BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ जून, २०२३

पंढरपूर - सांगोला रस्त्यावरील अपघातात महाविद्यालयीन तरुणी ठार !

 


शोध न्यूज : पंढरपूर - सांगोला रस्त्यावर झालेल्या एका अपघातात स्कुटीवरून निघालेल्या दोन महाविद्यालयीन तरुणींचा अपघात झाला असून यातील एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर दुसरी तरुणी जखमी झाली आहे. 


पंढरपूर - सांगोला हा मार्ग या आधीच मृत्यूचा महामार्ग बनलेला असून, या आधी देखील या मार्गावर अनेक आणि गंभीर स्वरूपाचे अपघात झालेले आहेत. पंढरपूर ते सांगोला दरम्याच अपघाताची काही ठिकाणे तयार झाली असून, फॅबटेक कॉलेजजवळील रस्ता हा अपघाताचे केंद्र बनले आहे. याच ठिकाणी पुन्हा एकदा अपघात होऊन दोन महाविद्यालयीन तरुणीचे प्राण संकटात आले. यातील एका तरुणीला आपले प्राण गमवावे लागले आहेत. भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सने टीव्हीएस स्कूटीला समोरून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात फार्मसीच्या महाविद्यालयीन दोन तरुणी गंभीर जखमी झाल्या. त्यातील एकीचा उपचारापूर्वी मृत्यू झाला तर दुसऱ्या तरुणीची प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल घडलेल्या या अपघाताने पुन्हा एकदा हे ठिकाण चर्चेला आले आहे. 


पंढरपूर येथील आदिती ज्योतिराम जाधव ही २१ वर्षे वयाची महाविद्यालयीन तरुण आणि पंढरपूर येथीलच शिवानी शिवशंकर विरपे (वय २१) या दोन तरुणी स्कुटीवरून जात असताना एका टेम्पो ट्रॅव्हल्सने त्यांना समोरून जोराची धडक दिली. आदिती जाधव व तिची मैत्रीण शिवानी विरपे या दोघी मैत्रिणी पंढरपूर येथून (एमएच १३ एए २२०६) या स्कूटीवरून फॅबटेक कॉलेजकडे वळताना (Pandharpur-Sangola road accident killed college girl) सांगोल्याकडून पंढरपूरकडे भरधाव जाणाऱ्या (एमएच १५ एफएफ ६००६) या टेम्पो ट्रॅव्हल्सने त्यांच्या स्कूटीला समोरून जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला. अपघातात आदिती व शिवानी या दोघींच्या डोक्यास, हाता-पायास गंभीर मार लागून जखमी झाल्या. कर्मचाऱ्यांच्या मदतीने जखमी आदिती जाधव हिला कॉलेजच्या बसमधून तातडीने उपचारासाठी सांगोला येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी ती उपचारापूर्वी मयत झाल्याचे सांगितले. मयत आदितीचे वडील ज्योतिराम जाधव यांनी या प्रकरणी पोलिसात फिर्याद दाखल केली असून ट्रॅव्हल्सचा चालक सुंदर चंद्रकांत कोरवे (इचलकरंजी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


या अपघातात मृत झालेली आदिती जाधव व तिची मैत्रीण शिवानी विरपे या दोघी फॅबटेक कॉलेज सांगोला येथे बी फॉर्मसीच्या तृतीय वर्षाचे शिक्षण घेत होत्या. पंढरपूर येथून त्या रोज महाविद्यालयात जात होत्या. चार दिवस एस टी ने तर दोन दिवस शिवानीच्या स्कुटीवरून त्या महाविद्यालाला पोहोचत होत्या. असे त्यांचे आठवड्यांचे नियोजन होते, ज्या दिवशी स्कुटीवरून निघाल्या त्याच दिवशी ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेने महाविद्यालयीन परिसरावर शोकाचे वातावरण असून, महाविद्यालयाच्या परिसरात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा होऊ लागली आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !