शोध न्यूज : अखेर पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे सोसायटी मधील 309 सभासदांचे सभासदत्व रद्द करण्यात आले असून सहाय्यक निबंधक यांनी हा आदेश दिल्याने तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
खेडभोसे विविध कार्यकारी सोसायटीचे कार्यक्षेत्र हे खेडभोसे गावापुरते मर्यादित असताना संचालक मंडळाने चक्क पंढरपूर आणि सांगोला तालुक्यातील तब्बल 11 गावांमधील सभासद सोसायटीला सलग्न करून घेण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. याबाबत सहायक निबंधक पी. सी. दुरगुडे यांनी या कार्यक्षेत्राबाहेरील 309 लोकांचे सभासदत्व रद्द करण्याचा आदेश दिला आहे.
खेडभोसे (ता. पंढरपूर) येथील विविध कार्यकारी सोसायटी या संस्थेचे कार्यक्षेत्र हे खेडभोसे गाव आहे आणि एकूण सभासद 1024 आहेत. सन 2014 मध्ये तत्कालीन संचालक मंडळाने नियमबाह्यपणे खेडभाळवणी, पिराची कुरोली, पटवर्धन कुरोली, शेवते, पेहे, देवडे, भोसे, व्होळे, अजोती, पंढरपूर, सांगोला या 11 गावातील तब्बल 325 लोकांना संस्थेचे सभासद करून घेतले होते. या लोकांच्या नावे गावात एकही गुंठा जमीन नव्हती. विशेष म्हणजे या लोकांना संस्थेचे खावटी कर्जवाटप सुध्दा केले होते. याबाबत पंढरपूरच्या सहायक निबंधक यांच्याकडे बाबुराव पवार, बंडू पवार, लक्ष्मण पवार आणि राजाराम जमदाडे यांनी तक्रार केली होती.
याबाबत सहायक निबंधक पी. सी. दुरगुडे यांनी या प्रकरणाची दोन्ही बाजूकडून सुनावणी घेऊन सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 11 मधील तरतुदीनुसार 309 सभासद हे संस्थेचे कायदेशीर सभासदत्वाची पात्रता धारण करीत नसल्यामुळे खेडभोसे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, खेडभोसे या संस्थेचे सभासद म्हणून राहण्यास अपात्र असल्याचे घोषित केले आहे. याबाबत संस्थेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 25 अ प्रमाणे यथोचित कार्यवाही करण्याचा आदेशही दिला आहे.
सहकारी संस्थेच्या नियमानुसार, ज्या व्यक्तीच्या नावावर जमीन नाही, त्याला खावटी कर्ज वाटप करता येत नाही, मात्र खेडभोसे सोसायटीने बेकायदेशीर पणे सुमारे 240 लोकांना खावटी कर्ज वाटप केले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदार बाबुराव पवार, बंडू पवार, लक्ष्मण पवार आणि राजाराम जमदाडे यांनी सहायक निबंधक यांच्याकडे केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !