शोध न्यूज : देवाच्या प्रसादाच्या नावाने विठ्ठलाच्या पंढरीत एका महिलेची फसवणूक करण्यात आली असून, प्रसादाच्या नादी लावत या महिलेची सोन्याची मोहनमाळ अज्ञात चोरट्यांनी हातोहात लांबवली आहे, भाविक महिलेच्या भक्तीचा देखील अशा प्रकारे गैरफायदा घेण्याचा प्रकार घडला आहे.
मंदिरात दर्शन घेण्याला जेवढे महत्व दिले जाते तेवढेच महत्व देवाच्या प्रसादाला दिले जाते. कुणी देवाचा प्रसाद देवू लागले तर कुणीही त्याला नाही म्हणत नाही. एवढेच नव्हे तर अगदी भक्तिभावाने हा प्रसाद भक्षण केला जातो, प्रसाद हातात घेतल्यानंतर देवाला हात जोडले जातात. याच भक्तीचा अज्ञात भामट्याने गैरफायदा उठवत पंढरीतील एका महिलेला हातोहात लुटले आहे. पंढरपूर शहरातील भाई भाई चौकात राहणाऱ्या साठ वर्षे वयाच्या अरुणा गणपत शिंदे यांना इंदिरा गांधी भाजी मंडईजवळ फसवणूक करून लुटण्यात आले आहे. त्यामुळे आता देवाचा प्रसाद कुणी दिला तरी तो घ्यायचा की नाही ? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. अनोळखी व्यक्तींकडून कुठलाच खाद्य पदार्थ घेवू नये असे आवाहन पोलीस प्रशासन नेहमीच करीत असते पण प्रसादाला नाही कसे म्हणायचे म्हणून त्याला काही जण बळी पडतात. देवाच्या गावात तर भाविक वृत्तीच्या व्यक्ती फसणे स्वाभाविक आहे.
देवाचा प्रसाद आहे घ्या. नको म्हणू नका', असा आग्रह तसेच तसा बहाणा करीत दोघा भामट्यांनी महिलेची ३० हजार रूपये किंमतीची सोन्याची मोहनमाळ हातोहात लंपास केली. पंढरपूर येथील अरुणा शिंदे या महिला रोज दर्शनासाठी बाहेर पडतात. गजानन महाराज यांच्या मठात जाऊन त्यांनी दर्शन घेतले आणि तेथून त्या पुढे चौफाळा येथील श्रीकृष्ण दर्शनासाठी निघाल्या. नेमके याचवेळी भामट्यांनी त्यांना हेरले आणि त्यांच्या भक्तीभावाचा गैरफायदा घेण्याचे ठरवले. त्यांच्या मागून एक भामटा आला आणि त्याने अरुणा शिंदे यांना देवाचा प्रसाद देण्याचा बहाणा केला. त्यासाठी त्याने अरुणा यांना एका दुकानासमोरील कट्ट्यावर बसायला सांगितले. याचवेळी आणखी एक भामटा तेथे आला आणि प्रसादाची केली आणतो म्हणून तेथून निघून गेला. तो जाताच पहिल्या भामट्याने महिलेची फसवणूक करण्यास सुरुवात केली. गर्दीत चोऱ्या होतात, गळ्यातील दागिने काढा आणि तुमच्या पिशवीत ठेवा अशी बतावणी त्याने केली.त्याचे ऐकून अरुणा शिंदे यांनी आपल्या गळ्यातील मोहनमाळ काढून पिशवीत ठेवली आणि पिशवी आपल्या कमरेला लावली.
प्रसादाची केली आणण्यासाठी गेलेला दुसरा भामटा काही वेळाने तेथे आला. त्याने अरुणा यांना प्रसाद म्हणून केली दिल्या. यावेळी अरुणा शिंदे यांच्याशी काही वेळ बोलत हे भामटे तिथेच बसून राहिले. काही वेळ गप्पा मारून दोन्ही भामटे तेथून पसार झाले. ते गेल्यानंतर अरुणा यांनी आपल्या कमरेची पिशवी तपासली पण सोन्याची मोहनमाळ ठेवलेली पिशवी कमरेला नव्हती. (Cheating on the pretext of Prasad at Pandharpur) ती गायब असल्याचे पाहून अरुणा शिंदे यांच्या लक्षात एकूण प्रकार आला. आपली फसवणूक झाल्याची जाणीव त्यांना झाली होती पण तो पर्यत भामटे पसार झाले होते. भामट्यांनी हातचलाखी करीत महिलेची सोन्याची मोहनमाळ लंपास केली होती. त्यानंतर पंढरपूर शहर पोलिसात याबाबत तक्रार देण्यात आली असून आता या भामट्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !