BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ जून, २०२३

पुढाऱ्याने मारली उडी, गावाने काढली खोडी ! आठवला 'पिंजऱ्या'तील मास्तर !

 



'हवा' विरुध्द 'थवा' !


शोध न्यूज : सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रोज नव्या आरोप प्रत्यारोपांनी गाजत असली तरी, निष्ठा सोडून इकडून तिकडे उडी मारणारे गाव पुढारी उघडे पडले असल्याचे चित्र समोर आले असून यातून निवडणुकीची दिशा देखील स्पष्ट होताना दिसत आहे. 


गाव करील ते राव करणार नाही असे म्हणतात ते काही खोटं नाही. असाच मोठा अनुभव पंढरपूर तालुक्यातील चंद्रभागा तथा सहकार शिरोमणी निवडणुकीत येताना दिसत आहे. विद्यमान चेअरमन कल्याणराव काळे आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्यात या निवडणुकीची झुंज लागली आहे. वसंतदादा काळे यांनी चंद्रभागा उभारणीसाठी निकराने झुंज दिली होती आणि आता त्यांचेच चिरंजीव असलेले कल्याणराव काळे हे कारखाना वाचविण्यासाठी झुंज देत आहेत. अशावेळी त्यांच्या जवळची काही मोजकी माणसं 'ऐन लढाईत' त्यांची साथ सोडत आहेत. त्यामुळे कल्याणराव काळे एकाकी पडले असल्याचे चित्र तालुक्यात निर्माण होऊ लागले आहे. असे चित्र निर्माण होत आहे की तसे मुद्दाम निर्माण केले जात आहे ? हे समजत नसले तरी हे चित्र म्हणजे केवळ एक आभास असल्याचे समोर येवू लागले आहे. त्यामुळे पैसा ओतून निर्माण केलेले वातावरण कितपत टिकणार ? हा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक आहे. 


कल्याणराव काळे हे निकराने लढत असले तरी त्यांचे सैन्य प्रामाणिक असल्याचे दिसत आहे. सरदार शस्त्रे टाकून फितूर झाले तरी मागचे सैन्य मात्र काळे यांच्यासाठीच लढा देत आपली निष्ठा जपत असल्याचे दिसून आले. पूर्वीचे वसंतदादा काळे यांचे आणि नंतरच्या काळात कल्याणराव काळे यांचे अखंड गुणगान गाणारे सहकारी संचालक बाळासाहेब कौलगे यांनी उपरी येथील सभेत अचानक अभिजित गटात प्रवेश केला. या प्रवेशाने तालुक्यात मोठी चर्चा झाली. बालेकिल्ल्यातील संचालकच फुटल्याने आता काळे यांचे कसे होणार ? असा सवाल उपस्थित होणे स्वाभाविक होते पण हा प्रश्न अधिक काळ दम धरू शकला नाही. कारण पिराची कुरोली येथील सभासदांनीच त्यांचा 'पिंजऱ्या'तील 'मास्तर' करून टाकला आहे. त्यामुळे 'पुढाऱ्याने मारली उडी पण गावाने काढली खोडी'  असे काहीसे चित्र निर्माण झाले आहे. लोकशक्ती पाठीमागे असली तर नेता दमदार असतो, फुटलेले संचालक बाळासाहेब कौलगे यांच्यामागे लोक होते पण त्यांनी जेंव्हा गट बदलला तेंव्हा ते एकटेच उरले असल्याचे त्यांचाच गावातील कारखान्याचे सभासद सांगू लागले आहेत. 



कौलगे यांनी कल्याणराव काळे यांची साथ सोडल्यावर, त्यांच्यावर निष्ठा ठेवून असलेले सगळेच बिथरले आहेत आणि अत्यंत उघडपणे कौलगे यांच्यावर तोंडसुख घेत जीव गेला तरी आम्ही काळे यांच्याच मागे राहणार असल्याचे सांगू लागले आहेत. बोलताना काही सभासदांच्या डोळ्यात पाणी आले तर काहीना आपल्या भावना व्यक्त करणे देखील कठीण झाले होते. वसंतदादापासून कल्याणराव काळे यांच्या कारकिर्दीपर्यंत हे सभासद काळे यांच्याच पाठीमागे ठाम आहेत. ज्यांच्या नेतृत्वात हे सभासद काळे यांचे झेंडे घेवून नाचले, ते संचालक फुटले तरी त्यांनी काळे यांचा झेंडा सोडला नाही. उलट कल्याणराव काळे यांच्या झेंड्याची काठी त्यांनी अधिकच मजबूतपाने पकडली आहे. 


पिराची कुरोली गावात ५३९ कारखाना सभासद आहेत. संचालक फुटल्यामुळे फार फार तर सात आठ मते कमी होतील असे हे बाकीचे जेष्ठ सभासद सांगताना दिसत आहेत. 'गाव बाळूनानांच्या पाठीमागे होते पण ज्या दिवशी त्यांनी काळे यांना धोका दिला, त्या दिवसांपासून ते एकटेच आहेत, गावात नानांची काही कमी नाही, एक नाना गेले तर बाकीचे नाना आहेत, आता आम्ही पहिल्यापेक्षा अधिक ताकतीने काळे यांचे काम करू अशा भावना येथील सभासदांनी व्यक्त केल्या आहेत. 


'आमच्या गावावर काळे यांनी पुत्रवत प्रेम केले आहे मग आम्ही त्यांच्याशी गद्दारी का करावी ? ज्यांनी केली त्यांना व्यक्तिगत पातळीवर काही मिळाले नसेल किंवा दुसरीकडून काही मिळाले असेल तर आम्हाला माहित नाही'  अशा शब्दात गावकरी आपल्या भावना व्यक्त करीत आहेत. कौलगे यांनी कुणालाही न विचारता हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ते गेले असले तरी प्रत्येक सभासद हा कल्याणराव काळे यांच्याच मागे निष्ठेने उभा आहे असे सांगू लागले आहेत. (Chandrabhaga sugar election, Kale group strong)कल्याणराव काळे हे सुरुवातीपासून हेच सांगत आहेत, गर्दी कुठेही दिसत असली आणि दिखावा केला जात असला तरी, सभासद मात्र आमच्याशी प्रामाणिक आहेत असेच काळे सांगत राहिले आहेत. २५ मते असलेल्या ठिकाणी दोन हजार लोकांची सभा घेण्याची आम्हाला गरज नाही असे देखील काळे यांनी सांगितले आहे. पिराची कुरोली येथील सभासंदांचा संताप आणि भावना पाहता, काळे करीत असलेल्या दाव्यात मोठे तथ्य असल्याचे दिसून आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !