शोध न्यूज : अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर राजकारणात मोठा राडा पाहायला मिळत असतानाच शिंदे गटातील दोन आमदारांत मंत्रीपदाच्या कारणावरून चक्क धक्काबुक्की आणि मोठी बाचाबाची झाल्याचे समोर आले आहे.
शिवसेना फोडून एकनाथ शिंदे यांनी भाजपशी जवळीक साधली, त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले आणि अन्य काहीना मंत्रीपद देखील मिळाले, शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेल्या पन्नास आमदारांपैकी अनेकांना मंत्रीपद पाहिजे आहे पण त्यांना गेल्या वर्षभरात हुलकावणीच मिळाली आहे. सतत मंत्रीपदाचे गाजर दाखविण्यात आले पण प्रत्यक्षात त्यांना मंत्रीपद मिळू शकले नाही, हे अस्वस्थ मंत्री पुढील विस्ताराची वाट पाहत होते पण त्याआधीच राज्यात दुसरा भूकंप घडला आणि राष्ट्रवादी फोडून अजित पवार हे उप मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर जाऊन बसले. त्यांच्या सोबत राष्ट्रवादीतून आलेल्या ८ आमदारांना देखील थेट मंत्रीपद मिळाले. शिंदे गटातील आमदार मात्र हे सगळे पहात बसले असून त्यांच्यात नाराजीची लाट उफाळली आहे. अजित पवार यांनी घडवलेला भूकंप हा केवळ राष्ट्रवादीसाठीच नव्हे तर शिंदे गटासाठी देखील धक्का देणारा ठरला आहे. अजित पवार यांच्या एन्ट्रीमुळे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री पदावर राहतील की नाही ? याची देखील चर्चा सुरु झाली आहे त्यामुळे चाळीस बंडखोर अस्वस्थ असणे स्वाभाविक बनले आहे.
अजित पवार यांना थेट मुख्यमंत्रीपद आणि त्यांच्यासोबत त्यांचा ८ मंत्र्यांना मंत्री पद मिळते पण आपल्या वाट्याला काहीच येत नाही त्यामुळे शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ आहेतच पण त्यातून दोन आमदारांत जोरदार हमरातुमरी देखील झाल्याची माहिती बाहेर आली आहे. यातून या गटात असलेली अस्वस्थता प्रतिबिंबित होत आहे. हा वाद एवढा टोकाला गेला की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपला दौरा अर्धवट सोडून नागपूर येथून मुंबईला यावे लागले आहे. शिंदे गटाचे दोन आमदार एकमेकांना भिडले आणि हा वाद मिटविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नागपूर येथून धाव घ्यावी लागली आहे. प्रसिद्ध झालेल्या बातम्यानुसार मंत्रीपदाच्या कारणावरून दोन आमदारांत धक्काबुक्की आणि हाणामारी झाली. अजित पवार यांच्या एन्ट्रीमुळे आता शिंदे गटातील आमदारांच्या मंत्रीपदाच्या आशा मावळल्या आहेत आणि त्यातूनच ही अस्वस्थता बाहेर आली आहे.
मंत्री होऊ इच्छित असलेल्या आमदारांना आता मंत्रीपद मिळणे कठीण दिसू लागले आहे त्यामुळे शिंदे गटातील ज्या आमदारांना गेल्या वर्षापासून मंत्रीपद आहे, त्यांचे पद काढून घेवून ते इतर आमदारांना दिले जावे अशी काही आमदारांची अपेक्षा आहे .तशी मागणीही करण्यात आली आणि त्यातून ही बाचाबाची झाली. मंत्रीपदावर दावा सांगणाऱ्या दोन आमदारांच्यात ही लढाई झाली, शाब्दिक चकमकीनंतर हे प्रकरण थेट हातघाईवर पोहोचले आणि त्यांच्या मारामारीही झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. (Clash among MLAs from Shinde group for minister post) या प्रकारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मध्यस्थी करावी लागली तसेच त्यांनी आमदारांची समजूत देखील काढली आहे. हा सगळा प्रकार घडल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी पक्षात कुणीही नाराज नसल्याचे सांगितले आहे. तथापि शिंदे गटातील नाराजी आणि अस्वस्थता लपून राहिली नाही. येत्या काही दिवसात राज्यात बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता देखील व्यक्त होऊ लागली आहे.
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !