शोध न्यूज : महाविकास आघाडीला आधीच घरघर लागलेली असताना आता कॉंग्रेस पक्षाचे आमदार महाविकास आघाडीला धक्का देत बाहेर पडणार असल्याचा मोठा दावा भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे.
राज्यात भाजपला शह देत महाविकास आघाडी स्थापन झाली आणि त्यांनी राज्यात सत्ता देखील स्थापन केली परंतु भाजपने काटशह देत महाविकास आघाडीलाच मोठा दणका दिला. भाजपने शिवसेनेचे चाळीस आमदार फोडून सत्ता स्थापन केली आणि त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसला देखील मोठा दणका देत राष्ट्रवादीही फोडली. त्यानंतरही उद्धव ठाकरे आणि शरद पवार पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ठाकरे आणि पवार यांना राज्यात सहानुभूती असून भाजपबाबत नाराजी निर्माण झाली आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी आणि निवडणुकीत काही वेगळा चमत्कार घडण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान महाविकास आघाडीत असलेल्या कॉंग्रेसमध्येही काही अंतर्गत हालचाली सुरु असल्याची चर्चा मागील काही काळापासून सुरु आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि त्यानंतर आता कॉंग्रेस पक्षाचे आमदार फुटणार असल्याची चर्चा तर होतीच पण आता भारतीय जनता पक्षाच्या एका खासदारानेच याबाबत भाष्य करून कॉंग्रेसचे आमदार महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याचा दावा केला आहे. यामुळे पुन्हा राज्यात खळबळ उडाली आहे.
माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी हा दावा जाहीरपणे केला आहे.अजित पवार आणि समर्थक आमदार राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यापासून कॉंग्रेस पक्षात देखील अस्वस्थता असून याच अस्वस्थतेतून कॉंग्रेसचे आमदार महाविकास आघाडीतून आघाडी फोडून बाहेर पडतील असे खा. निंबाळकर यांनी म्हटले आहे. आघाडी फोडून बाहेर पडल्यानंतर हे आमदार भाजपात सहभागी होतील, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामागे जाऊन कॉंग्रेसचे नुकसान होईल अशी भीती या आमदारांना वाटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अजित पवार यांनी अर्थमंत्री होताच सर्व पक्षातील आमदारांना मोठा विकासनिधी दिला आहे त्यामुळे विकास कामांना गती आली आहे असे देखील त्यांनी सांगितले.
खा. निंबाळकर यांच्या दाव्यात तथ्य असेल तर राज्यात पुन्हा मोठी उलथापालथ होऊन विरोधक नगण्य होण्याची आणि विरोधी पक्ष कमकुवत होण्याची मोठी भीती व्यक्त केली जात आहे. (Congress MLAs will leave Mahavikas Aghadi) या फोडाफोडीच्या राजकारणाचा सामान्य नागरिकांना देखील संताप असून हा संताप कसा व्यक्त होतोय यावर देखील खूप काही अवलंबून असणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !