BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ जून, २०२३

पंढरपूरजवळ आल्यानंतर वारकऱ्यांच्या वाहनास मोठा अपघात !

 



शोध न्यूज :  आषाढी वारी सुरु होण्यापूर्वीच भाविकांच्या अपघाताच्या घटना समोर येऊ लागल्या असून विठ्ठल दर्शनासाठी पंढरीकडे येत असलेल्या भाविकांच्या एका वाहनास पंढरपूरजवळ आल्यावर माढा तालुक्यात मोठा अपघात होण्याची घटना घडली आहे. 


देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनास नेहमीच अपघात होत असल्याचे गेल्या काही वर्षात दिसून आले आहे. अपघाताचे प्रमाण सगळीकडेच वाढलेले असले तरी भाविकांच्या वाहनांचे अपघात देखील लक्षणीय आहेत. पंढरपूर वारीसाठी निघालेल्या अथवा वारी करून परतीच्या प्रवासाला लागलेल्या भाविकांच्या वाहनांना गेल्या तीन वर्षात अनेक अपघात झालेले असून त्यात काही भाविकांना प्राण गमवावे लागले आहेत. खाजगी वाहने भाड्याने घेवून भाविक पिकअप टेंपो अथवा ट्रॅक्टर ट्रॉलीतून प्रवास करतात. अनेक भाविक मिळून अशी वाहने भाड्याने घेतात आणि भाडे वाढू नये म्हणून सलग प्रवास करतात. यातच अशा दुर्घटना घडताना दिसतात. आषाढी एकादशी जवळ आली आहे आणि संतांच्या पालख्या पंढरीकडे निघाल्या आहेत. वारीचा हा आनंद सोहळा साजरा होण्याआधीच यावर्षी भाविकांच्या अपघाताला सुरुवात झाल्याचे दिसत आहे.  पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्यादर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांच्यापिकअप जीपचा लऊळ येथे  (ता. माढा) पहाटे च्या सुमारास भीषण अपघात झाला. 


आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अनेक भाविक वारीपूर्वीच पंढरीत पोहोचतात आणि दर्शन घेऊन संत तुकाराम महाराज अथवा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होतात. वाशीम जिल्ह्यातील काही वारकरी हे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यापूर्वी पंढरीत पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी निघाले होते. दरम्यान, वारकऱ्यांचे बोलेरो पिकअप वाहन कुर्डुवाडी शहरातून माढा तालुक्यातील लऊळ गावच्या हद्दीत आले असता सदर पिकअपवरील चालकाचा ताबा सुटल्याने पिकअपचा भीषण अपघात झाला. यामध्ये १४ वारकरी जखमी झाले. यामध्ये १२ पुरुष व २ महिलांचा समावेश आहे. यातील कौतिक व्यवहारे (वय ३०, रा. ताकतोडे, ता.मालेगाव, जि. वाशीम) या युवकास छातीला मार लागल्याने त्यास सोलापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 


सदर अपघातानंतर वाहन चालक माधव शिंदे (रा. शिंदी, जि. वाशीम) अपघातानंतर पळून गेला, असल्याचे पोलिसात देण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटले आहे  मालेगाव तालुक्यातील ताकतोडे येथील गजानन परसराम सुरले यांनी या घटनेबाबत कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (A major accident involving a devotee's vehicle near Pandharpur) पंढरीच्या वारीसाठी खाजगी वाहन घेऊन येणाऱ्या भाविकांनी दक्षता घेण्याची गरज असून, आपला प्रवास सुरक्षित कसा होईल याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !