caught red-handed) रिपोर्ट देण्यासाठी दहा हजार रुपये मागितल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.  त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला आणि या सापळ्यात लाचखोर भारत शेंडे अलगद अडकला. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !