शोध न्यूज : चाळीस आमदारांनी बंद करून शिवसेना फोडली पण अजूनही शिंदे गटातील आमदारांना बाहेरचे वातावरण कठीण झाले असून लग्नाला जाणे देखील अवघड झाले असल्याचा प्रत्यय आला आहे. लग्नात देखील 'पन्नास खोके, एकदम ओक्के' चा नारा आवाज करू लागला आहे.
शिवसेना फोडून एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदारांनी गुवाहाटी गाठली. भाजपचा आधार घेत शिवसेनेचा घात केला आणि राज्यात नवे सरकार अस्तित्वात आले. शिवसेनेने या चाळीस आमदारांवर 'गद्दार' असा शिक्का मारला आहेच पण, या चाळीस आमदारांनी केलेले बंड सामान्य जनतेलाही आवडले आणि रुचलेले नाही. त्यामुळे या चाळीस आमदारांना आगामी निवडणुकीत मोठा फटका बसण्याची परिस्थिती संपूर्ण राज्यात आहे. गुवाहाटीला गेलेले चाळीस आमदार परत आले आणि त्यांनी भाजपच्या मदतीने सरकार बनवले खरे, पण जनमानसात मात्र उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठी सहानुभूती निर्माण झाली आहे. या जनभावनेचे पडसाद येत्या निवडणुकीत स्पष्टपणे उमटणार आहेत याची जाणीव सर्वांनाच आहे पण 'त्या' आमदारांना अजूनही मोकळ्या वातावरणात गुदमरताना दिसत आहे.
मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे विराजमान झाले पण त्यांच्यासह त्यांच्या चाळीस आमदारांना गद्दारीचा शिक्का कपाळावर मिरवावा लागत आहे. त्यातच ' पन्नास खोके, एकदम ओक्के' ही घोषणा राज्याच्या कोनाकोपऱ्यातून सतत आवाज करीत असते. शिंदे गटाने 'पन्नास खोक्यां'साठी शिवसेना फोडली असा आरोप सतत होत आलेला आहे आणि चाळीस आमदारांना हे जागोजागी ऐकावे लागत आहे. या चाळीस आमदारातील अनेकांना याचा तगडा अनुभव आला असून, जाईल तेथे 'पन्नास खोके, एकदम ओक्के' च्या घोषणा ऐकाव्या लागत आहेत. अनेक ठिकाणावरून तर या आमदाराना काढता पाय घ्यावा लागला आहे. निवडणूक जशी जवळ येईल तसा या 'खोक्यांचा' आवाज आणखीच वाढणार आहे. शिंदे गटातील या आमदारांची पाठ हे 'खोके' काही केल्या सोडत नसून आमदार संतोष बांगर यांना ऐन लग्नात खोक्यांचा आवाज ऐकावा लागला आहे.
शिंदे गटाचे आमदार यांना 'पन्नास खोक्यांचा' हा आवाज अनेकदा ऐकावा लागला आहे, भर रस्त्यावर देखील त्यांच्या गाडीला रोखत शिवसैनिकांनी हा आवाज काढला आहे पण आता पुन्हा एकदा त्यांना याचा सामना करावा लागला आहे. लग्नाच्या वातावरणात देखील सनई चौघड्यापेक्षा या खोक्यांचाच आवाज घुमला. परभणीच्या पाथरी तालुक्यातील देवेगाव येथील एका विवाह सोहळ्यात पन्नास खोक्यांचा आवाज निघाला आणि लग्नाचे वातावरण घोषणांनीच दुमदुमून गेले. शिंदे गटातील आमदार संतोष बांगर हे एका विवाह सोहळ्याला उपस्थित राहिले होते. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव समोर येताच आमदार बांगर यांनी जाधव यांचे चरण स्पर्श केले. अर्थातच यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या पण त्यानंतर वेगळाच प्रकार घडला.
विवाह सोहळ्यात आमदार, खासदार उपस्थित होते तसे उद्धव ठाकरे शिवसेनेशी एकनिष्ठ असलेले शिवसैनिक देखील होते. त्यांनी संजय बांगर या शिंदे गटाच्या आमदाराला पाहून 'पन्नास खोके, एकदम ओक्के' अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. लग्नाचे वातावरण बदलून एक राजकीय आखाडा बनला गेला. कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांची मात्र भर लग्नात वेगळीच कोंडी झाली. (wedding ceremonies, pannas khoke, ekadam ok )शिंदे गट सत्तेत जाऊन बसला, त्याला काही महिनेही झाले आहेत आणि आता अवघे काही महिने उरले आहेत. निवडणूक जवळ आली असून बंडाचा परिणाम देखील संपत आलेला आहे पण, शिंदे गटातील आमदारांना जाईल तेथे सन्मान नव्हे, अशा प्रकारे अवमानाचाच सामना करावा लागत आहे. साहजिकच आगामी निवडणुकीत हे अधिक प्रमाणात असून, निवडणुकीचा निकाल काय येईल याचा अंदाज, आमदारांच्या या परिस्थितीवरूनच केला जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !