शोध न्यूज : अवैध व्यवसायासाठी कोण कधी काय करील हे सांगता येत नाही हेच खरं ! पोलिसांना हुलकावणी देण्यासाठी पट्ठ्याने पाण्याच्या बोअरवेलमध्ये सोडला गांजा, पण पोलिसांचीही नजर भारी ! त्यांनी बरोबर हेरले आणि दोघांच्या मुसक्या आवळल्या !
अवैध व्यवसायावर पोलिसांची बारीक नजर असते, अनेकदा ही नजर बाजूला वळत असली तरी, अवैध व्यावसायिक बरीच काळजी घेत असतात. आपल्या काळ्या धंद्याबाबत पोलिसांना माहिती लागू नये, आणि माहिती लागली तरी मुद्देमाल त्यांच्या हाती लागू नये यासाठी पुरेपूर दक्षता घेतली जात असते, तरी देखील पोलिसांची नजर त्यांच्यापेक्षाही बारीक असते, शिवाय त्यांना गुप्तपणे मिळणारी माहिती अधिक परिणामकारक असते त्यामुळे अवैध व्यावसायिकाच्या मुसक्या आवळणे पोलिसांना सोपे जात असते. असे असले तरी काळा धंदा करणारे सतत नवनव्या युक्त्या करीत असतात. अशीच एक युक्ती मंगळवेढा तालुक्यात करण्यात आली पण पोलिसांनी या युक्तीतील हवाच काढून टाकली. कुणाला सुगावा लागू नये यासाठी दोन बहाद्दरांनी गजांची पिशवी चक्क पाण्याच्या बोअरवेलमध्ये लपवली असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी आरोपी हॉटेल चालक आशीफ आबूबकर तांबोळी व स्वयंपाकी सिद्धेश्वर सुखदेव बनसोडे (रा. लक्ष्मीदहिवडी, जि. सोलापूर) यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथील हॉटेल गारवा शेजारी असणाऱ्या पाण्याच्या बोअरवेलमध्ये पिशवीत घालून दोरीने आत सोडलेला गांजा पोलिसांनी जप्त करून हॉटेल चालक आशीफ अबूबकर तांबोळी व स्वयंपाकी सिद्धेश्वर सुखदेव बनसोडे यांना मंगळवेढा पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथे अवैध पद्धतीने गांजा विकला जात असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षिका नायोमी साटम यांना मिळाली. अवैध व्यवसाय उखडून टाकण्याचा प्रयत्न साटम यांनी आधीच सुरु केला आहे त्यात ही माहिती मिळाली आणि त्यांनी आपला फौजफाटा घेवून या गावाकडे मोर्चा वळवला. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी हॉटेल गारवा येथे जाऊन झडती घेतली पण काही आढळून आले नाही. तेवढ्यात त्यांचे लक्ष, हॉटेलच्या शेजारी असलेल्या एका बोअरवेलकडे गेले. हॉटेलला लागून असलेल्या बोअरवेलमध्ये संशयास्पदरित्या दोरी दिसून आली. त्यावेळी पोलिसांनी व पंचांनी बोअरवेलचे कव्हर उघडताच दोरीला बांधून आत सोडलेली पिवळ्या रंगाची कापडी पिशवी पोलिसांना दिसली. त्यावेळी ती पिशवी काढून तपासणी केली असता त्यामध्ये गांजा असल्याचे दिसून आले, त्याचे वजन एक किलो मिळून आले असून वीस हजार किमतीचा गांजा व आरोपीचा ८० हजाराचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला.
पोलिसांची नजर चुकवून गांजा लपविण्याची वेगळी युक्ती हॉटेल चालकाने केली खरी पण पोलिसांच्या बारीक नजरेपुढे या युक्तीचा टिकाव लागला नाही, (Cannabis hidden in water borewell, caught by police) हॉटेल चालकाच्या या युक्तीची मात्र मंगळवेढा तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातही मोठी चर्चा मात्र सुरु झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !