शोध न्यूज : भारतीय जनता पक्षासोबत गेलो ही चूक झाली, भाजपने शिंदे गटाची मोठी गोची केली अशी कबुलीच आज माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी फोडून अजित पवार आणि कंपनीने राज्यात दुसरा राजकीय भूकंप घडवला आहे पण यातून आणखी एक भूकंप होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अजित पवार हे लवकरच मुख्यमंत्री होतील असे सांगितले जात असताना आणि अजित पवार यांच्या सरकारमध्ये दाखल होण्याने शिंदे गट अस्वस्थ तर आहेच पण अनेक आमदार नाराज असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच मंत्रीपद मिळण्याच्या कारणावरून शिंदे गटातील आमदारांत धक्काबुक्की झाल्याची माहिती प्रसार माध्यमात झळकली. अर्थात अशी घटना घडली नसल्याचे देखील सांगण्यात येऊ लागले आहे. काही नाराजी लपवली जात आहे तर काही प्रमाणत ती बाहेर देखील पडत आहे. असे असतानाच स्पष्ट बोलण्यात प्रसिद्ध असलेले आमदार बच्चू कडू यांनी मात्र आज सगळ्यांच्याच मनात असलेल्या खदखदीला बोलते केले आहे. त्यामुळे शिंदे सरकारमधील अस्वस्थता दिसून आली आहे.
आमदार बच्चू कडू आज वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात आपली भावना व्यक्त केली आहे. अजित पवार सरकारमध्ये दाखल झाल्याबाबत देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिंदे गटाची नाराजी असणे स्वाभाविकच आहे, आपण राष्ट्रवादीला सोडून भाजपकडे गेलो, राष्ट्रवादी आम्हाला कामे करू देत नाही असाच सूर त्यावेळी होता. पण आता मात्र सगळी गोची झाली आहे. राष्ट्रवादीच आता भाजपमध्ये आली आहे, मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे चाळीस आमदार आहेत त्यांच्यापुढे एक मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे. म्हणजे भाजपला साथ देणे चुकीचे ठरले अशीच एकंदर स्थिती आहे. असे देखील त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे.
राष्टवादीचा सरकारमधील प्रवेश होण्याआधी विचारायला हवे होते, चर्चा करायला हवी होती, आम्ही घटकपक्ष असून आम्हालाही हे माहिती होत नाही, तुमची संख्या वाढत चालली म्हणून तुम्ही आता आम्हाला विचाराने बंद केले असेल, पण अशा पद्धतीने समोर जात असाल तर हे चुकीचे आहे. एकमेकाबद्धल जर विश्वासघात व्हायला लागला तर त्याचे परिणाम आज नसले तरी भविष्यात नक्की दिसणार आहेत. (Shinde group in trouble due to BJP, Bachu kadu) शिंदे गटातील आमदार राष्ट्रवादीकडे बोट दाखवत होते, राष्ट्रवादीने प्रॉब्लेम केला असे सांगत होते, आणि आता राष्ट्रवादीच सोबत आहे. त्यामुळे पुन्हा तेच होण्याची शक्यता आहे. अजितदादा आता सरकारमध्ये आल्यामुळे आता सगळीच अडवणूक होईल अशी भीती शिंदे गटाला आहे. ज्याच्यामुळे बाहेर पडलो तीच गोष्ट पुन्हा समोर येत असेल तर शिंदे गटासाठी हे अडचणीचे आहे.
भाजपाने केवळ भाजप मजबूत करण्याचे ठरवले आहे, सोबत येणारा माणूस मरो की खड्ड्यात पडो त्याचा विचार करायचा नाही, त्यांना फक्त लोकसभा निवडणूक जिंकायची आहे, त्यासाठी कुठल्याही पद्धतीने काहीतरी घडवून आणण्याचा प्रयत्न ते करीत असतात, पण यामुळे जास्त नुकसानीला भाजपला सामोरे जावे लागणार आहे, आपल्या सोबतीला कुणी आल्यानंतर त्याची काही गोची होईल, तो अडचणीत येईल याचा विचार न करता, पुन्हा पुन्हा अनेकांना सोबत घ्यायचे, दुसरा आला की पहिल्याला खड्ड्यात टाकायचे असे प्रकार राजकारणात अधिक काळ टिकत नाहीत. भाजपने दिलेला शब्द पाळावा, विश्वासघात करू नये असे आम्हाला वाटते . असह शब्दात आमदार बच्चू कडू यांनी आमदारांच्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !