BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ जुलै, २०२३

सरपंच, ग्रामसेवकाने घरकुलात घोटाळा केल्याचा आरोप !


शोध न्यूज : महिला सरपंच आणि  ग्रामसेवक यांनी  संगनमताने बनावटगिरी करीत घरकुलात घोटाळा केल्याचा आरोप उपसरपंचानेच केला आहे तर ग्रामसेवकांनी याला स्थानिक राजकारण असल्याचे म्हटले आहे.

 

घरकुल योजनेत अनेक गैर प्रकार समोर येत असतात पण सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील बोरी उमरगे येथील ग्रामपंचायतीत एक धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे, विशेष म्हणजे हा आरोप त्याच ग्रामपंचायतीचे उपसरपंच असलेल्या बसवराज साखरे यांनी केला असल्याने याला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. साखरे यांनी एक पत्रकार परिषद घेत हा धक्कादायक आणि खळबळजनक आरोप केला आहे. बोगस मासिक सभा दाखवून बनावट ठरावाद्वारे बोगस उतारा तयार करून, घरकुल बांधकाम न करता बांधकाम केले असे खोटे दाखवून सरपंच निर्मला बिराजदार आणि ग्रामसेवक ठेंगील यांनी सुमारे दोन लाख चाळीस हजार रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप उपसरपंच बसवराज साखरे यांनी पत्रकार परिषदेत केला. याप्रकरणी आरपीआय तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे यापूर्वी तक्रार दिली आहे. असेही साखरे यांनी यावेळी  सांगितले आहे. 


 सरपंच आणि ग्रामसेवक यांनी  १२ डिसेंबर २०२२ रोजी मासिक सभा झाल्याचे खोटे दाखवत घर क्रमांक २४४ यावर प्रकाश पुजारी या नावाने बोगस उतारा तयार करण्यात आला आहे.बोगस मासिक ठरावाद्वारे घर जागा क्र. २४४ ह्या जागेची खोटी खरेदी दाखवून प्रकाश पुजारी यांचे नाव कमी करून नागम्मा अस्वले यांची नोंद केली आहे. सदर घरकुल बांधकाम करारनामामध्ये घर जागा क्र. २४४ चा बोगस उतारा जोडून घरकूल न बांधता रक्कम रुपये ६०,००० उचलले आहेत. असा आरोप उप सरपंच साखरे यांनी केला आहे. या प्रकरणातील चौकशी अधिकारी यांच्यावर देखील संगनमत केल्याचा आरोप त्यांनी केला आहे त्यामुळे या प्रकरणास वेगळे वळण लागू लागले आहे. ग्रामसेवक, चौकशी अधिकारी यांच्या संगनमताने आर्थिक अपहार झाला आहे. या व्यतिरिक्त घरकुल विभागाकडून बी. एस. कोळी यांच्या नावाने प्रत्यक्षात घरकुलाचे बांधकाम केले नसताना  दि. २३ मार्च २०२३ रोजी एकाच वेळी एक लाख वीस हजार रुपये बँक खात्यावर जमा केले असल्याचे म्हटले गेले आहे.


लोक सेवक अथवा सरकरी नोकरांनी कायदा डावलून काम करणे हा फौजदारी गुन्हा असल्याने सरपंच, ग्रामसेवक, चौकशी अधिकारी आणि यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून तात्काळ या सर्वांना बडतर्फ करावे, अशी मागणी साखरे आणि माजी ग्रा.पं. सदस्य दत्तात्रय अस्वले यांनी केला आहे. (Sarpanch, gram sevak allegation of scam in Gharkul) घर जागा क्रमांक २४४ च्या नोंदीचे मासिक ठरावाची कागदपत्रे ग्रा.पं.दप्तरी उपलब्ध नसल्याचे चौकशी अधिकारी जमादार यांनी हवाल दिला आहे. असे असतानाही गटविकास अधिकारी यांनी अहवालाचे वाचन करून त्यावर त्यांचे अभिप्राय आणि त्यावर केलेली कार्यवाही हे तक्रारदार यांना देणे बंधनकारक असतानाही दिली नाही. अशा प्रकारचे अत्यंत धक्कादायक आणि  खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. 


या प्रकरणी ग्रामपंचायत सरपंच निर्मला बिराजदार यांनी मात्र बोलण्यास नकार दिला असून ग्रामसेवक श्रीकांत ठेंगील यांनी मात्र हे राजकारण असल्याचे म्हटले आहे. घराकुलाबाबत लोकात आपसात वाद सुरु आहेत आणि त्यात त्यांच्यातील राजकारणात हे लोक प्रशासनाला देखील ओढत आहेत असे ग्रामसेवक म्हणत आहेत. घरकुल प्रकरणातील या कथित घोटाळ्याची आणि आरोपांची मात्र तालुक्यात जोरदार चर्चा सुरु असून प्रशासन आता नेमकी काय भूमिका घेतेय याकडे लोकांचे लक्ष लागलेले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !