शोध न्यूज : सोलापूर जिल्ह्यात अवैध सावकारीचा पाश कायमच अवलालेला असून अशाच बेकायदा सावकारीच्या जाचाला कंटाळून मोहोळ तालुक्यातील एका तरुणाने आत्महत्या केल्याप्रकरणी सावकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेकायदा सावकारी हा मानवतेलाच लागलेला एक कलंक असून अशा कर्जांच्या विळख्यात अनेक गरीब आणि गरजू गुदमरून मरत आहेत. गरजेपोटी सामान्य माणूस अशा सावकारांकडून कर्ज घेतात, अवास्तव असलेले व्याज देखील गरजेपोटी नजरेआड करतात आणि पुढे व्याज देत देतच आयुष्य संपवतात. कितीतरी पट अधिक रक्कम परत केली तरी सावकारांचे कर्ज काही फिटत नाही आणि मग कर्जाऐवजी जीवनच संपविण्याची वेळ येते. अशाच खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून मोहोळ तालुक्यातील कोथाळे येथील तीस वर्षीय तरुण, सोमनाथ वसंत पवार यांनी विषारी औषध प्राशन करून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. पुळुजवाडी येथील राजाराम सरगर, तुकाराम तेरणे, लिंगदेव सलगर, काकासाहेब सलगर यांच्याकडून त्याने व्याजाने रक्कम घेतली होती. यावेळी त्याने या सावकारांना आपली जमीन देखील लिहून दिली होती. सोमनाथ पवार यांनी २०१९ मध्ये हे कर्ज घेतले होते आणि घेतलेल्या कर्जाचा सगळा व्यवहार देखील व्याजासह पूर्ण देखील केला होता.
या व्यवहारात राजाराम सलगर याला ७ लाख तर तुकाराम यास ९ लाख रुपये परत करण्यात आले होते तरीही अजून पैशांची मागणी होतच होती. केवळ मागणीवर हे प्रकरण थांबत नव्हते तर त्यासाठी सोमनाथ याला त्रास दिला जात होता. यातूनच सोमनाथ याला त्याच्या लहान मुलासमोर पैशासाठी दमदाटी आणि शिवीगाळ करण्यात आली होती. पैसे देण्यासाठी धमकावण्याचा प्रकार देखील घडला होता. (A young man committed suicide due to illegal moneylending troubles)या घटनेने सोमनाथ प्रचंड अस्वस्थ होता आणि मानसिक तणावात गेला होता. अखेर त्याने पहाटेच्या सुमारास विषारी तणनाशक औषध प्राशन केले आणि आपले जीवन संपवले. सोमनाथ याला रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्या प्रयत्नाचा काही उपयोग झाला नाही आणि आणखी एका तरुणाचा अवैध सावकारीने बळी घेतला. या घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात आली आणि अवैध सावकारीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला.
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !