शोध न्यूज : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष फोडून सत्तेत सहभागी झालेले बंडखोर आज अचानक पुन्हा शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी सोडणार नाही असे सांगणारे अजित पवार हे राष्ट्रवादी सोडून भाजपच्या सोबत गेले, जाताना त्यांनी आपल्या सोबत पक्षातील अनेक आमदार नेले आणि शरद पवार यांना या वयात एकाकी पाडले. त्यामुळे महाराष्ट्राचे मन सुन्न झाले आहे. शिवसेना फोडून बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना राज्यातून मोठी सहानुभूती आहे आणि आता शरद पवार यांना देखील जनतेतून सहानुभूती मिळू लागली आहे. सत्तेसाठी राजकारणात कुठलीही पातळी गाठली जाते हे या दोन पक्षातील फोडाफोडीमुळे दिसून आलें आहे तसेच राजकारणात कधीही आणि काहीही घडू शकते हे देखील पुन्हा सिद्ध झाले आहे. राष्ट्रवादीचा फुटलेला गट, विशेषत: अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर जाहीर टीका देखील सुरु केली आहे. अशा परिस्थितीत फुटीर आमदार आज अचानक शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आणि महाराष्ट्राचे कान पुन्हा उभे राहिले.
अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर या आमदारांची बैठक बोलाविण्यात आली होती आणि नंतर हे आमदार तेथून थेट शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले. भेटीची वेळ अथवा परवानगी देखील मागितली नसताना हे आमदार थेट पवारांच्या भेटीला पोहोचले. शरद पवार यांच्या भेटीला पोहचलेल्यांमध्ये दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, आदिती तटकरे, सुनील तटकरे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, नरहरी झिरवळ, संजय बनसोड, हसन मुश्रीफ यांचा समावेश होता. या आमदारांनी अचानक शरद पवार यांची भेट घेतली असली तरी शरद पवार यांनी त्यांना फारसा प्रतिसाद दिला नसल्याचे प्रफुल्ल पटेल यांनीच सांगितले आहे. वेळ न मागता आम्ही येथे आलो. शरद पवार येथे आहेत हे आम्हाला समजले होते त्यामुळे आम्ही सगळे ही संधी साधून येथे पोहोचलो. आम्ही पवार साहेबांचे आशीर्वाद मागितले. असे पटेल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
प्रफुल्ल पटेल म्हणाले, 'पक्ष एकसंध कसा राहू शकतो, यासाठी त्यांनी विचार करावा यासाठी आम्ही त्यांच्याकडे विनंती केली आहे, पवार साहेबांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शांतपणे आमचं मत ऐकून घेतलं. त्यानंतर आम्ही बाहेर आलो. उद्यापासून आम्ही आपापल्या विभागाची जबाबादारी विधानसभेमध्ये पार पाडू' असे देखील पटेल म्हणाले. या बंडखोर आमदारांनी शरद पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाल्याचे दिसले नाही. अजित पवार आणि बंडखोर शरद पवार यांना भेटून परत गेल्यानंतर शरद पवार यांची एक बैठक जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे यांच्यासोबत सुरु झाली.
उद्या सोमवारपासून राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होत असून यावेळी बऱ्याच घटना घडण्याची शक्यता आहे. किती आमदार विरोधी बाकांवर आणि किती आमदार सत्ताधारी गटात बसणार आहेत हे अधिवेशनात स्पष्ट होणार आहे, दोन्ही बाजूनी व्हीप जारी केले जाण्याची शक्यता असून या व्हीपचे पालन न केल्यामुळे किती आमदार पुन्हा अडचणीत सापडणार आहेत हे देखील उद्या स्पष्ट होणार आहे. (MLAs who broke NCP again to Sharad Pawar) यामुळे पुन्हा एकदा कायदेशीर लढाईची सुरुवात उद्याच्या अधिवेशनापासून होण्याची अधिक शक्यता दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचेही लक्ष याकडे लागले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !